वनमंत्री, शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा?; शिवसेनेचे मौन, भाजप उतावीळ

0
721
छायाचित्र सौजन्यः twitter/@SanjayDRathods

मुंबईः बीड जिल्ह्याच्या परळी येथील २२ वर्षीय तरूणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना नेते संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.  राठोड यांनी आज सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवून दिल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेने राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नसला तरी भाजप नेते मात्र राठोड यांनी मातोश्रीवर पाठवून दिलेला राजीनामा राज्यपालांकडे पाठवून देण्याची मागणी करू लागले आहेत.

टिकटॉकमुळे प्रकाशझोतात आलेल्या परळीच्या पूजा चव्हाण या तरूणीने पुण्याच्या हडपसर भागातील हेवन पार्क सोसायटीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन ८ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. त्या ऑडिओ क्लिप्समधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचा असल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्या राजीनाम्याची आणि कडक कारवाईची मागणी केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर संजय राठोड हे नॉट रिचेबल झाले होते. त्यांची गाडीही मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच उभी होती. त्यातच आज सकाळी संजय राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवून दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. राठोड यांनी राजीनामा दिला की नाही, याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही याबाबत स्पष्ट असे काही सांगितले नाही. राठोड यांच्या राजीनाम्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता राजीनामा दिला की नाही, हे मला माहीत नाही. तुम्हाला याची जास्त माहिती असेल, असे म्हणत राऊत यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले.

राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेनेकडून भूमिका स्पष्ट होणे बाकी असतानाच भाजपचे नेते मात्र छातीठोकपणे राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याचे सांगत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या ट्विटमुळे राठोड यांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम वाढला आहे. ‘वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा. कारण एकाने मारल्यासारखे करायचे, दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे असे होता कामा नये. तसेच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी करावी,’ असे दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

माझ्याकडे भाजप नेत्यांची डझनभर लफडी- वडेट्टीवारः दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे भाजप नेत्यांची महिलांसोबतची डझनभर प्रकरणे आहेत, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे. भाजप नेत्यांची महिलांबाबतची डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजप नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही. तेथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केले. याप्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

संजय राठोड यांची राजकीय पार्श्वभूमीः संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे वजनदार नेते आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघातून ते २००४ मध्ये पहिल्यांदा विजयी झाले होते. त्यानंतर २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही ते दिग्रस मतदारसंघातून विजयी झाले. २०१४ मध्ये आलेल्या फडणवीस सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा