औरंगाबादेत जावईच निघाला चारसो बीसः खोटी कागदपत्रे बनवून परस्पर विकली सासऱ्याची जागा

0
1499
आरोपी निलेश प्रेमकुमार अग्रवाल

औरंगाबादः  सासरा आणि जावयाचे संबंध तसे नाजूक असल्याचे सांगितले जाते. मात्र या नाजूक नातेसंबंधाला एका जावयानेच काळीमा फासल्याची घटना औरंगाबादेत घडली. सासऱ्याच्या नावे असलेली जागा परस्पर खोटी कागदपत्रे तयार करून त्या जागेची तिसऱ्यालाच विक्री करण्याचा प्रताप या जावयाने केला असून या प्रकरणी औरंगाबादच्या जवाहरनगर पोलिस ठाण्यात तो करामती जावई निलेश प्रेमकुमार अग्रवाल याच्याविरुद्ध  भादंविच्या ४२० कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादच्या जवाहर कॉलनीतील विष्णूनगरमध्ये राहणारे  विजय हिरालाल अग्रवाल यांच्या मालकीची दाऊतपुऱ्यातील बागशेरगंजमधील सर्वे क्रमांक १० मधील सिटी सर्वेनंबर  १५१८४ मध्ये १७५० चौरस फूटाची जागा आहे. एक हजार, २५० आणि ५०० चौरस फूट अशा तीन तुकड्यातील एकूण १७५० चौरस फूट क्षेत्रफळाची जागा अग्रवाल यांनी २०१२ मध्ये अंबादास भानुदास मात्रे यांच्याकडून विकत घेतली.

कायमस्वरुपी खरेदी केलेली ही जागा विजय अग्रवाल यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये  व्यंकट पिराजीराव मालेगावे यांना ३६ महिन्याच्या भाडेतत्वावर दिली. तसा नोंदणीकृत भाडेकरारही करून घेतला. भाडेकरारावर घेतलेल्या या जागेवर मालेगावे यांनी चारचाकी वाहनांचे गॅरेज कम वर्कशॉप टाकले. या ठिकाणी त्यांच्या व्यवसायही सुरू आहे. मात्र २० जुलै रोजी मालेगावे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या गॅरेजवर गेले असता चार ते पाच अनोळखी इसमांनी त्यांना हा प्लॉट आमचा आहे, तो आम्ही  निलेश प्रेमकुमार अग्रवाल यांनी विकत घेतला आहे, त्यामुळे ही जागा लगेच खाली कर, असे सांगत मालेगावे यांना धमकावले.

व्यंकट मालेगावे हे दिव्यांग असून ते चारचाकी वाहनांचे गॅरेज चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अचानक घडलेला हा प्रसंग आणि गॅरेज उघडण्यास झालेला प्रतिबंध पाहून गांगारलेल्या मालेगावे यांनी जागेचे मूळ मालक विजय अग्रवाल यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

 मालेगावे यांच्या फोननंतर विजय अग्रवाल हे आपल्या प्लॉटवर गेले असता तेथे उपस्थित असलेले विजय हिरामण पडवळ, संजय अर्जुनदास डावरानी यांनी हा प्लॉट आम्ही निलेश प्रेमकुमार अग्रवाल यांच्याकडून खरेदी केलेला आहे. तो लगेच रिकामा करून द्या, असे अग्रवाल यांनाही धमकावले. जागा रिकामी करून दिली नाही तर तुमच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करू, अशीही धमकी त्यांनी अग्रवाल यांना दिली. यावेळी या दोघांसोबत सुशील भिसे आणि अन्य तीन ते चार महिलाही होत्या. विशेष म्हणजे प्लॉटची परस्पर विक्री करणारा निलेश प्रेमकुमार अग्रवाल हा दुसरा तिसरा कुणीही नसून तो विजय अग्रवाल यांचाच जावई आहे.

घडलेला प्रकार पाहून धक्का बसलेल्या विजय अग्रवाल यांनी विजय पडवळ आणि संजय डावरानी यांच्याकडे जागेच्या खरेदी व्यवहाराची कागदपत्रे मागितली असता त्यांनी तुला आम्ही कोणतीच कागदपत्रे दाखवणार नाही, तुला जे करायचे ते कर. पण जागा रिकामी करून दे, अशी धमकी दिली.

सासरे विजय अग्रवाल यांना या व्यवहारामुळे धक्काच बसला. नंतर त्यांना कळले की, निलेश प्रेमकुमार अग्रवाल या आपल्याच जावयाने या जागेची मूळ कागदपत्रे घरातून चोरून आपल्या खोट्या सह्या करून या जागेचा खोटा विक्री व्यवहार विजय पडवळ आणि संजय डावरानी यांच्या नावे करून दिला. हा प्रकार लक्षात येताच विजय अग्रवाल यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून जावई निलेश प्रेमकुमार अग्रवाल याच्याविरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलिसांनी निलेश प्रेमकुमार अग्रवाल याच्याविरोधात भादंविच्या ४२०, ४०६, ४६८ आणि ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

चारसो बीस जावई अजून मोकाटचः खोट्या सह्या करून बनावट कागदपत्राच्या आधारे आपल्या मालकीच्या जागेची परस्पर विक्री करणाऱ्या या जावयाविरोधात सासऱ्याने दिलेल्या फिर्यादीच्या आधारे जवाहरनगर पोलिसांनी रविवारी २५ जुलै रोजी एफआयआर नोंदवला खरा परंतु गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटले तरी पोलिसांनी निलेश प्रेमकुमार अग्रवाल याला अद्यापही अटक केलेली नाही. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शशीकांत तायडे करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा