राज्यातील शाळांना १ मेपासून सुटी जाहीर, १४ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष!

0
102
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १ मेपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. १४ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. विदर्भात मात्र २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी आज या संदर्भातील आदेश जारी केला आहे. १ मे ते १३ जून हा उन्हाळी सुट्यांचा कालावधी असणार आहे. १४ जून २०२१ पासून पुढील शैक्षणिक वर्ष (२०२१-२२) सुरू होणार आहे. जून महिन्यातील विदर्भाच्या तापमानाचा विचार करता विदर्भात उन्हाळी सुटीनंतर शाळा २८ जूनपासून सुरू होतील, असे या आदेशात म्हटले आहे.

विशेष म्हणजे उन्हाळा आणि दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांच्या प्रसंगी ती समायोजित करण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षण अधिकाऱ्यांची (प्राथमिक/ माध्यमिक) परवानगी घ्यावी लागणार आहे.

 राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती क्षेत्रातील सर्व सरकारी, खासहगी प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे २०२१-२२ शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोरोना संसर्गाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासनस्तरावर आदेश जारी होतील, असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या परिस्थितीनुसार १४ जून रोजी शाळा सुरू करायच्या की नाहीत, याबाबतचा निर्णय होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा