सरकार कोणत्याही सणांच्या नव्हे, तर कोरोनाच्या विरोधातः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

0
36
संग्रहित छायाचित्र.

ठाणेः राज्य सरकार हे कोणत्याही सणांच्या विरोधात नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. केंद्र सरकारनेही या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जनता जगली काय? त्यांचे प्राण गेले काय? आम्हाला शंभर टक्के राजकारण करायचे आहे. समोर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दिसत असताना आम्हाला यात्रा काढायच्या आहेत. आम्हाला नवीन सोईसुविधा जनतेसाठी करायच्या नाहीत, पण त्यांचे जीव धोक्यात येऊ शकतील, असे सभासमारंभ करायचे आहेत. का तर आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजे आहेत. कशाला आशीर्वाद? जनतेचे जीव धोक्यात घालायला? असा खोचक टोलाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता लगावला.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार सरनाईक यांच्या वतीने दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खूप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. मात्र कोरोना निर्बंधासाठीचे  नियम मोडून आंदोलने केली जात आहेत. आंदोलन करायचेच असेल तर कोरोनाविरुद्ध करा, असेही ठाकरे म्हणाले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे  हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे. सध्या आमदार सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत तसे करण्याची गरज आहे. चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे. येथून पुढेही निधी मिळेल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा