लग्नाची तारीख ठरलेल्या डॉक्टर तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या

0
344
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच औरंगाबादच्या शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. डॉ. सादाब शिरीन महंमद आरेफ (२८, रा. टाइम्स कॉलनी, कटकट गेट) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे. 

गेल्या काही वर्षांपासून एम.डी. डॉ. सादाब शिरीन या आमखास मैदानासमोरील शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत होत्या. अशातच त्यांचे लग्न ठरले होते. १३ मार्च रोजी विवाहाची तारीख ठरल्याने कुटुंबीयांनी लग्नपत्रिका छापल्या होत्या. नातेवाईकांना पत्रिका वाटपाचे काम सुरू होते. याच दरम्यान मंगळवारी रात्री इमारतीतील एका खोलीत डॉ. सादाब शिरीन यांनी ओढणीने खिडकीच्या अँगलला गळफास घेतला. हा प्रकार रात्री दहाच्या सुमारास खिडकीतून डोकावल्यावर कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून शिरीन यांचा मृतदेह खाली उतरवला. या घटनेची माहिती जिन्सी पोलिसांना देण्यात आली. रात्री जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गिते यांनी कर्मचा-यांसह धाव घेतली. त्यानंतर शिरीन यांना बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, असे जिन्सी पोलिसांनी सांगितले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा