न्यूजटाऊनः चाटुगिरीमुक्त पत्रकारितेचे तिसऱ्या वर्षात पदार्पण!

0
73

सरकारी खोटारडेपणाचे वस्त्रहरण करणे हे सार्वजनिक जीवनातील बुद्धीवाद्यांचे कर्तव्य आहे. लोकशाही देशात सरकारवर अंकुश ठेवून खोटारडेपणा, खोट्या गोष्टी तसेच फेकन्यूजपासून रक्षण करणे महत्वाचे आहे. लोकशाहीचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी सत्याची सत्ता असणे आवश्यक असते आणि सत्तेला सत्य सांगणे हा आपला अधिकार आणि प्रत्येक नागरिकाचेच कर्तव्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी नुकतेच म्हटले आहे. निरंकुश सरकारे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कायम खोट्यावरच अवलंबून असतात, हे प्रसिद्ध तत्वज्ञ हन्ना अरेन्डट यांचे वाक्यही न्या. चंद्रचूड यांनी उद्धृत केले. आपल्या धडावर आपलेच डोके असले पाहिजे, असे ज्यांना प्रामाणिकपणे वाटते, त्यांच्यासाठी न्या. चंद्रचूड यांची ही वाक्ये पुरेशी ठरावीत. गेल्या दोन वर्षांत न्यूजटाऊनने हे काम प्रामाणिकपणे केले आहे.

जागतिक पातळीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सर्रास गळचेपी होताना दिसू लागली आहे. भांडवलधार्जिणे शासनकर्ते त्यांच्या हितसंबंधांना धक्के देणारा मीडिया आणि मीडियातील माणसांना कसे बेदखल करतात, याची उदाहरणे भारतातच गेल्या सात वर्षांत अनेकवेळा पहायला मिळाली आहेत. देशातील एकूणच माहोल कधी नव्हे एवढा असुरक्षित, प्रदूषित झाला आहे. २०१४ पासून तर त्याची प्रकर्षाने आणि पदोपदी जाणीव होऊ लागली आहे. मीडियाने कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असालया पाहिजे, हे माध्यम स्वातंत्र्याचे खरे सारतत्व! बदललेल्या आणि बिघडलेल्या वातावरणातही अनेक माध्यमकर्मींनी हे सारतत्व प्रामाणिकपणे जपले आहे, हे नम्रपणे नमूद करतानाच असे करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती, हे जाणवू लागले होते. त्या जाणिवा आणि उणिवेतूनच ३१ ऑगस्ट २०१९ रोजी न्यूजटाऊन या स्वतंत्र आणि तटस्थ न्यूजपोर्टलचा जन्म झाला.

Journalism Without Fear & Favour ! असे बोधवाक्य असलेल्या  न्यूजटाऊनचा ३१ ऑगस्ट रोजीच प्रारंभ करण्याचे तसे खास कारण होते. १८७१ मध्ये ब्रिटिश सरकारने बॉम्बे प्रेसिडेन्सी कायद्यांतर्गत गुन्हेगारी जमात कायदा करून देशभरातील भटक्या आणि आदिवासी जमातींना कैदखान्यात डांबून ठेवले. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने हा कायदा रद्द केला आणि या दिवशी गुन्हेगार ठरवलेला भटका- विमुक्त समाज विशेष मुक्त झाला. हाच त्यांचा खरा स्वातंत्र्य दिन. म्हणून ३१ ऑगस्ट रोजीच या उपक्रमाची सुरूवात करण्याचे प्रयोजन होते!  उपेक्षित, दुर्लक्षित, आधारवंचित समाजाचे विविध प्रश्न, राजकारण आणि धोरण, सरकार आणि प्रशासन या मुद्यांवर लक्ष केंद्रित करून लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण आणि भयमुक्त समाजाची जडणघडण हा न्यूजटाऊनचा सर्वोच्च हेतू आहे. त्या हेतूसिद्धीच्या मार्गाने चालता चालताच आज न्यूजटाऊन दोन वर्षे पूर्ण करून तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठेच्या मानकावर वाटचाल करतानाच  न्यूजटाऊनने भयमुक्त आणि चाटुगिरीमुक्त पत्रकारितेत आपली स्वतंत्र ओळख आणि अस्तित्वही निर्माण केले आहे. या वाटचालीत केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे सातासमुद्रापल्याडच्या मराठी वाचकांनीही न्यूजटाऊनला भरभरून प्रेम दिले आहे. आम्ही न्यूजटाऊनच्या यशाची हीच खरी पावती मानतो!

सरकारी खोटारडेपणाचे वस्त्रहरण करणे हे सार्वजनिक जीवनातील बुद्धीवाद्यांचे कर्तव्य आहे. लोकशाही देशात सरकारवर अंकुश ठेवून खोटारडेपणा, खोट्या गोष्टी तसेच फेकन्यूजपासून रक्षण करणे महत्वाचे आहे. लोकशाहीचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी सत्याची सत्ता असणे आवश्यक असते आणि सत्तेला सत्य सांगणे हा आपला अधिकार आणि प्रत्येक नागरिकाचेच कर्तव्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी नुकतेच म्हटले आहे. निरंकुश सरकारे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कायम खोट्यावरच अवलंबून असतात, हे प्रसिद्ध तत्वज्ञ हन्ना अरेन्डट यांचे वाक्यही न्या. चंद्रचूड यांनी उद्धृत केले. आपल्या धडावर आपलेच डोके असले पाहिजे, असे ज्यांना प्रामाणिकपणे वाटते, त्यांच्यासाठी न्या. चंद्रचूड यांची ही वाक्ये पुरेशी ठरावीत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मातीत भयमुक्त आणि चाटुगिरीमुक्त पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणे हा न्यूजटाऊनच्या जन्माचा मूलाधार आहे. देशातील सध्याचे एकूणच वातावरण पाहता असे धारिष्ट्य करणे जोखमीचेच! परंतु या वातावरणात मेंदूंची मशागत करून लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या समाजाची पाठराखण करणे आणि त्या समाजाला पाठबळ देणे ही काळाची गरज होती आणि आहेही. Cultivation of mind should be the ultimate aim of human existence! असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते. न्यूजटाऊनने गेली दोन वर्षे हे काम प्रामाणिकपणे केले आहे, यापुढेही करत राहील!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा