वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक, शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई

0
393
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लाप्रकरणी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवार आणि रविवार असल्यामुळे सदावर्ते यांचा मुक्काम सोमवारपर्यंत पोलिस कोठडीतच असण्याची शक्यता आहे.

 मागील पाच महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला चपला आणि दगडफेक करत हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी १०७ एसटी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

 शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटले. याचदरम्यान सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुंबई पोलिसांचे एक पथक वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील निवासस्थानी पोहोचले. तेथून त्यांना गावदेवी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. रात्री साडेआठ वाजेपासून गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली.

गावदेवी पोलिस ठाण्यात बराच वेळ चौकशी केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात भादंविच्या कलम १४१,१४९, १२० ब आणि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणि कटात सहभागी झाल्याचा ठपका सदावर्ते यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बेकायदा जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करण्याच्या उद्देशाने कृत्य आणि हल्ल्याचा कट रचणे या कलमांतर्गत सदावर्ते यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांना सदावर्ते यांची काही चिथावणीखोर भाषणेही मिळाली आहेत. यात सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना चिथावल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत.पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही. कुठलीही नोटीस न देता गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचाः शरद पवारांच्या घरावरील हल्ला: वकील गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात, १०७ जणांना अटक

हल्ल्यामागे कोण आहेत ते शोधा, कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशः राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पाऊले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून  यासंदर्भातील निर्णय देखील त्यांनी दिला आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारे जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही असेही ते म्हणतात. मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की,  एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन  करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले. मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली. न्यायालयाने सुद्धा त्याची नोंद घेत  एसटीच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले.

कर्मचाऱ्यांनी देखील याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहचत असतानाच अचानक आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमाव पोहचून तो घोषणाबाजी, दगडफेक व चप्पलफेक करतो ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना मी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात.

या निंदनीय घटनेला प्रत्युत्तर म्हणून कुणीही कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचेल असे कृत्य करू नये. एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी नेहमीच शासन त्यांच्याबरोबर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा