मोराचे पाय!

0
538
संग्रहित छायाचित्र.

अठ्ठावीस दिवस राहून अंड्यातून बाहेर आलेला एक मोर साधारण वीसएक वर्षे जगतो. म्हणजे चार सरकारे पाहू शकतो! लांडोर दोन वर्षांपासून अंडी घालायला लागते ते वीस वर्षांपर्यंत दरवर्षी तीन-चार या प्रमाणात अंडी घालतच राहते. यावरुन मोरांची संख्या किती वाढत जाते हे लक्षात घ्यायला हवे. मोर हा सहसा घरटे बांधत नाही. लांडोर जमिनीवर-झाडाझुडपात आपली अंडी घालते, पण अत्यंत अपवादात्मक स्थितीत ती एखाद्या झाडावर ओबड-धोबड घरटे बांधून अंडी घालण्यापुरती तात्पुरती व्यवस्था करते. कधी कधी साध्यासुध्या माणसाच्या घरावरही ती अंडी घालण्यापुरता घरबो करते आणि नंतर घरटे सोडून निघूनही जाते. गृहत्याग केलेला एक फकीरच जणू!

  • संदीप बंधुराज

मोर हा राष्ट्रीय पक्षी! म्हणजे पक्षांचा प्रधानमंत्रीच!! २६ जानेवारी १९६३ रोजी तो राष्ट्रीय पक्षी म्हणून सन्मानला गेला तरी त्यापूर्वीपासूनच त्याला मोठा सन्मान प्राप्त झालेला होता. माणसांबरोबरच वन्य व अन्य जीवांवरही प्रेम करणाऱ्या व त्यांच्यासाठी दाणा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी शासकीय कोष खर्च करणाऱ्या मानवतावादी सम्राट अशोकाच्या चलनी नाण्यांवरही मोर असायचा. तर कलात्मक दृष्टीचा बादशहा शहाजहान हा तख्त-ए- ताऊसवर विराजमान व्हायचा. (अरबीत ताऊस म्हणजे मोर). सिकंदराने भारतातून अनेक मोर सोबत नेले आणि त्यामुळेच युरोपात मोर दिसतात अशी नोंद सापडते. अर्थात हे मोर भारतातील मोरासारखे आकर्षक नाहीत. आफ्रिकेत तर पांढरे मोर सापडतात. रंगीबेरंगी मोरांची सर त्यांना कुठे? मोर हा अशा प्रकारे भारतीय पक्षी आहे. तो या मातीतला आहे!

मोराचा आकर्षक रंग, त्याचा तो पिसारा आणि तो फुलवून त्याचं ते नाचणं हे अत्यंत मनमोहक असतं. भुरळ टाकणारं असतं. त्याचा केकारव (आवाज) तेवढा काही मंजुळ नसला तरी कुठे दूरवरुन कानावर पडला तरी मन थुईथुई नाचू लागतं! मोराचे पंख तर अनेकांच्या मुकुटाची शोभा वाढवतात. बासुरीधारी मेंढपाळ बालक-मोर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मोर्य यांच्या मुकुटातही मोरपीस दाखवले जाते. मोरपंखाची भेट एखाद्या मित्राला, मैत्रिणीला दिली किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीला दिली की आपल्या सर्व कोमल भावना अगदी आहेत तशाच हळुवारपणे पोहोचतात! तर असा हा भारतीय जनतेचा पक्षीनेता!

मोराच्या रंगाबरोबरच त्याच्या डोक्यावरील तुरा त्याला विशेष शोभतो! तोच तर त्याचा रुबाब वाढवतो. शास्त्रीय कारण काहीही असो पण एक कथानक असे सांगते की, ‘एकदा जंगलाचा राजा सिंह खूप हैराण झाला होता. त्याच्या घशात एक हड्डी अडकली होती. त्यावेळी मोराने आपली बारिक चोच त्याच्या जबड्यात घालून  हड्डी काढून टाकली. तेव्हा सिंहाने खुश होऊन आकर्षक मुकूट त्याला बहाल केला’. ही कथा गंमतीशीर वाटली तरी अभ्यासक असे म्हणतात की, सिंह व मोर हे मित्र आहेत. अनेकांनी सिंहाच्या जबड्यात चोच घालणारा मोर पाहिलेला आहे! कथा सोडून जर या तुऱ्याच्या उगमाची प्रक्रिया पाहिली तर ती अत्यंत भयानक आहे.

लहान मुलांना जसे दात येताना त्रास होतो त्याहीपेक्षा भयानक वेदना मोराला हा तुरा येताना होतात. अनेक मोर हा तुरा येण्याच्या प्रक्रियेत वेदनेने मरुनही जातात. पण हा जीवघेणा तुरा जेव्हा येतो तेव्हा अनेक माणसांच्या जीवाला मोहून टाकतो. खरे आहे राजमुकूट मिरवायचा म्हणजे जीवघेणा त्रास तर होणारच. पण एकदा राजमुकूट मिळाला की मग भल्या भल्या सिंहांच्याही जबड्यात तोंड घुसवता येतं….!

अठ्ठावीस दिवस राहून अंड्यातून बाहेर आलेला एक मोर साधारण वीसएक वर्षे जगतो. म्हणजे चार सरकारे पाहू शकतो! लांडोर दोन वर्षांपासून अंडी घालायला लागते ते वीस वर्षांपर्यंत दरवर्षी तीन-चार या प्रमाणात अंडी घालतच राहते. यावरुन मोरांची संख्या किती वाढत जाते हे लक्षात घ्यायला हवे. मोर हा सहसा घरटे बांधत नाही. लांडोर जमिनीवर-झाडाझुडपात आपली अंडी घालते, पण अत्यंत अपवादात्मक स्थितीत ती एखाद्या झाडावर ओबड-धोबड घरटे बांधून अंडी घालण्यापुरती तात्पुरती व्यवस्था करते. कधी कधी साध्यासुध्या माणसाच्या घरावरही ती अंडी घालण्यापुरता घरबो करते आणि नंतर घरटे सोडून निघूनही जाते. गृहत्याग केलेला एक फकीरच जणू!

भारतातल्या लोकांचे काही खरे नाही. त्यांना मोराचे कौतुक पहावत नाही. विशेषत: शेतकऱ्यांना! कारण ते या सुंदर, मनमोहक राष्ट्रीय पक्षाला आपला दुश्मन मानतात. कमाल आहे व्बा! शेतकरी भयावह सापाला मित्र मानतो पण तुर्रेबाज मोराला दुश्मन! राजस्थानमध्ये तर गेल्यावर्षी एका शेतकऱ्याने 23 मोर मारुन टाकले. त्याच्या आदल्यावर्षी तामिळनाडूत एका शेतकऱ्याने 47 मोर मारुन टाकले. गोव्यातील तत्कालिन कृषिमंत्री रमेश तवडकर यांनी तर मोराला विघातक पक्षांच्या यादीत टाकण्याचा विचार केला होता. या राष्ट्रीय पक्षाच्या जीवावर राष्ट्रीय पक्ष भाजपचे (त्यावेळी) सदस्य असलेले मंत्री का उठले असतील बरं?  

केरळ, कर्नाटकातही शेतकऱ्यांनी मोरांच्या विरोधात आवाज उठवला. महाराष्ट्रातही विशेषत: नाशिकमधल्या खेडलेझुंगेतील द्राक्ष बागायतदारांनी कोरोनाच्या संकटाबरोबरच मोरादी पक्षांच्या संकटावर आवाज उठवला आहे. असे का? एक गोष्ट खरी, की शेतकरी विनाकारण कुणाविरोधात आवाज करत नाही. मोर हा असा पक्षी आहे की, तो दिसतो सुंदर पण त्याची करतुद काळी आहे. (…. ,बगल में छुरी सारखा!) तो शेतीचं प्रचंड नुकसान करतो. बरं त्याची संख्या एवढी असते की त्याच्या पिलावळीचा संपूर्ण संघच एखाद्या पिकात घुसतो आणि नवांकुर, तयार झालेले दाणे नष्ट करुन टाकतो. बरं त्याला मारलं की राष्ट्रीय पक्षाला मारल्याचा गुन्हा!

बऱ्याचदा शेतीवर फवारलेल्या किटकनाशकांच्या अप्रत्यक्ष सेवनाने मोर मरतात पण दोष शेतकऱ्यावर येतो. शेतकरी मेला तरी चालेल पण मोर मरता  कामा नये! मोराचे आवडते खाद्य साप त्यातही नाग आहे! संपूर्ण नागवंशाच्याच मुळावर तो उठलेला असतो. सापाचे मुख्य खाद्य उंदीर! तो बिळात घुसूनही उंदराचा फडशा उडवतो. उंदीर शेतकऱ्याचा दुश्मन; त्यामुळेच तर सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. अनेक शेतकरी केवळ अज्ञानापोटी घाबरुन सापाला मारुन टाकतात. उंदीर शेतकऱ्याचे जसे अतोनात नुकसान करतो तसेच मोरही करतो. त्यामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान होतेच! मग शेतकऱ्याचा विकास कसा होईल? ही बाजू लक्षात घेतली की या राष्ट्रीय पक्षाचा संघ राष्ट्रीय उद्योगाच्या (म्हणजे शेती; ही भाकडकथा नाही, सत्य आहे. पूर्वी शेतकरी, कणसे आदी गोष्टी आपल्या नाण्यांवर असायच्या) आड कसा येतो हे कळेल. त्यामुळेच शेतकरी या पक्षाला आपला दुश्मन मानतात. असो. आपल्याला काय त्याचे! आपण केवळ मोराला ‘नाच रे मोरा म्हणू’ आणि पिसारा फुलवण्याची विनवनी करुन क्षणिक आनंद घेवू!

आता हा मोर नाचतो, तो पिसारा फुलवून हे खरं पण ज्या पायांवर तो उभा आहे त्या पायांकडे कधी आपला सर्वसाधारणपणे लक्ष जात नाही. तसंही एवढ्या सुंदर मोराच्या कुरुप पायांकडे पाहणे म्हणजे नकारात्मकताच नाही का? लहानपणी अशी एक कथा ऐकली होती की, टिटवी या पक्षाने आपले पाय देवून मोराचे पाय एका कार्यक्रमासाठी उसणे नेले ते परत दिलेच नाहीत. (टिटवी पाय वर करुन झोपते. असे म्हणतात की, ती आभाळ पडू नये याची काळजी घेते, एवढा पायांवर विश्वास, हे तेच पाय!) त्यामुळे मोर जेव्हा नाचता नाचता आपल्या कुरुप पायांकडे बघतो तेव्हा तो दु:खी होतो आणि नाचणे थांबवतो, असंही म्हणण्याची प्रथा आहे! (विज्ञान तसे मानत नाही). पाय जेवढे मजबूत तेवढी नाचण्याची ताकद अधिक हे कोणीही मानेल. पाय थकले की मोर थांबत असेल. जो मोर जास्त काळ नाचेल त्याचीच निवड लांडोर करतो!

मोर हा केवळ राष्ट्रीय पक्षी आहे म्हणूनच त्याचे संवर्धन झाले पाहिजे असे नाही तर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे म्हणून. त्यात माणूस प्राणीही आलाच! हे लक्षात घेवून सम्राट अशोकाच्या काळात माणूस व अन्य प्राणी,पक्षी यांची अशी काही व्यवस्था केली गेली होती की, जेणेकरुन ते एकमेकाला त्रासदायक होत नव्हते! मोर हा विकास मानला तर सर्वसामान्य जनता त्याचे पाय मानावे लागतील. केवळ विकासाचा मोर नाचवत न बसता सम्राट अशोकाने मोराला दाणापाणी करताना कदाचित त्याचे पायही पाहिले असतील…विचारात घेतले असतील….!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा