कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांचा ‘बाजार’, परस्पर विक्रीचे सोशल मीडियावर चित्र

0
89
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: कोरोनाच्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहता दिसून येत आहेत. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना समाजासाठी घातक आणि गंभीर गुन्ह्याच्या असून असे प्रकार करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे महिला व बालविकास आयुक्तालयाने म्हटले आहे.

कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोरोनामुळे दोन्ही पालकांच्या मृत्यू मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा काही वेळा आप्तस्वकीयांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे.

एकीकडे अशा बालकांचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असून काही समाजकंटक या समस्येचा वापर संधी म्हणून करून घेत परस्पर मुलांची विक्री करत असल्याचे चित्र समाजमाध्यमांवरील पोस्टवरुन दिसून येत आहे. यासाठी फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाजमाध्यमांचा वापर करून त्यावर विविध भावनात्मक पोस्ट टाकल्या जात असून बालके दत्तकास उपलब्ध आहेत असे चित्र निर्माण केले जात आहे. हे समाजकंटक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा प्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे- देणे वा खरेदी-विक्री केली करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६०, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, २०१५ तसेच दत्तक नियमावली, २०१७ नुसार कठोर कारवाई कारवाईस पात्र आहे.

राज्यात कोठेही कोरोनाच्या अथवा इतर कोणत्याही कारणाने पालक गमावल्यामुळे अनाथ झालेली बालके आढळून आल्यास १०९८ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्रच्या (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) ८३२९०४१५३१ या क्रमांकावर कळवावे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, व पोलीस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना ताब्यात द्यावे. त्याची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल, असे महिला व बालविकास आयुक्तालयाने म्हटले आहे.

विशेष मदत कक्ष स्थापन: अनाथ बालकांना संकट काळात मदत मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तालय आणि सेव्ह द चिल्ड्रेन (इंडिया) च्या संयुक्त विद्यमाने विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या मदत कक्षाचे भ्रमणध्वनी क्रमांक ८३०८९९२२२२ आणि ७४०००१५५१८ वर सकाळी ८ वा. ते रात्री ८ वा. या कालावधीत संपर्क साधावा. कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यु झाला असेल आणि बालकास कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसाठी या हेल्पलाईनवर संपर्क करण्यात यावा. तसेच बालकांसाठी यापूर्वी सुरू असलेली १०९८ ही हेल्पलाइन आणि सारा- महाराष्ट्र च्या भ्रमणध्वनी क्रमांक ८३२९०४१५३१वरही संपर्क साधल्यास मदत उपलब्ध होईल.

दत्तक विधान प्रक्रियेची माहिती काराच्या संकेतस्थळावरः बालक दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करू शकतात, असेही महिला व बालविकास विभागाने कळवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा