मनाई आदेशानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, हायकोर्टाची कामगार संघटनेच्या नेत्याला नोटीस

0
232
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः संप करण्याबाबत मनाई आदेश जारी केल्यानंतरही एसटी कामगार संघटनांनी संप सुरूच ठेवल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी कठोर भूमिका घेतली असून कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते अजय कुमार यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आता उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मनाई आदेश जारी करूनही संप करणाऱ्या कामगारांवर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये? अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मुख्य मागणीसाठी एसटी कामगार संघटनांनी ऐनदिवाळीच्या काळातच संप पुकारला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची शक्यता लक्षात घेता एसटी महामंडळाने औद्योगिक न्यायालयात अर्ज केला होता. एसटी बस सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे औद्योगिक न्यायालयाने २९ ऑक्टोबर रोजी एसटी कामगार/ कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली होती.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

औद्योगिक न्यायालयाने मनाई आदेश जारी करूनही एसटी कामगार संघटना संपाच्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे एसटी महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्या. शाहरूख काथावाला आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यापासून मनाई करणारा आदेश जारी केला होता.

मुंबई उच्च न्यायालयाचा हा आदेश धुडकावून एसटी कामगार संघटनांनी संप सुरूच ठेवला. एसटी महामंडळाच्या वतीने आज न्यायालयात आज उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली. एसटी कामगारांच्या या संपामुळे राज्यभरातील ५९ आगारे बंद राहिली आणि प्रवाशांचे हाल झाले, असे एसटी महामंडळाच्या वतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर एसटी कामगार संघटनेचे नेते अजयकुमार गुजर यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. अजयकुमार गुजर हे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आहेत. या प्रकरणी आता उद्या दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा