जामियातील अमानुष अत्याचाराचे औरंगाबादेत पडसाद, विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठ बंद

0
287

औरंगाबादः नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍या दिल्लीतील जामिया मिल्लिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे पडसाद औरंगाबादेतही उमटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी शैक्षणिक विभाग आणि अभ्यासिका बंद  ठेवून निषेध केला. जामियातील विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार आरएसएसप्रणित असल्याचा आरोप करत एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल विकास केंद्राच्या फलकाला काळे फासले. दिल्लीतील जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा विधयेकच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही एसएफआय, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठ बंद पुकारला. आंदोलक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विभाग, ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद केल्या. आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकार्‍याने प्रमुख आंदोलक विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आणि जमाव न करण्यास बजावले. त्यामुळे विद्यापीठात काही वेळ तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे.

दरम्यान दिल्लीतील जामियातील विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष अत्याचार हा संघप्रणित भाजपचा डाव असल्याचा आरोप करत एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल विकास केंद्राच्या फलकाला काळे फासले. या आंदोलनात एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, कार्याध्यक्ष देव राजळे विद्यापीठ अध्यक्ष योगेश बहादूरे, प्रसिद्धी प्रमुख अजय भुजबळ यांनी भाग घेतला.


प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा