अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनाही परदेशात उच्च शिक्षणासाठी दिली जाणार शिष्यवृत्ती

0
83
प्रातिनिधिक छायाचित्र.

नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांना  परदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी  आदिवासी विकास विभागार्फत अनुसूचित जातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांनाही परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिली. या योजनेनुसार दरवर्षी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याचे कमाल वय ३५ वर्षे असावे. नोकरी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्ष अशी आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ६ लाख इतकी आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक टीओईएफएल किंवा आयईएलटीएस परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य राहील असे पात्रतचे निकष आहेत, असे सोनवणे यांनी सांगितले.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी प्रतिवर्षी मे महिन्यात जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज मुदतीत संबधित प्रकल्प अधिकारी यांचेकडे जमा करावे. प्राप्त अर्जांची प्रकल्पस्तरावर अपर आयुक्त यांच्यामार्फत छाननी होऊन ते आदिवासी विकास आयुक्तालयाकडे सादर केले जातील. यानंतर आयुक्तालयस्तरावर गठीत निवड समितीद्वारे १० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. यात सर्व आवश्यक शैक्षणिक प्रक्रिया, व्हिसा पूर्ण होऊन सप्टेंबर महिन्यात विद्यार्थी अभ्यासक्रमास हजर होतील या बाबी निवडप्रक्रियेत अंतर्भूत होतील.

 ज्या विद्यापीठाचे रॅकिंग ३०० पर्यंत आहे त्याच विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देय असणार आहे. परदेशात ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्या विद्यापीठास ऑनलाइन प्रणालीद्वारे  विद्यापीठाच्या खात्यावर विद्यार्थ्यांची ट्यूशन फी व परीक्षा फी जमा करण्यात येईल तर विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता हा विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात निवास व भोजन खर्च समाविष्ट असेल. याव्यतिरिक्त विमानप्रवास खर्च, व्हिजा शुल्क, स्थानिक प्रवास खर्च, विमा, संगणक किंवा लॅपटॉप आदी खर्च विद्यार्थ्याला स्व:त करावा लागणार आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आदिवासी विभाग सतत प्रयत्नशील आहे. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर ज्ञानाची कवाडे खुली होऊन गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या करियरच्या दृष्टीने परदेशातील विविध विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रमातून सर्वोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा