Act of (नकली) God!

0
161
संग्रहित छायाचित्र.

देशाला आर्थिक संकटात टाकणारा देव म्हणजे तो पुराणातला देव नाही, हा तर या कलियुगातला देव! कली देव किंवा नकली देव आहे! मग सुरुवात केली हा कलियुगातला देव शोधण्याची! सुतावरुन जसा स्वर्ग गाठतात तसा भक्तांवरुन देव शोधला! आणि तो सापडला तेव्हा सत्यवचनीपणाबद्दल निर्मला मॅडमच्या पायावर लोटांगणच घालावे असंच वाटलं… ! या नकली देवाला वठणीवर आणण्यासाठी जनताजनार्धनाने त्याचे दोनच डोळे उघडले नाही तर भयान काळोखात थाळ्या वाजवण्याची पाळी देशावर येईल!

  • संदीप बंधुराज

‘जेव्हा जेव्हा जग संकटात आले तेव्हा तेव्हा भगवान विष्णूने तब्बल दहा अवतार घेतले’, हे मी लहानपणीच वाचले. हे संस्कार एवढे खोल रुजले की या अवतारांचे आकर्षण वाटू लागले. सर्व अवतार कार्य वाचून काढले. त्यातला सर्वात आवडलेला अवतार म्हणजे ‘वराह’ अवतार! भगवान विष्णूचा तिसरा अवतार! हरण्यक्ष (असेच काही तरी नाव होते) नावाचा राक्षस एवढा मातला की त्याने अख्खीच्या अख्खी पृथ्वी सागरात बुडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवानाने वराह अवतार घेवून ती वाचवली. हरण्यक्षाचा नाश केला आणि पृथ्वी वर काढली. आज जी पृथ्वी दिसतेय ती त्या वराहाचीच कृपा!

खरेतर संपूर्ण जगावर वराहाचे हे एवढे मोठे उपकार आहेत. जर पृथ्वीच नसती तर आपण जन्माला तरी आलो असतो का? विज्ञान-तंत्रज्ञानाचा टेंभा मिरवणारे वैज्ञानिक तरी जन्मले असते का? मग किती महान वराह! ‘वराह’ हा वंदनीय असा राष्ट्रीय प्राणी असला पाहिले. वराहाची ठिकठिकाणी पूजा व्हायला पाहिजे. त्याच्या हत्येवर बंदी यायला पाहिजे. त्यावेळी वराह मी फक्त चित्रात पाहिलेला! असो. तर विष्णूंची लिला सर्वांनाच कळत नाही. (ठराविक लोकांनाच कळते!) आतापर्यंत विष्णूला काही सर्वसामान्य माणसांनी पाहिलेले नाही पण जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येते तेव्हा तेव्हा तो मदतीला धावतो असे अनेक लोक मानतात. राक्षसांनी संकटे निर्माण करावी आणि विष्णूने ती निवारावी!

आता कारोना संपूर्ण जगाला गिळंकृत करायला सज्ज झाला आहे. त्राही त्राही माजली आहे! अशा काळात एखादा अवतार होऊन जायला हवा होता. तोही भारतात. अर्थात अवतार भारतातच जन्म घेतात! बाकीच्या अज्ञानी व अधर्मी जगाला शोधत बसू देत लस! पण झाले उलटेच! कोरोनाचे संकट निर्माण करुन संपूर्ण जगाला संकटात टाकण्याचे काम तर साक्षात देवानेच निर्माण केले आहे, (Act of God)  असा आरोप भारत सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अधिकृतपणे केला. तेव्हा मला लक्षात आले की हे काम राक्षसाचे नाही, देवाचेच आहे त्यामुळे देव अवतार कसा घेईल? त्यातही हे कलियुग! आणि कलियुगात भगवान अवतार घेणार नाहीत असंही मी लहानपणी कुणाकडून तरी ऐकलेले!

सरकार जेव्हा कोणतीही गोष्ट बोलते तेव्हा त्यात काही तरी गर्भितार्थ दडलेला असतो हे किमान २०१४ पासून तरी आपण जाणत आहोत. मग निर्मला सितारमण यांच्या बोलण्याचा गर्भितार्थ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्या कोणत्या परिस्थितीत बोलल्या हेही तपासावे लागले. तर लक्षात आले की, कोरोनामुळे लॉकडाऊन लावावे लागले. त्यामुळे नागरिक बेहाल झाले. कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले. सरकारचा महसूल बुडाला. नव्यानेच जन्माला घातलेले बाळ जीएसटी कुपोषित होवू लागले. जीडीपीचा पाय घसरु लागला. शेवटी दात कोरुन पोट भरण्याची वेळ आली. फायद्यातल्या सरकारी कंपन्या विकून पैसा उभा करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही अर्थव्यवस्थेची टायटॅनिक सावरेचना! त्यात करुन राज्यांकडून केंद्राकडे पैशासाठी तगादा लावला गेला. राज्यांना वाटले बुडत्याला काडीचा आधार मिळेल पण ही काडीच बुडती निघाली!

२०१४ पासून भारतात अनेक ऐतिहासिक गोष्टी होत आहेत. आता त्यात आणखी एक भर पडली आहे. देशाचा जीडीपी पहिल्यांदाच उणे २३ टक्के एवढा घसरला. हे सर्व या कोरोनामुळेच घडले असे वाटेल पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५७-५८ ला सर्वात प्रथम जीडीपी उणे १.२ टक्के एवढा घसरला होता. त्यावेळी निवडणुकांचे वारे वाहत होते. त्यानंतर १९६५ मध्ये जीडीपी उणे २.६ टक्के एवढा घसरला त्यावेळी चीन-पाकिस्तानबरोबर युद्ध झाले होते. त्यानंतर १९७२-७३ मध्ये उणे ०.६ टक्के जीडीपी घसरला होता. त्यावेळी इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला होता. (इंदिरा हटल्या, पण गरिबी हटली नाही मात्र गरिबांना हटवण्याचा कार्यक्रम आजही सुरुच आहे, आज देशात ८० कोटी लोक गरीब आहेत, असे सरकारच म्हणते. म्हणजे केवळ ३४ टक्के लोकांचीच गरिबी हटली) त्यानंतर सर्वात कमी म्हणून आतापर्यंत ज्याची नोंद होत होती तो १९७९-८० चा उणे ५.२ टक्के जीडीपी. त्यावेळी मोठे आर्थिक संकट आले होते. त्यातून देशाला बाहेर काढण्यात त्यावेळच्या सरकारने मेहनत घेतली. त्यानंतरच्या काळात सर्वांत कमी जीडीपी १९९१ मध्ये झाला. तो होता १.४ टक्के ( म्हणजे अधिक). यावेळी अर्थमंत्री होते मनमोहन सिंग. त्यांनी आर्थिक सुधारणा आणल्या आणि मग कर्ज देणाऱ्या जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी यांच्या इशाऱ्यावर एलपीजी (Liberalization- उदारीकरण, privatization- खासगीकरण, आणि Globalization-जागतिकीकरण) नावाच्या गॅसवर भारताला ठेवले. (तेव्हा पासून देश गॅसवरच आहे!) त्यानंतर जीडीपी वाढला पण तो पुन्हा २०००-२००१ मध्ये अटलबिहारींच्या ‘इंडिया शायनिंग’ सरकारच्या काळात ३.९ टक्क्यांपर्यंत कमी आला. २०११-१२ मध्ये मनमोहन सिंगांच्या ‘घोटाळेवाली सरकार’ म्हणून बदनाम केल्या गेलेल्या सरकारच्या काळात ५.५ टक्के एवढा वाढला होता. त्यांनी २०१४ पर्यंत ७.४ टक्के एवढा जीडीपी आणला. नंतर मोदींनी कारभार हाती घेतल्यानंतर जीडीपी पॉईंट पॉईंटने वाढू लागला. २०१६ पर्यंत तो ८.२६ टक्के झाला. पण यानंतर ‘ऐतिहासिक’ नोटबंदी करण्यात आली. त्याच्याच साथीला जीएसटीचा ‘इतिहास’ घडवला गेला. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा पाय ७.०४ टक्के (२०१७), ६.१२ टक्के (२०१८) ५.०२ टक्के (२०१९) असा घसरू लागला. तो घसरत घसरत आता पुन्हा ऐतिहासिक उणे २३ टक्क्यांपर्यंत पोहोचला. अर्थात याला कोरोनाची एक पार्श्वभूमी आहे हे नाकारता येत नाही. पण त्यापूर्वी पासूनच घसरण सुरु होती आणि कोरोना हे निमित्त झाले.

कोरोनाच्या काळात ‘थाळ्या वाजवणे’, ‘दिवे लावणे’ ते ‘मोराला दाणे घालणे’ एवढे जे दिव्य, महान व ऐतिहासिक उपक्रम राबवले गेले त्यातूनही काहीच लाभ झालेला नाही, उलट लॉकडाऊनमुळे विविध सेक्टरना मार बसला. तसे हे सर्व सेक्टर कोरानाच्या आधीपासूनच मायनसमध्ये होते. त्यातही आता जो मायनस २३ टक्के जीडीपी आहे तो केवळ संघटित क्षेत्राशी संबंधित आहे. असंघटित क्षेत्राचा आकडा आला तर नक्कीच जीडीपी मायनस ५० टक्क्याच्या पार जाईल.

कारण याच क्षेत्रात देशातील जवळजवळ ९६ टक्के लोक काम करायचे. आता त्यांची कमाईच बंद आहे. त्यामुळे त्यांची क्रयशक्ती अत्यंत क्षीण झालीय. बेरोजगारी वाढत आहेत. सुशिक्षित युवक हवालदिल झाले आहेत. भज्यांचे दुकान काढावे तर भजी खाण्याएवढाही पैसा सर्वसामान्य माणसाकडे उरलेला नाही. आधीच कर्जबाजारी असलेल्या व तुटीच्या अर्थसंकल्पात रमलेल्या राज्य सराकारांचा महसूलही बुडत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर संघटित क्षेत्रातील लोकांचे पगार करायलाही सरकार आणि कंपन्यांकडे पैसे कमी पडतील. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आता तरी नियोजन करायला हवे पण त्यासाठी लागतो पैसा, तोच नाही आहे. तो उभा करायचा तर जागतिक पातळीवर पुन्हा कर्ज घ्यावे लागेल. अर्थात कर्ज घेतल्यांनतर कर्जदात्यांच्याच तालावर नाचावे लागणार आणि यात आत्मनिर्भर विकासाच्या फुग्याला टाचणी लागण्याची मोठी शक्यता!

एवढी सगळी माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की, देशाला आर्थिक संकटात टाकणारा देव म्हणजे तो पुराणातला देव नाही, हा तर या कलियुगातला देव! कली देव किंवा नकली देव आहे! मग सुरुवात केली हा कलियुगातला देव शोधण्याची! सुतावरुन जसा स्वर्ग गाठतात तसा भक्तांवरुन देव शोधला! आणि तो सापडला तेव्हा सत्यवचनीपणाबद्दल निर्मला मॅडमच्या पायावर लोटांगणच घालावे असंच वाटलं… ! या नकली देवाला वठणीवर आणण्यासाठी जनता जनार्धनाचा धावा करण्याचाही विचार मनात आला…आता जनताजनार्धन जागा झाला पाहिजे. त्याने आपले दोनच डोळे उघडायला हवेत. अन्यथा भयान काळोखात मदतीसाठी थाळ्या वाजवण्याची पाळी जनतेवर आणि देशावरही येईल!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा