कधी ओबीसी, कधी मराठा समाजाला भडकवण्याचा खेळ थांबवाः देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा इशारा

0
179
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ओसीबी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण आहे ते अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे, ही पहिल्यापासूनच राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजूंनी खेळ खेळत आहेत. कधी ओबीसी तर कधी मराठा समाजाला भडकवण्याचे हे राजकारण त्यांनी बंद करावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याकमंत्र नवाब मलिक यांनी दिला आहे.

मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले १६ टक्के आरक्षण योग्यच आहे, अशी भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करावी. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकारच नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिला आहे. आरक्षण देण्याचा राज्यांचा अधिकार अबाधित राहील, असे संसदेत केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली आहे. मात्र ही फेरविचार याचिका महाराष्ट्रासाठी नसून इतर सर्व राज्ये तुटून पडणार असल्याने दाखल केली आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

 देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे वकिलांना ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ या पद्धतीने बोलता येते, असा सणसणीत टोलाही मलिक यांनी फडणवीसांना लगावला आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच मराठा आरक्षण दिल्याचे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत तर राज्याला अधिकारच नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे, त्याचे काय? असा सवालही मलिक यांनी फडणवीसांना विचारला आहे.

भूमिक एकच, मग राजकारण का?: सुरूवातीपासूनच म्हणजे आरक्षण देण्यात आले तेव्हापासून ओबीसींचा कोटा अबाधित ठेवून अतिरिक्त आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. यापुढेही राज्य सरकारची भूमिका तीच राहणार आहे. आता आमची भूमिका आहे तीच भूमिका भाजपची आहे. याबाबत एकमत असताना त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. परंतु तरीही यावर भाष्य करून ते काय संदेश देऊ इच्छितात? समाजासमाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी ते बोलत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा