दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका

0
107
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः   इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइनच घेण्यात याव्यात, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थी- पालकांचा आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे चांगलाच हिरमोड झाला आहे. देशातील सीबीएसई, आयएससीई आणि राज्य मंडळामार्फत होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या असून या परीक्षा ऑफलाइनच म्हणजेच प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावरच होतील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 स्टेट बोर्डासह सीबीएसई, आयएसईसी बोर्डाच्या दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेऊन वैकल्पिक मूल्यमापन करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली. न्या. ए.एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेताना याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे.

 या याचिकांना कोणताही आधार नाही. याआधी (कोरोनाबाबत) जशी परिस्थिती होती, तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. अशा प्रकारच्या याचिका विद्यार्थी आणि पालकांमध्ये विनाकारण खोटी आशा दाखवतात आणि निर्माण करतात. अशा याचिकांवर सुनावणी घेण्याने व्यवस्थेत आणखी संभ्रम निर्माण होतो. प्रशासनाला योग्य तो निर्णय घेऊ द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा