नवी दिल्लीः मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला असून सर्वोच्च न्यायालयाने आज होणारी सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होईल. दरम्यान, मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
या आधी झालेल्या सुनावणीत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता. परंतु हे प्रकरण आज बुधवारीच २० जानेवारीला लिस्ट झाले होते. मात्र आता ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय वैध ठरवला होता. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणाची पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे.
आज हे प्रकरण न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणीस आले असता महाराष्ट्र सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी कोरोना महामारीमुळे वकिलांना या प्रकरणाची तयारी करणे अवघड जात असल्याचे सांगितले.
आम्ही वकील वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहोत आणि प्रचंड मोठे रेकॉर्ड आहे. व्हर्च्युअल सुनावणीत युक्तिवाद करणे अवघड जात आहे. महाराष्ट्राविरुद्ध अंतरिम आदेश आहे. कृपया प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी, अशी विनंती रोहतगी यांनी केली.
ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनीही रोहतगी यांच्याशी सहमती दर्शवली आणि स्थगिती आदेशामुळे कोणताही पूर्वग्रह ठेवला जाऊ नये, असे विनंती केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे.