छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने अमिताभ, केबीसीविरोधात देशभर संतापाची लाट

0
211

मुंबई : कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्यामुळे हा कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या सोनी टीव्ही आणि कार्यक्रमाचे सूत्रधार अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. ट्विटरवर #Bycott_KBC-SonyTv हा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये आहे. सेलिब्रेटी, राजकीय नेते आणि सर्वसामान्य नेटकरीही सोनी टीव्हीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असे सांगत सोनी टीव्ही आणि केबीसी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे इशारेही दिले जात आहेत.

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही ट्विट करून सोनी टीव्हीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सोनी टीव्हीवरील केबीसी या शोमध्ये महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला गेला. हा अवघ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सहन केले जाणार नाही. ज्या मातीत काम करता त्यासोबत इमान ठेवावा. सोनी टीव्हीने महाराष्ट्राची माफी मागावी, असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

गुजरातच्या शाहेदा चंद्रन या केबीसीच्या हॉटसीटवर असताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला. ‘ इन में से कौनसे शासक मुगल सम्राट औरंगजेब के समकालीन थे?’ या प्रश्नांच्या पर्यायांत A. महाराणा प्रताप B. राणा सांगा C. महाराजा रणजीत सिंह D. शिवाजी असे पर्याय दिले होते. चौथ्या पर्यायात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. निर्दोष लोकांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचा ‘मुगल सम्राट’ आणि लोकांचे रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख कसा काय सहन केला जाईन, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत #Bycott_KBC-SonyTv या हॅशटॅगवर 19.7 हजारांहून अधिक लोकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सोनी टीव्हीकडून माफीची मागणी केली आणि यापुढे केबीसी कार्यक्रम पाहणार नाही, असा निर्धारही काही जणांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा