कोरोना महामारीने उघड केला नवउदारमतवादाच्या प्लेगचा राक्षसी चेहरा!

0
371
संग्रहित छायाचित्र.

वर्तमान पेचप्रसंगामध्ये काय पाहायला मिळत आहे? कोणत्या गोष्टी दृष्टोत्पत्तीस येत आहेत? गेल्या चाळीस वर्षांमध्ये वैश्‍विक अर्थव्यवस्थेवर ज्या नवउदारमतवादाने अधिराज्य गाजवले त्या नवउदारमतवादाचा रोग या महामारीमध्ये असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेचे ट्रम्प, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अशा इतर फॅसिस्ट राजकारण्यांनी नवउदारमतवादास सन्मानाचे चिन्ह म्हणून खूपच गौरवले आहे. संकटात सापडलेल्या वित्तीय संस्थांना दिलेल्या बेलआऊट पॅकेजमध्ये राज्यकर्त्या वर्गाचा भ्रष्टाचारसुद्धा लागलीच दिसून आला आहे. रॉब उरई यांचे निरीक्षण असे आहे की, ‘श्रीमतांसाठी बेलआऊट्स आणि आमच्यासाठी विषाणू.’

मूळ लेखकः हेन्री ए.गिरोक्स ट्रुथआउट
अनुवादः राजक्रांती वलसे (बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय,जालना)

वर्तमान परिस्थितीमधील कोरोना विषाणू महामारी ही वैद्यकीय पेचप्रसंगापेक्षाही अधिक अशी गोष्ट आहे. हा राजकीय आणि विचारधारात्मक पेचप्रसंग सुद्धा आहे. हा पेचप्रसंग नवउदारवादी सरकारांनी दुर्लक्षिलेल्या अनेक वर्षांमध्ये खोलवर रुजलेला आहे. ह्या सरकारांनी सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक कल्याण यांचे महत्व नाकारले. खरे तर याच संस्थांनी सार्वजनिक आरोग्य व सार्वजनिक कल्याण यांना शक्य केले होते, परंतु या सरकारांनी मात्र त्या संस्थांचा निधी बंद केला. त्याचवेळी या पेचप्रसंगाला आरोग्य, उत्पन्न आणि सत्ता यांच्यामधील प्रचंड मोठ्या असमानतेपासून वेगळे केल्या जाऊ शकत नाही. हा पेचप्रसंग लोकशाही मूल्याच्या, शिक्षणाच्या आणि पर्यावरणीय विध्वंसाच्या संबंधाने विचार करता, कोरोना विषाणू महामारी ही नैसर्गिक व्यवस्थेच्या राजकीयीकरणाशी खोलवर जोडलेली आहे. नवउदारवादी वैश्‍विकीकरणाने पारिस्थितीकीय व्यवस्थेवर विध्वंसकारी हल्ले चढविले. याशिवाय, याला वंशवाद, अतिरेकी राष्ट्रवाद, स्थलांतरित विरोधी भावना यांच्या दृश्यापासून वेगळे करता येऊ शकत नाही. तसेच या कट्टर धर्माभिमानाने राष्ट्रीय चालूमतप्रवाहावर वर्चस्व गाजवले आहे. देशात सामाईक जबाबदार्‍यांना प्रोत्साहन देण्यापेक्षा सामाईक भीतीला प्रोत्साहन देण्याचे साधन म्हणून या धर्मांधतेने आपली भूमिका पार पाडली आहे.

या रोगाची अनेक मुळे आहेत. त्यापैकी अराजकीयीकरणाचे राजकारण हे या रोगाचे एक मूळ आहे. तर ही गोष्ट स्पष्ट करते की, शिक्षण हे राजकारणाचे केंद्रीय वैशिष्टय आहे आणि ते नेहमीच कोणत्याही विचारधारात्मक प्रकल्पामध्ये – प्रत्यक्ष किंवा छुप्या पद्धतीने-एक केंद्रिय भूमिका बजावत असते. उदाहरणार्थ, नवउदारमतवादाचे हे केंद्रिय अभ्यासक्रमीय तत्त्व राहिलेले आहे की, व्यक्तिगत जबाबदारीचा असा एकमेव मार्ग आहे, ज्यामधून सामाजिक समस्या सोडवता येतात आणि परिणामस्वरुप व्यापक समस्या सोडविण्याची गरज भासत नाही. तसेच, सत्तेला जबाबदार धरण्याची किंवा सामुदायिक जबाबदारीच्या गोष्टींना कवटाळण्याची देखील गरज भासत नाही. दूषितकारी राजकारणाचा एक भाग म्हणून नवउदारमतवाद सामाजिक समस्यांचे खासगीकरण करते व त्यांना व्यक्तिगत रुप देते. उदाहरणार्थः महामारीला रोखण्यासाठी तुम्ही तुमचे हात धुवा. असे करण्यातून “ते कोणत्याही खर्‍या लोकशाहीवादी राजकारणाला बंदिस्त करते; म्हणजेच सामुदायिक ऐक्यभावाला आणि समतेवर आधारलेल्या राजकारणाला बंदिस्त केल्या जाते कारण असे लोकशाहीवादी राजकारण मार्केटला धोका असते.

याच्या व्यतिरिक्त, नवउदारमतवादाने लोकशाही मूल्यांपेक्षा धंदेवाईक मूल्यांवर भर दिला आहे. नवउदारमतवादाच्या टोकाच्या स्पर्धात्मकतेची गळेकापू विचारधारा, अतार्किक स्वार्थीपणा आणि त्याच्या नीतिमत्ता, न्याय आणि सत्य या गोष्टींबाबतच्या उतावीळपणाने चिकित्सक विचाराला आणि माहितीपूर्ण न्यायनिवाड्याच्या शक्तीला कमी लेखले आहे. पंकज मिश्रा म्हणतात,“ आजपर्यंतच्या दशकांमध्ये निर्औद्योगिकीकरण, आऊटसोर्सिंग आणि यांत्रिकीकरण यांनी कामकरी लोकांची सुरक्षितता व प्रतिष्ठा हिरावून घेतली आहे. अशा या पीडित लोकांना धूर्त व स्वार्थी राजकारणाने अधिकच असुरक्षित व दुर्बल केले आहे.”

अमेरिकन लोक अशा काळात जगत आहेत, जेव्हा नवउदारमतवादाने जनतेविरुद्ध युद्ध पुकारले आहे आणि असमानतेला एक सद्गुण म्हणून पुन्हा मंचावरती उभे केले आहे. हा काळ विध्वंसकारी मार्गांनी सामाजिक ऐक्यभावनेच्या चिंधड्या उडवणार्‍या व्यक्तिगत जबाबदारांच्या कल्पनांना समर्थन देतो आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे जो स्पर्धात्मक दृष्टिकोन आणि अनिर्बंध किंवा मोकाट व्यक्तिवादाला अधिक महत्त्व देतो आणि सगळ्या सामाजिक संबंधांना संरचित करण्यासाठी बाजाराला एक प्रमाण गोष्ट वा मॉडेल बनण्याची परवानगी देतो. सामाजिक कराराला जवळपास बाद करण्यात आले आहे.

सार्वजनिक कल्याण, सामाजिक उत्तरदायित्व आणि ऐक्यभावनेचे लोकशाही स्वरुप संकटात आहेत. हे एक गँगस्टर भांडवलवादाचे रुप आहे, जे केवळ नफा, खासगीकरण आणि व्यावसायिक देवाणघेवाणीच्या बाजार-आधारित भाषेमध्ये बोलते. हे विलगीकरण, अभावग्रस्तता, मानवी पीडा आणि मृत्यूच्या भाषेला कायदेशीर बनविते.

नवउदारमतवादी धोरणांनी अनेक वर्षे नासधूस केल्यानंतर अमेरिकन समाज पेचप्रसंगाच्या एका मालिकेने अंथरुणावर पडला आहे. तो व्याधिग्रस्त झाला आहे. ह्या पेचप्रसंगांच्या खोलवरील मुळांनी जळजळीत वर्गीय व वंशीय विभाजनाला अधिकच तीव्र केले आहे. हे विभाजन पुढील गोष्टींमध्ये स्पष्टपणे दिसून येते. अमेरिकेतील “३४ दशलक्ष कामगारांना पगारी आजारी रजा नाहीये, तसेच ३० दशलक्ष लोकांकडे आरोग्य विमा नाहीये.” याशिवाय अमेरिकेत ५ लाख ५० हजार लोक बेघर आहेत. हे अमेरिकेसाठी लाजिरवाणे आहे. आज जवळपास अर्ध्या अमेरिकन लोकांना त्यांचे मासिक बिले भरणे कठीण झालेले आहे आणि आणीबाणी प्रसंगी किंवा अनपेक्षित येणारा ४०० डॉलर्स खर्च देखील ते करु शकणार नाहीत.

नवउदारमतवादी भांडवलवादी ही अदृश्य महामारी असून ती वर्तमानातील हॉस्पिट्ल्सची वैश्‍विक टंचाई, वैद्यकीय सामग्रीची टंचाई, खाट आणि सशक्त सामाजिक कल्याण योजना टंचाई आणि मानवी जीवनाप्रतीच्या असंवेदनशीलतेचे भरणपोषण करत आहे.

अशा परिस्थितीमध्ये सामाजिक वर्तुळ आणि त्याचे आंतरसंबंध हे एकतर आर्थिक शोषण किंवा संपूर्ण तिटकारा किंवा या दोन्ही गोष्टी बनतात. नवउदारमतवादी चर्चाविश्‍वाच्या अराजकीयीकरणामध्ये काय गमावले आहे आणि ह्या वर्तमान महामारीमध्ये काय स्पष्ट केले आहे तर ते म्हणजे की, आपले जगणे हे खरोखर अधिक चांगल्या किंवा वाईट गोष्टीसाठी आंतरसंबंधीय आहे. वर्तमान व्हाईट हाऊसने लोकांना केलेल्या आवाहनामध्ये एक निश्‍चित उपहास आहे. हे आवाहन विषाणूचा प्रसार मंदावण्यासाठी लोकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे या वैद्यकीयदृष्टया सुरक्षित आचरण पद्धतीलाच केवळ प्रतिबिंबित करत नाही तर ते सामाजिक संबंधांचा आणि लोकशाही मूल्यांचा तिरस्कार करणार्‍या दीर्घकालीन नवउदारमतवादी विचारधारात्मक अवकाश व्यापते. व्यक्तींनी सुटे सुटे राहून महामारीचा सामना करण्याच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देताना हे सर्व घडत आहे. आता येथे वैद्यकीय पेचप्रसंगांची थेट टक्कर दीर्घकालीन अस्तित्वात असलेल्या राजकीय पेचप्रसंगाशी झाली आहे. याच अवकाशात राजकारण नवउदारमतवादाचे एक हत्यार झाले आहे. अशा वेळी अर्थव्यवस्था आणि सरकारी सत्ता निरंतरपणे सार्वजनिक कल्याण आणि लोकशाहीवर आघात करताहेत व त्यांची झीज करताहेत. ट्रम्प सामाजिक अंतर ठेवण्याचा कालावधी वाढवत असतानाच ते हे सुद्धा दाखवत आहेत की, ते सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याच्या विरोधात जाऊन अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ढिल देणार आहेत.

पेचप्रसंगाच्या कालावधीमध्ये भांडवलवाद स्वतःला एक अकल्पनीय यंत्र म्हणून उघड करतो. त्याचा छूपा संदेश असा आहे की, मार्केट अभिकरणाने सोडून दिलेले फक्त रुप उपलब्ध करते. या संदर्भात राजकीय, आर्थिक आणि सामाजिकशक्ती या नवीन कार्यकेंद्र होतात आणि त्या सातत्याने स्वतःला सामाजिक, नैतिक आणि राजकीय जबाबदारीपासून दूर करत राहतात. अशा प्रकारे समाजाला एक नवीन विवेकशीलतेची ओळख करुन दिली जाते व त्याचा प्रचार केला जातो.

राजकारण युद्धाचे यंत्र बनते. रात्रंदिवस पळत राहते. असहमती, विरोधी मत, वेगळे मत, प्रतिकार आणि सामाजिक न्याय अशा कोणत्याही गोष्टीला ते यंत्र दुय्यम लेखते. अर्थात, नवउदारमतवादाचा हा फारच व्यापक संदर्भ आहे. ज्यामध्ये कोरोना विषाणू महामारी कार्य करत असते.

सन २००८ च्या वित्तीय पेचप्रसंगाने नवउदारमतवादाच्या रोगाला उघडे केले.  गेल्या चाळीस वर्षांमध्ये या नवउदारमतवादाने सार्वजनिक कल्याणाला गंभीर क्षती पोहचवली आणि गरिबांवर दुःख, पीडा, यातना लादली. त्याने इतरांना अतिरिक्त, निरुपयोगी किंवा धोकादायक मानले. पाशवी काटेकोर धोरणांचे एकत्रीकरण, अर्थव्यवस्थेचे वित्तीयीकरण, काही लोकांच्या हातात झालेले सत्तेचे केंद्रीकरण आणि वांशिक व सामाजिक शुद्धीकरणाची भाषा इत्यादीसह नवउदारमतवादाने स्वतःला सुरळीतपणे फॅसिस्ट राजकारणामध्ये रुपांतरित केले आहे.

नवीन राजकीय बांधणी बाजारासारखी आहे. वापरा आणि फेकून द्या असे लक्षणीय व सगळ्यांनी कवटाळलेले राजकारण रुढ झाले आहे. सामाजिक राज्याचा विस्तृत प्रमाणावर केलेला विध्वंस, दिमाखदार व प्रदर्शनीय हिंसेच्या शिक्षणशास्त्रीय साधनांसाठी पाठिंबा, भीतीचे सावट आणि राज्याची दहशत अशी ह्या नवीन राजकीय बांधणीची वैशिष्टये आहेत.

सार्वजनिक कल्याणाचा अर्थ आणि शक्यताचा विस्तार करणार्‍या कोणत्याही सामाजिक कल्पनांची हे सगळे घटक घृणा करतात. सार्वजनिक आरोग्यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्राचा देखील मायकेल सँडेल ज्याला समुदायामध्ये एकत्रितपणे मिळून राहणे असे म्हणतो, अशा विस्तृत कल्पनेचा देखील नवउदारमतवाद तिरस्कार करतो. समुदायात एकत्रितपणे मिळून राहणे यामध्ये ऐक्यभावाचे प्रश्‍न व आपण केलेला त्याग यांचा समावेश होतो. या दोन्ही गोष्टी लोकांना करुणा, मानवता आणि सन्मानाने वागवण्यासाठी कार्य करतात. शाय लाव्ही असा युक्तिवाद करतात की, सार्वजनिक कल्याणाच्या केंद्रस्थानी एक व्यापक चळवळ आहे, जी मानव मुक्ती, संघर्ष, आर्थिक न्याय, संघर्ष आणि मानवी समतेवर आधारलेले राजकीय समुदाय यांना एकत्रित आणण्यासाठी इच्छुक आहे.

१६ मार्च २०२० रोजी ट्रम्प यांनी ईस्टरपर्यंत अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठीच्या दिलेल्या हाकेमध्ये नवउदारमतवादाच्या महामारीचा पाशवीपणा स्पष्ट दिसतो. त्यावेळी ट्रम्प सामाजिक अंतर ठेवण्याचे जे सावधानीचे उपाय आहेत त्यांना समाप्त करतील आणि या विषाणूला त्याच्या पद्धतीने जाऊ देतील. अशा कृतीसाठी ट्रम्पचा प्रारंभीचा तर्क उजव्या शक्तीच्या युक्तिवादास अधोरेखित करताना असे सांगतो की, ‘रोगापेक्षा इलाज भयंकर आहे.’ अर्थव्यवस्था खूपच लवकर सुरु केली तर २.२ दशलक्ष लोक मरतील असे सांगितल्यावर ट्रम्प यांनी असे जाहीर केले की, ‘व्हाईट हाऊस एप्रिलपर्यंत सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करेल.’  डॉ.अन्थनी फॉसी असे नमूद करतात की, या विषाणूला रोखण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे हे सर्वात महत्त्वपूर्ण साधन आहे. तरीही ट्रम्प सर्वांनी घरामध्येच थांबावे असा राष्ट्रीय आदेश काढण्यास नकार देत आहेत. अमेरिकेतील आठ राज्यांनी नागरिकांनी घरातच थांबावे असा आदेश काढलेला आहे. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, इलिनॉईस, मिशिगन, इडाहो, ओरेगॉन, ओहिओ, लुसियाना अशी ती आठ राज्ये आहेत. ५ मार्च रोजी ट्रम्प यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे नमूद केले की, आणखी मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती खूपच बिघडून जाईल. तरीही काही वेळानंतर त्यांनी पुनरुच्चार केला की, त्यांना देश पुन्हा सुरु करण्यास आवडेल. राष्ट्राध्यक्षांची अशी कृती नैतिक अधःपतनाची धक्कादायक पातळी दाखवून देते. अमेरिकेतील वाढत्या मृत्यूसंख्येपेक्षा स्वतःची आगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा नव्याने निवड व्हावी याची ट्रम्प यांना जास्त काळजी दिसते आहे. तसेच व्यापार आणि स्टॉक मार्केटबद्दलही त्यांना अतिकाळजी असल्याचे दिसते आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वार्ताहरांनी याकडे लक्ष वेधले आहे की, ‘ट्रम्प हे फार कालावधीपासून पुन्हा निवडून येण्याच्या दृष्टीने स्टॉक मार्केटकडे एक बॅरोमीटर म्हणून पाहत आले आहेत.’

या सगळ्यामधून भयंकर असा राजकीय संधिसाधूपणा स्पष्ट दिसतो. ट्रम्प प्रशासनाने अत्यंत उद्दामपणे नफेखोरी आणि क्रूर नवउदारमतवाद विचारधारेला कवटाळले आहे. ट्रम्प प्रशासन तज्ज्ञ आणि विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या लोकांना दुय्यम समजून एक प्रकारचा आसुरी आनंद घेत आहे. तज्ज्ञांनी अत्यंत गंभीर इशारे दिल्यानंतर देखील ट्रम्प प्रशासन केवळ सार्वजनिक आरोग्य कर्मचार्‍यांचाच सल्ला मानत आहे. ट्रम्प या जागतिक महामारीकडे एक एकांगी लढाई म्हणून पाहत आहेत. राज्याच्या गव्हर्नर्सनी वैद्यकीय साधनांचा पुरवठा करण्याची कळकळीची विनंती करुन देखील त्याकडे ट्रम्प यांनी साफ दुर्लक्ष केले. त्यांनी पेचप्रसंगांना हाताळण्यासाठी समन्वयवादी राष्ट्रीय संघराज्यीय दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे.

कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय किंवा वैज्ञानिक दाखल्याशिवाय ट्रम्प यांनी कोरोना विषाणूवर इलाज म्हणून विशिष्ट औषधांना मान्यता दिली. तसेच त्यांनी अमेरिका लवकरच कोरोना विषाणू लस शोधून काढण्याच्या अगदी जवळ पोहचल्याचा खोटा दावा केला आहे. ट्रम्प कटकारस्थानांना चालना देणार्‍या उजव्या फळीच्या पंडितांच्या सल्ल्यावर नेहमीच विसंबून असतात. जेव्हा लोकांचा जीव वाचवायचा किंवा अर्थव्यवस्थेला वाचवायचे असा प्रश्‍न उभा राहतो, तेव्हा ट्रम्प वॉल स्ट्रीटच्या नशिबाबद्दल फारच काळजी करताना दिसतात. ट्रम्प यांचे गोंधळलेल्या आणि परस्परविरोधी सार्वजनिक टिप्पण्या अतिशयोक्ती आणि खोटारडेपणा यांनी भरलेल्या असतात. या टिप्पण्या अमेरिकन जनतेची दिशाभूल करतात. पण त्याचवेळेला यामुळे लाखो अमेरिकन लोकांना अकल्पनीय यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे ‘कदाचित लक्षावधी लोक आजारी पडू शकतात व ते मरु शकतात.’

 आत्ताच्या परिस्थितीमध्ये निव्वळ अक्षमता आणि तज्ज्ञांविषयी व वैज्ञानिक दाखले यांच्याविषयी असणारा तिटकारा यांची युती सार्वजनिक संकट व महाभयंकर पेचप्रसंग याचे स्थान घेत आहेत. सध्याचे अमेरिकेतील मृत्यूचे तांडव, संसर्ग, दवाखान्यांचा तुटवडा आणि सार्वजनिक आरोग्य विपत्ती यांच्यामुळे तज्ज्ञांनी सरकारला दीर्घकालीन योजना आखणे, डावपेच आखणे, वाढीव चाचण्या करणे आणि संघराज्य सरकार व राज्य सरकारे यांच्यात समन्वय राखण्यासाठी हाक दिली आहे. अनेक गव्हर्नर्सनी तक्रार केली आहे की, सरकारच्या संघराज्य योजनेच्या अभावामुळे पश्‍चिमेकडील अराजकासारखी परिस्थिती तयार झाली आहे. ‘अभाव, अकार्यक्षमता आणि अराजकता यांनी अमेरिकन व्यवस्थेला घेरले आहे.’ अर्कान्ससचे गव्हर्नर विल्यम असे हुचिन्सन (रिपब्लिकन) यांनी याबद्दल तक्रार करताना म्हटले की, ‘आम्ही वैश्‍विक जंगलात स्पर्धा करत आहोत.’ गरजांची तीव्रता वाढवली गेली हे वास्तव आहे. कारण व्हाईट हाऊस आणि अमेरिकेचे नेतृत्व गडद होणार्‍या पेचप्रसंगाच्या प्रारंभीच्या टप्प्यामध्ये तत्काळ आणि तत्पर मदतकार्य करण्यामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर अपयशी ठरले. वॉशिंग्टन पोस्टने एक अहवाल प्रकाशित केला. त्याl असे नमूद केले की, ट्रम्प प्रशासनाला कोरोना विषाणूच्या महामारीबद्दल व त्याचे अमेरिकन जीवनावर होणार्‍या परिणामाबद्दल ७० दिवस अगोदर गंभीर इशारा दिल्यानंतरदेखील ते ढिम्म राहिले.  कोरोना विषाणूला दूरवरचा धोका किंवा त्याला एक साधा ताप म्हणून न पाहता ती एक महाभयानक राक्षसी शक्ती आहे, जी अमेरिकन अर्थव्यवस्थेला भुईसपाट करेल, असे स्पष्ट सांगितल्यावर सुद्धा ट्रम्प महाशयांनी कसलीच हालचाल केली नाही. अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेला ही महामारी नेस्तनाबूत करेल आणि त्यात लक्षावधी लोक मारले जातील, ह्या इशार्‍याकडे व्हाईट हाऊसने संपूर्ण दुर्लक्ष केले.

अर्थात, अशा दिशाहीन व बेपर्वा धोरणाच्या परिणामामुळे जे अनेक लोक मरत आहेत व मरणार आहेत त्या लोकांकडे नवउदारमतवादाच्या राजवटीने एक निरुपयोगी लोक म्हणूनच पाहिले आहे. परंपरेने आजपर्यंत अशा लोकांना बिनकामाचे लोक म्हणूनच पाहिले आहे. त्यामध्ये वयस्क लोक, बेघर, निर्धन-निराश्रित, गरीब, कृष्णवर्णीय लोक, कागदोपत्री नोंद नसलेले स्थलांतरित आणि विकलांग लोकांचा समावेश होतो. आघाडीच्या फळीमधील वैद्यकीय कामगार, ज्यांच्याकडे वैद्यकीय साधनांचा अभाव आहे, त्यांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. कारण ते वयस्क, आजारी आणि गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णांवर इलाज करीत आहेत.

या पेचप्रसंगामध्ये गोंधळ आणि अनावश्यक मानवी यातना यांना कारणीभूत असण्यामध्ये ट्रम्प यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी स्वतःचे नाहक प्रदर्शन केले. त्यांचे नैतिक अधःपतन झालेले आहे आणि त्यांना मिळालेली माहिती आधारहीन व खोटी होती. ट्रम्प हे नेहमीच अविचारीपणाकडे आणि स्वमग्नतेकडे झुकलेले दिसतात. तसेच, ते इतरांचा अपमान करण्यामधून आसुरी आनंद घेत असतात. स्टीफन ग्रीनब्लॅट यांनी ट्रम्प यांचे वर्णन अत्यंत समर्पक शब्दात केले आहे. ते म्हणतात, ‘ट्रम्प माणूसघाण्या स्वभावाचे आहेत. ते दुष्ट आणि विश्‍वासघातकी आहेत. ह्या दुर्गुर्णांची भरपाई करणारा असा एकही गुण त्यांच्यामध्ये नाही. ते हा देश परिणामकारकपणे कसा चालवू शकतील यावर विश्‍वास ठेवण्यासरखे एकही कारण दिसत नाही.’

ट्रम्पचा असंस्कृतपणा, खोटारडेपणा, विज्ञानाबद्दलची उपेक्षा आणि अनियंत्रित कारभार यामुळे अमेरिकेवर येऊ घातलेल्या महाभयानक संकटाबद्दल तज्ज्ञांनी अगोदरच दिलेल्या इशार्‍याकडे दुर्लक्ष झाले. राज्यांना व्यापक प्रमाणात कोरोना चाचणी करण्यासाठीचे किट आणि मुखपट्टया उपलब्ध करुन देण्यासाठी संघराज्य सरकारची ताकद कार्यान्वित करण्यामध्ये ट्रम्प सरकार मोठ्या प्रमाणात अपयशी ठरले. त्याचवेळी दवाखान्यात पुरेसे बेड्स, व्हेंटिलेटर्स, वैद्यकीय कर्मचार्‍यांकडे पुरेसे मास्क्स आणि कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर इलाज करण्यासाठी पुरेशी इतर व्यक्तिगत सुरक्षा साधने उपलब्ध राहतील याबाबत ट्रम्प सरकारने कोणतीच काळजी घेतली नाही. कोरोना महामारीला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांना केराची टोपली दाखवताना ट्रम्प यांचा अज्ञानी मनमानीपणा आणि निव्वळ निर्लज्जपणा याचे जाहीर प्रदर्शन झाले.

ईड पिकिंग्टन आणि टॉम मॅकॅर्थी यांनी ‘द गार्डियन’ मध्ये असा अहवाल दिला की, २० जानेवारी २०२० रोजी कोरोना विषाणू लागण झालेली पहिली केस उजेडात आल्यानंतर ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या संकटाला केवळ दुय्यमच लेखले नाही तर त्यांच्या सगळ्या कृती ‘गोंधळ आणि संभ्रमावस्थेमध्ये होत्या.’ राष्ट्रीय आरोग्य पेचप्रसंगाला तात्काळ रोखण्यासाठी कृती करायची सोडून ट्रम्प सरकारने सहा आठवडे वाया घालवले. त्यानंतर त्यांच्या प्रशासनाने या संकटाची तीव्रता आणि लोकांच्या व्यापक प्रमाणावर चाचण्या घेण्याची निकड यास गंभीरपणे घेतले. पिलकिंग्टन यांनी जेरेमी कॉनीनडॅक यांना उद्धृत केले. जेरेमी कॉनीनडॅक सन २०१३-१७ या काळात अमेरिकन सरकारने अनेक आंतरराष्ट्रीय आपत्तींना दिलेल्या प्रतिसादाचे नेतृत्व केले होते. त्यांनी असे नमूद केले की, ‘आधुनिक काळात आम्ही अमेरिकेतील पायाभूत प्रशासनाचे आणि पायाभूत नेतृत्वाचे सर्वात मोठे अपयश अनुभवत आहोत.’

राजकारणाला नाट्यगृहामध्ये आणि मनोरंजनाला क्रूरतेमध्ये रुपांतरित करण्याकडे ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांना जाहीरपणे सांगितले की, महामारीशी दोन हात करताना जे गव्हर्नर्स त्यांच्या प्रयत्नांचे ‘कौतुक’ करत नाहीत, अशा गव्हर्नर्सच्या फोनला त्यांनी उत्तर देऊ नये. वॉशिंग्टनचे गव्हर्नर जे. इन्सली आणि मिशिगनचे गव्हर्नर ग्रेटचेन व्हिटमर यांनी ट्रम्प प्रशासनाला अत्यंत आवश्यक अशा वस्तूंचा पुरवठा करण्याची कळकळीची विनंती केली आहे. ट्रम्प यांनी स्वतःवरील दोष दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांना अडचणीचे वाटणारे प्रश्‍न विचारणार्‍या वार्ताहर व पत्रकारांवर त्यांनी शाब्दिक हल्ले केले आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांनी असाही दावा केला की, ‘हॉस्पिटल्स्नी मुखपट्टया वाया घालवल्या किंवा त्यांनी त्यांचा योग्य वापर केला नाही. आणि त्यांनी व्हेंटिलेटर्स्चा ‘साठा’ केला आणि त्यांची आवश्यकता नसताना देखील राज्यांनी त्याचा पुरवठा करण्याची मागणी संघराज्य सरकारकडे लावून धरली.’ अत्यावश्यक मुखपट्टया ‘मागच्या दरवाज्याने पळवले जात असल्याचे’ सूचित करण्यापर्यंत ट्रम्प यांनी मजल मारली. अशा प्रकारच्या सशस्त्र क्रूरतेकडे दुर्लक्ष करणे खूप कठीण गोष्ट आहे. विशेषतः सोशल मीडियावर येणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांनी मास्कस्, गाऊन्स, व्हेंटिलेटर्स् आणि इतर महत्त्वपूर्ण सुरक्षा आणि जीवरक्षक साधनांचा पुरवठा करण्यासाठी कळकळीची विनंती केली. ट्रम्प यांचे नकाराचे राजकारण आणि स्वतत्त्व अस्तित्ववाद यापेक्षाही अनेक गोष्टी त्यांच्या राजकारणामध्ये लपलेल्या दिसतात. रॉबर्ट जे. लिफ्टन त्यास ‘प्राणघातक सर्वसामान्य परिस्थिती’ असे म्हणतात. त्याचे अर्थांतरण करताना मी असे म्हटले की, असे वर्तन हिंसेमध्ये आनंद घेते आणि अशा हिंसक गोष्टी करण्यासाठी क्रूरतेची जोड दिली जाते. आम्ही इतर क्षेत्रातील अशा क्रूरतेचे प्रतिध्वनी पाहिलेले आहेत. त्यामुळे लक्षावधी लोकांचे मृत्यू झाले. जसे की अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांना चौकशीशिवाय ठार मारण्यात आले आणि नाझी जर्मनीत ज्यूंचा संहार करण्यात आला. ट्रम्प यांचे संपत्ती आणि श्रेणीक्रमाबद्दलचे वेड व त्यांची स्वतःबद्दलची अमर्याद काळजी या केवळ त्यांना एक अकार्यक्षम नेता म्हणूनच अधोरेखित करत नाहीत तर एक धोकादायक भ्रष्ट व्यक्ती म्हणून देखील अधोरेखित करतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील तीव्र गतीने मृत्यूची संख्या वाढतानाच्या दरम्यान ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसच्या कोरोना विषाणू कार्यदल वृत्तांताबद्दलच्या (उच्च) श्रेणीबद्दल फारच फुशारकी मारली होती.

हे एक प्रकारचे राजकीय नाट्यगृह आणि महामारी अभ्यासक्रमाचे स्वरुप आहे, जे वाढणार्‍या मृत्यूची संख्या आणि मनोरंजनाच्या सेवेचे सशस्त्रीकरण करते. त्यांना शस्त्र म्हणून वापरते. आज अमेरिकेतील हॉस्पिटल्स् गर्दीने ओसंडून वाहताहेत. वैद्यकीय कर्मचार्‍यांकडे पुरेशी सुरक्षा साधने नसल्यामुळे ते मृत्यू पावत आहेत आणि सर्वात जास्त क्षती पोहचलेल्या न्यूयॉर्कसारख्या अनेक राज्याच्या गव्हर्नर्सच्या ट्रम्प यांच्यासोबत शाब्दिक चकमकी घडत आहेत. अशा वेळेला ट्रम्प यांच्या अकार्यक्षम नेतृत्वावर टीका करणार्‍या गव्हर्नर्सचा ट्रम्प यांनी अपमान करण्यात आनंद घेतला आहे. त्यांना अत्यावश्यक असणार्‍या वैद्यकीय साधनांचा पुरवठा करण्याऐवजी ट्रम्प यांनी त्यांच्यावरच टीका केली आहे.

जीवनाऐवजी मृत्यू, मानवी गरजांऐवजी भांडवल, करुणेऐवजी हाव, न्यायाऐवजी शोषण आणि सामायिक उत्तरदायित्वाऐवजी भीतीचे गुणगान गाणार्‍या नेक्रोपॉलिटिक्सला पुढे ढकलणार्‍यांमध्ये एकटे ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन नाहीये. नेक्रोपॉलिटिक्स ही अशी सामाजिक आणि राजकीय ताकद आहे, जी काही लोकांनी कसे राहावे आणि काही लोकांनी कसे मरावे याचे नियंत्रण करते.

कॉर्पोरेट मंडळांच्या खोल्यांमधील, मीडियामधील आणि व्हाईट हाऊसमधील ट्रम्प समर्थकांच्या समूहगानाला कसे विशद करावे? हे सगळे समर्थक देशाच्या हॉस्पिटल्सवर आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कडक निर्बंध लावण्याला रोखण्यासाठी वय आणि अपंगत्व यांच्या आधारावर जीवरक्षक साधने ठराविक प्रमाणात देण्यासाठी युक्तिवाद करताहेत. नाओमी क्लेन नमूद करतात, या महामारी पेचप्रसंगाच्या खूप अगोदर नवउदारमतवादाच्या प्रणेत्यांनी ‘राज्य-अर्थ साहाय्यित आरोग्य सोयी-सुविधा, स्वच्छ पाणी, चांगल्या सार्वजनिक शाळा, सुरक्षित कामाची ठिकाणं, निवृत्ती वेतन आणि वयस्क व दुर्बल घटकांसाठी इतर कार्यक्रमांना देण्यात येणारे अनुदान कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.’

त्याच वेळेला, शोषक भांडवलवादाने ‘सार्वजनिक जीवन आणि सार्वजनिक कल्याण यांच्या मूळ कल्पनेवर मोठा हल्ला केला आहे. त्याविरुद्ध भांडवलवादाने युद्ध पुकारले आहे. याचा एक परिणाम असा झाला आहे की, समाजाच्या मालकीची जेवढी काही मालमत्ता- जसे की रस्ते, पूल, पाणी व्यवस्था, पूरबांध-आहे ती आता अशा नादुरुस्तीच्या अवस्थेमध्ये जाणार आहे की, त्यास विभाजन बिंदूच्या पल्याड ढकलण्यास फारच कमी प्रयत्न करावे लागणार आहेत. जेव्हा सरकार प्रचंड मोठ्या प्रमाणात कर कमी करतात तेव्हा त्यांच्याकडे सार्वजनिक गोष्टींवर खर्च करण्यास पैसाच शिल्लक राहत नाही. सरकारे फक्त पोलिस आणि लष्करावरती खर्च करत राहते. हे असं घडते.’

वर्तमान पेचप्रसंगामध्ये काय पाहायला मिळत आहे? कोणत्या गोष्टी दृष्टोत्पत्तीस येत आहेत? गेल्या चाळीस वर्षांमध्ये वैश्‍विक अर्थव्यवस्थेवर ज्या नवउदारमतवादाने अधिराज्य गाजविले त्या नवउदारमतवादाचा रोग या महामारीमध्ये असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेचे ट्रम्प, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अशा इतर फॅसिस्ट राजकारण्यांनी नवउदारमतवादास सन्मानाचे चिन्ह म्हणून खूपच गौरवले आहे. संकटात सापडलेल्या वित्तीय संस्थांना दिलेल्या बेलआऊट पॅकेजमध्ये राज्यकर्त्या वर्गाचा भ्रष्टाचारसुद्धा लागलीच दिसून आला आहे. रॉब उरई यांचे निरीक्षण असे आहे की, ‘श्रीमतांसाठी बेलआऊट्स आणि आमच्यासाठी विषाणू.’

अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक श्रीमंत असे एक टक्का लोक सगळे फायदे घेतात आणि त्याच वेळेला गेल्या चार दशकांमध्ये श्रमिक वर्गाने त्यांच्या मजुरीमध्ये कसलीही वाढ पाहिली नाही. श्रीमंत लोक सगळे फायदे लाटणार आणि कामगार आजारी पडणार आणि ते मरणार. वित्तीय भांडवलवादाला आर्थिक पॅकेज देऊन वाचविल्या जात आहे. खरे तर सन २००९ मध्ये ते स्वतःच्याच ओझ्याखाली गुदमरायला हवे होते.

या महामारीच्या गडद छायेखाली असमानतेचा इतिहास, वापरा आणि फेकून दया, अबाधित क्रूरता आणि प्रतिगामी धोरण यासह फॅसिस्ट राजकारणाचे निर्लज्ज पुनरुज्जीवन होत आहे. अमेरिकेमध्ये नंतरच्या नवउदारमतवादी मूलभूत तत्त्वांना दीर्घ वारसा लाभलेला आहे. ट्रम्प प्रशासनाखाली हा नवउदारमतवाद बदला घेण्याच्या उद्दिष्टाने परतला आहे. हा नवउदारवादी फॅसिझम दहशतीच्या पुनरुत्थानाचा इशारा आहे. त्यामध्ये वंशीय संघराचे गूढगंभीर प्रतिध्वनी ऐकू येतात. हिटलरच्या राजवटीमध्ये वंशशुद्धीकरणाचे धोरण अवलंबिले होते, ज्यानुसार निकृष्ट वंशाच्या लोकांना मारुन श्रेष्ठ वंशाच्या लोकांना संरक्षण दिले गेले होते. शेवटी फॅसिझमने छळछावण्या उभारुन ज्यूंचा संहार केला. पेचप्रसंगाच्या अशा काळामध्ये अर्थव्यवस्थेला पुन्हा चालू करण्यासाठी ही योजना तयार केली होती. आम्ही अनेक रोग असलेल्या काळात जगत आहोत. हा बहुरोगकाळ वर्तमान कोरोना विषाणू महामारीस इंधन पुरवत आहे. ही महामारी संपूर्ण विश्‍वाला वेढते आहे. त्याने संपूर्ण विश्‍वाला आर्थिक पीडा, दुःख आणि मृत्यू यांनी बेजार केले आहे. आज हे सगळे रोग घातक टॉरनॅडोच्या गतीने समाजांमधून फिरत आहेत. यामध्ये पर्यावरणीय विध्वंसाचा रोग, नागरी संस्कृतीचे अधःपतन, अणुयुद्धाची शक्यता आणि क्रूरतेच्या पाशवी संस्कृतीचे सर्वसामान्यीकरण यांचा समावेश होतो.

नवउदारमतवादी रोगाने कल्याणकारी राज्यावर सर्वंकष हल्ला केला आहे. असे करताना त्याने शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासारख्या संस्थांचे अनुदान कमी केले आहे व त्यांना दुर्बल केले आहे. याशिवाय, ह्याने बहुसंख्य अमेरिकन लोकांना सत्तासंबंध आणि प्रशासनाच्या वेगवेगळ्या पद्धतींपासून वेगळे केले आहे.

खरे तर हे सत्ता संबंध आणि प्रशसनाच्या वेगवेगळ्या पद्धती अमेरिकन लोकांना नैसर्गिक आपत्ती, महामार्‍या आणि पृथ्वीवरील पेचप्रसंगाशी गंभीरपणे आणि हुशारीने सामना करण्यास सक्षम करेल. मार्केट या पेचप्रसंगांना सोडवू शकत नाही. या महामारीच्या कालावधीमध्ये वर्तमान राजकीय विचारधारात्मक आणि वैद्यकीय पेचप्रसंगाच्या केंद्रस्थानी राज्यकर्त्या वर्गाच्या सत्तेचं विष दिसत आहे. फ्रँक रिच खालीलप्रमाणे युक्तिवाद करतातः

… या महामारीने, विशेषतः स्पष्ट संकल्पनेमध्ये, हे दाखवून दिले आहे की, सन २००८ च्या आर्थिक पडझडीने उघडी पाडलेली टोकाची आर्थिक असमानता आजही सोडवली गेली नाहीये. या वास्तविक काळात अजस्त्र गतिकीय कार्य करत आहे. समाजातील अनेक सेलिब्रिटिज आणि श्रीमंत लोक कोरोना विषाणू चाचणीच्या जीवरक्षक बोटीसाठी असलेल्या रांगेत आज सर्वात पुढे उभे आहेत. रुपर्ट मरडॉक आणि त्यांचे कुटुंबीय स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण करताहेत. त्याचेवेळी ते त्यांच्या माध्यम साम्राज्यामधून मोठा नफा कमावत आहेत. ह्याच माध्यम साम्राज्याने कोरोना विषाणूच्या संकटाला दुय्यम लेखले होते आणि कोरोना महामारी संकट आहे की नाही यावर उघडपणे वाद घातला होता …

देशाच्या वर्तमान मध्यवर्ती भागामधून हा विषाणू पसरत असताना उच्चभ्रू आणि नाही-रे वर्गातील कुरुप विसंगती ह्या परजीवीला ‘मॉडर्न- फॅमिली’ ह्या अमेरिकन टीव्ही मालिकेमधील एका भागासारखे मायाळू, कनवाळू बनवित असल्याचे दिसते. इतर अनेक रोगांमध्ये एक दुसरा रोग उदयास आला आहे. फॉक्स न्यूज आणि ब्रेटबार्ट मीडियासारख्या उजव्या विचारसरणीच्या सांस्कृतिक हत्यारांचा उदय झाला आहे. ही माध्यमे सत्याचा तिरस्कार करतात; विज्ञानाला स्वतःच्या मार्गातील अडथळा समजतात आणि चिकित्सक विचाराला “फेक न्यूज” म्हणून मलीन करतात. हा स्वइच्छित अज्ञान आणि राज्य निबंधित नागरी निरक्षरतेचा रोग आहे. अशा परिस्थितीमध्ये भाषा सत्तेच्या सर्वोच्च स्तरावर आणि ताकदवान प्रतिगामी सांस्कृतिक हत्यारांमध्ये नकार, खोटारडेपणा आणि हिंसा यांच्या सेवेत कार्यान्वित असते. हा मीडिया अव्याहतपणे ट्रम्प यांची दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड होऊ नये म्हणून ‘डीप स्टेट’ ने या महामारीची निर्मिती केली आहे, असे सिद्धांत समाजात पसरवत आहे. ही महामारी डेमॉक्रॅटिक पक्षाने तयार केली आहे, असा प्रचार ट्रम्प पुरस्कृत मीडिया सातत्याने करत आहे.

हा कोरोना विषाणू सामान्य तापापेक्षाही फारच कमी धोकादायक असल्याचा प्रचार हा ट्रम्प मीडिया करत आहे. असे नवनवीन सिद्धांत पेरुन विरोधकांची बदनामी करण्याचा सपाटाच ट्रम्प मीडियाने चालवल्याचे दिसत आहे. डीप स्टेट म्हणजे सत्ताधारी पक्षाला वा त्याच्या राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात विरोधी पक्ष, पत्रकार, किंवा लष्करातील प्रभावी व्यक्तींनी केलेले षडयंत्र होय. त्यांनी अखंडपणे यावर भर दिला की, सगळे सामाजिक प्रश्‍न हे व्यक्तिगत जबाबदारीची गोष्ट आहे. अशा प्रकारे त्याने जनतेचे राजकीयीकरण केले. त्यांना नवफॅसिस्टांनी केलेल्या दाव्याप्रती उदासीन बनवले.

नवफॅसिस्टांनी असा दावा केला आहे की, नागरिकांची काळजी घेण्याची कोणतीच जबाबदारी सरकारची नाहीये किंवा समाजाचे संघटन, परस्पर आदर, काळजी, सामाजिक अधिकार आणि आर्थिक समानता अशा मुद्यांभावेती होता कामा नये.

वर्तमान पेचप्रसंग हे उदासीनतेच्या अभ्यासक्रमीय आपत्तीने ठरविलेल्या एका काळाचा भाग आहेत आणि ते नैतिक जबाबदारीच्या कोणत्याही करता येण्याजोग्या विचारापासूनची पळ काढणारी कृती आहे. दुर्बलतेबद्दल तिरस्कार, बेसुमार फैलावलेला वंशद्वेष, भावनेची विवेकावरील कुरघोडी, नागरी संस्कृतीची पडझड आणि संपत्ती व स्वहित संबंधाबद्दलचा हव्यास इत्यादी गोष्टींनी या काळास वैशिष्ट्यीकृत केले आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही केवळ राजकीय पेचप्रसंगामध्ये नाही आहोत तर शैक्षणिक पेचप्रसंगामध्ये देखील आहोत. यामध्ये सत्ता, शासन, ज्ञान आणि पुरावा व सत्याबद्दलची घृणा या गोष्टींनी सत्याची तोडफोड केली आहे आणि त्याने लक्षावधी लोक आणि या पृथ्वीलाच धोक्यात आणले आहे. हे असे राजकारण आहे, ज्याला अकल्पिताच्या यंत्राने इंधन पुरविले आहे. त्याचे राजकीय आणि सांस्कृतिक कार्यकेंद्र सत्य, न्याय, नैतिकता तयार करतात आणि यापैकी बर्‍याच गोष्टी अनेक व्यक्ती एकाधिकारशाहीवादाच्या विवरामध्ये गडप होतात. त्यांना नष्ट केले जाते.

या रोगास संपवण्यासाठी नवउदारमतवादी फॅसिझमच्या विचारधारांचा प्रश्‍न सोडवणे किंवा त्यांचा मुकाबला करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा फॅसिझम लोकांना खासगी संकटे व्यापक सर्वांगीण समस्यांमध्ये रुपांतरित करण्यास मज्जाव करतो. व्यक्ती समूहाचा भाग नाही तर तो सुटा सुटा आहे असे मानणारी अणुबंधित्ववादी विचारधारा (atomization) आणि खासगीकरण संस्कृतीच्या पल्याड जाण्यासाठी लोकांना पटवावे लागेल. त्यासाठी शिक्षणशास्त्रीय रीतीने लढा देणे गरजेचे आहे.

ही संकुचित अणुबंधित्ववादी व खासगीकरण संस्कृती चंगळवादी समजाला चालना देते आणि व्यापक मुद्यांपासून वेगळे काढलेल्या एकेरी समस्यांच्या राजकारणाला मजबूत करते. हे राजकीय पेचप्रसंग एक सामाजिक एकूणतेचे पेचप्रसंग म्हणून समजून घेतल्या जाऊ शकतात. यामध्ये ‘लोकशाहीवादी दुष्ट शक्तींचा पल्ला हा प्रामुख्याने सर्वसाधारण पेचप्रसंगाच्या राजकीय परिस्थितीचा बनलेला असतो आणि हे राजकीय पेचप्रसंग आपल्या सर्वांगीण सामाजिक व्यवस्थेला वेढून घेत आहेत.’ आपण अशा काळात राहत आहोत ज्यामध्ये हे मान्य करणे अधिक विश्‍वासार्ह होत आहे की, भांडवलवाद आणि लोकशाही व्यापक असमानता आणि मानवी यातना नाहीये तर तो मृत्यूची पाशवी यंत्रसामग्री आहे. या यंत्रसामग्रीमध्ये मानवजात विलोप काळाच्या केवळ एक पाऊल जवळ आहे. हे असे सूचित करते की, पेचप्रसंगाचे अनेक परिणाम असू शकतात. एका बाजूला एकाधिकारवाद आणि अत्याचारामध्ये वाढ होते किंवा दुसर्‍या बाजूला लढा देण्यास इच्छूक असलेल्या प्रतिरोध चळवळींचा वेगवेगळ्या पातळ्यांवर उदय होतो. ब्रॅड इव्हान्स यांनी या काहाला बहुअपवर्जक, व्यापक दहशत, वाढत्या प्रमाणावरील हद्दपारी आणि समाज राज्याचा पोकळपणा किंवा अधःपतनाचा काळ म्हटले आहे. ह्या काळास या प्रतिरोध चळवळी नकार देतात.

कोरोना विषाणू महामारीने पाशवी नवउदारमतवादाच्या शक्तीला आणि त्याच्या वैश्‍विक वित्तीय बाजाराला-त्याच्या संपूर्ण क्रूरतेला उघड करण्यासाठी पडदा मागे सारला आहे. ही अशी व्यवस्था आहे जिने केवळ समतेच्या लोकशाहीवादी आदर्शाची व लोकप्रिय सार्वभौमत्वाचीच झीज केली नाही तर तिने अशा राजकीय व आर्थिक परिस्थिती तयार केली ज्यामध्ये महामारीने मृत्यू पावणार्‍या रुग्णांची संख्या कमी करणार्‍या, रुग्णांची संख्या कमी करणार्‍या आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी इतर अत्यावश्यक साधनांचा व व्हेंटिलेटर्स्चा अभाव असणार्‍या हॉस्पिटल्स् व वैद्यकीय कर्मचार्‍यांवर कमालीचा ताण आणला आहे. ही गोष्ट कशाकडे निर्देश करते? तर वर्तमान ऐतिहासिक अनुमानामध्ये असलेल्या अशा एका क्षणाकडे ज्यामध्ये निघून जाणारा एक कालावधी आणि सुरुवात होणारा नवीन काळ यांच्यामध्ये जो एक अवकाश असतो तो पुरोगामी लोकशाहीसाठी वैश्‍विक चळवळ गतिशील करण्यासाठी आणि राजकीय कल्पनेसाठी शक्यता उपलब्ध करुन देतो.

वर्तमान विषाणू महामारीची चर्चा राजकारण आणि शिक्षणाच्या पेचप्रसंगाच्या कक्षेबाहेर केल्या जाऊ शकत नाही. वर्तमान महामारी पेचप्रसंग समजून घेण्यासाठी नवीन परिभाषेची आवश्यकता आहे. अशा परिभाषेचे नवउदारमतवादी फॅसिझमच्या अपवर्जन, शोषण आणि वंशीय शुद्धतेच्या चर्चाविश्‍वासह अव्याहत समीक्षा उपलब्ध करुन दिलीच पाहिजे. अशा चर्चाविश्‍वाने अदृश्य कारणांची सोडवणूक केली पाहिजे. हे सगळे सुधारणेची निकड म्हणून न करता एका नवीन राजकीय आणि आर्थिक समाज व्यवस्थेचे ध्येय असलेल्या पुरोगामी पुनर्बांधणीचा प्रकल्प म्हणून करावयास हवे. अमर्त्य सेन म्हणतात की, आपण सर्वांनी ‘समाजाबद्दल मोठा विचार करण्याची गरज आहे.’ वर्तमान पेचप्रसंगाने आपणास हतबल केले असले तरीही आपण एकाकी व्याकूळ आणि असहाय्य असण्याच्या पल्याड पाहण्याची गरज आहे. हंगेरी, इजिप्त, फिलीपिन्स, थायलंड, इस्त्रायल अशा देशांमध्ये या महामारीने नागरी स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, आणि नागरी अधिकारांवर बंधने टाकण्यासाठी अनन्यसाधारण परिस्थिती तयार केली. त्याचवेळी तिने या देशांमध्ये उदयास येणार्‍या एकाधिकारशाहीवादाच्या शक्यतेला तीव्र केले आहे. यात शंकाच नाही की, कोरोना पेचप्रसंग जगभरामध्ये लोकशाहीच्या मर्यादांची परीक्षा घेईल. त्याचवेळी पेचप्रसंगाची गंभीरता व विशालता नवीन शक्यता उपलब्ध करुन देईल, ज्यामध्ये लोक कोणत्या प्रकारच्या समाजात, जगात आणि भविष्यात राहू इच्छितात याबद्दल पुनर्विचार करण्यास सुरुवात करतील. लोकशाही आणि भांडवलवाद हे समान आहेत असे दाखवणार्‍या व्यवस्थेकडे आपण परत जाऊ नये, यासाठी आपण सजग असायला हवे. आपण व्यवस्थेला सुधारण्याच्या पल्याड जायलाच हवे कारण वर्तमान पेचप्रसंगाला खोल राजकीय आणि आर्थिक मुळे आहेत आणि ते समाजाच्या संपूर्ण पुनर्रचनेची मागणी करते. डेव्हिड हार्वे यांचा युक्तिवाद योग्य आहे. ते म्हणतात ‘सध्या मूलभूत समस्या या खरोखरच एवढ्या खोल आहेत की, आपण अत्यंत मजबूत अशा भांडवलवाद विरोधी चळवळीशिवाय कुठल्याही मार्गावर चालू शकणार नाही व कुठेही पोहचू शकणार नाही.’

महामारी पेचप्रसंग ओसरल्यानंतर आपणाला मानवी गरजांची सोडवणूक करणारा समाज किंवा जे सशक्त असतील तेच टिकतील असे वातावरण असणारा समाज यापैकी एकाला निवडावेच लागणार आहे. तसेच, युद्ध अत्यंत दुर्मिळ असेल आणि ‘स्पर्धा’ किंवा ‘संघर्ष’ अशा संकल्पना फारच सर्वसामान्य असतील अशा तत्त्वाने समाजाची बांधणी करावी लागेल.

नवीन दृष्टी, सार्वजनिक संहिता आणि अभ्यासक्रमीय कथानकांचा हा काळ आहे. ह्या गोष्टी राजकारण, ऐक्यभाव, जन विरोध आणि लोकशाहीला नवीन अर्थ प्राप्त करुन देतील. अजूनही आपल्याकडे पाशवी नवउदारमतवादी वर्तमानाची नक्कल न करणारे भविष्य असलेल्या जगाची पुनर्कल्पना करण्याची संधी आहे. हे असे जग असायला हवे जे जग न्याय, मुक्ती आणि लोकशाहीला नवीन अर्थ प्राप्त करुन देतील. हे असे जग असायला हवे जे जग न्याय, मुक्ती आणि सामाजिक समता यांच्यासाठीच्या संघर्षांना एकत्र आणेल. न्याय व लोकशाही समाजवादी समाजाच्या युटोपियन/आदर्शवादी वचनाची कल्पना करणारे व त्यावर कार्यवाही करणार्‍या जगासाठी आपण  सर्वांनी संघर्ष करण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाली आहे. कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्ये टीका, समंजसपणा आणि विरोध ह्या गोष्टी जीवन किंवा मृत्यूच्या गोष्टींमध्ये रुपांतरित झाल्या आहेत. विरोध हा आता विकल्प न राहता ती एक अत्यावश्यक गरज झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा