दहा-दहा रुपये काँन्ट्री करून चौथीच्या वर्गातील विद्यार्थीही पितात दारु…गावात घालतात धिंगाणा!

0
457
प्रातिनिधिक छायाचित्र.

नांदेडः चौथीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी म्हणजे अवघी दहा-आकरा वर्षांची कोवळी फुले!  खेळण्या-बागडण्याच्या वयात ही कोवळी फुले भलत्याच नादाला लागली आहेत. सांगूनही ऐकत नसल्यामुळे हतबल झालेल्या त्यांच्या मातांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि साहेब, काहीही करा, पण गावात दारूबंदी करा, अशी गळ जिल्हाधिकाऱ्यांना घातली.

हा प्रकार घडतो आहे नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव(ध.) या जेमतेम १ हजार ४०० लोकसंख्या असलेल्या गावातील. महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवर असलेले गोदाकाठचे हे गाव. या गावापासून तेलंगणची सीमा अगदी एक-दीड किलोमीटरवरच आहे. तेलंगणच्या तुलनेत येथे हातभट्टी आणि देशी स्वस्तात मिळते म्हणून तेलंगणमधील तळीराम येथे सकाळपासूनच दारू ढोसायला येतात. अगदी सकाळपासूनच येथे दारूसाठी तळीरामांच्या रांगा लागतात. हे तळीराम दारू ढोसतात आणि गावात भांडणही करतात.

इथपर्यंत ठिक. परंतु वाण नाही तर गुण लागतोच, असे म्हणतात, तसेच काहीसे इथल्या मुलांच्या बाबतीत घडले. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांचा गुण येथील मुलांनाही लागला आणि ते दहा-दहा रुपये काँट्री करून देशी ढोसायला लागले. मायबाप सकाळीच शेतावर निघून जातात. कोरोना विषाणूमुळे बंद झालेल्या शाळा अजून उघडलेल्या नाहीत. त्यामुळे शाळा बंद आणि मायबाप शेतात असल्यामुळे येथील मुलांवर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नसल्यामुळे ते देशाच्या नादाला लागले आणि दहा-दहा रुपये काँन्ट्री करून दारू ढोसून गावात धिंगाणा घालायला लागले आहेत.

घरातील पुरूष मंडळी आणि मुले सांगून सवरूनही ऐकत नसल्यामुळे येथील महिला चांगल्याच खवळल्या आणि त्यांनी गाठले थेट नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय. या महिलांनी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांची भेट घेऊन साहेब, काहीही करा, पण गावात दारूबंदी करा. दहा-दहा रुपये काँन्ट्री करून चौथीच्या वर्गातील मुलेही दारू प्यायला लागले आहेत. घरातील पुरूष मंडळी दारू ढोसून मारहाण करायला लागले आहेत… म्हणून कसंही करा, पण दारूबंदी कराच, अशी गळ जिल्हाधिकाऱ्यांना घातली. त्यावर ग्रामसभा घेऊन गावातील महिलांच्या स्वाक्षऱ्या घ्या, तत्काळ दारूबंदी करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहे.

पतीबरोबरच चौथीची मुलेही दारूच्या आहारी गेली आहेत. दिवसभर पुरूष दारू पितात, रात्री महिला कामावरून आल्यावर त्यांना मारहाण करतात, असे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या रेखा गडमोड यांनी सांगितले.

बायको सोडतील पण दारू सोडणार नाहीतः गावातील पती पत्नीला सोडतील, पण दारू सोडायला तयार नाहीत. शाळा बंद असल्यामुळे मुलांवरही वाईट परिणाम होत आहेत. ऑनलाइन वर्ग, अभ्यास असा कुठलाही प्रकार येथे नाही. त्यामुळे कुणाचेच नियंत्रण राहिले नसल्यामुळे मुले एकत्र येऊन नको तो उपद्व्याप करू लागली आहेत. त्यामुळे गावातील देशी दारूच दुकान बंद करण्याची मागणी केली आहे, असे देऊबाई कदम यांनी सांगितले.

ग्रामसभाच नाही तर कशी होणार दारूबंदी?: ग्रामसभा घेऊन ठरावावर महिलांच्या स्वाक्षऱ्या घ्या, तत्काळ दारूबंदी करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले खरे, परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत राज्यात ग्रामसभा घेण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. २६ जानेवारी रोजीही ग्रामसभा होणार नाहीत. त्यामुळे ग्रामसभाच होणार नसेल तर नायगाव (ध.) गावात ठराव घेतला जाणार कसा आणि दारूबंदी होणार कशी? असा सवाल केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा