इयत्ता दहावीचा विक्रमी निकाल, ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण!

5
675
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. कोरोना काळात जाहीर करण्यात आलेल्या या निकालाने बोर्डाच्या निकालाचे आजवरचे सगळेच विक्रम मोडित काढले असून तब्बल ९९.९५ टक्के विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच परीक्षा न घेता निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन आणि इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारावर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण य नऊ विभागीय मंडळात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी (एसएससी) आठ माध्यमातून ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी आणि ७ लाख ७८ हजार ६९३ विद्यार्थीनी असे एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मंडळाने २९ एप्रिल ते २० मे या काळात लेखी परीक्षा आयोजित केली होती. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.

यंदा दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या ५ टक्क्यांनी अधिक आहे. यंदा ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ९५.३० टक्के लागला होता. यंदाचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी अधिक आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये अशीः

-कोकण विभागाचा निकाल १०० टक्केः कोकण विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विभागातील ३१ हजार १६८ विद्यार्थ्यांपैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. राज्यातील ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे.

विभागनिहाय निकालः

  • कोकणः १०० टक्के
  • पुणेः ९९.९६ टक्के
  • नागपूरः ९९.८४ टक्के
  • औरंगाबादः ९९.९६ टक्के
  • कोल्हापूरः ९९.९२ टक्के
  • अमरावतीः ९९.९८ टक्के
  • नाशिकः ९९.९६ टक्के
  • लातूरः ९९.९६ टक्के

-यंदाच्याही निकालात मुलींचीच बाजी.

श्रेणी सुधारसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल नाहीः इयत्ता दहावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी २०२१-२२ वर्षीच्या परीक्षेसाठी श्रेणी सुधारण योजनेअंतर्गत नोंदणी केली होती, त्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांना असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध राहतील, असे मंडळाने कळवले आहे.

येथे पहा थेट निकालः विद्यार्थ्यांना आज दुपारी १ वाजेपासून त्यांचा निकाल ऑनलालाइन उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

5 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा