भाजपशासित राज्यात शेतकऱ्यांना केंद्र सरकारने डांबून ठेवलेः राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप

0
51
संग्रहित छायाचित्र.

सांगलीः मोदी सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांना भाजपशासित राज्यांतील शेतकऱ्यांचाही विरोध आहे. भाजपशासित राज्यातील शेतकरीही आंदोलनात सहभागी होण्यासाठी २६ नोव्हेंबरलाच दिल्लीकडे निघाले होते. परंतु केंद्र सरकारने त्यांना डांबून ठेवले, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तानी शिरल्याचा अपप्रचार करून प्रांतवाद आणि जातीयवाद पसरवला जात आहे. मात्र आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी संपूर्ण देश आहे. भाजपशासित राज्यांतील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होत आहेत. या राज्यांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी २६ नोव्हेंबरला दिल्लीकडे निघाले होते. मात्र सरकारने त्यांना डांबून ठेवले. अनेक नेत्यांना दिल्लीपर्यंत पोहोचू दिले नाही. तरीही आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाही, असे शेट्टी म्हणाले.

शेतकरी अतिरेकी आहेत का? असा सवाल करत राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांना अडवण्यासाठी सरकारने रस्त्यात खंदक खोदले. या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे. जागर करूनही केंद्र सरकार जागे होत नसल्यामुळे ८ डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य नागरिकही सहभागी झाला पाहिजे.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेल्या या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना अग्रभागी असेल,असेही शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांचे कल्याणच करायचे असेल तर केंद्र सरकार हमीभाव मंजूर का करत नाही? आम्ही णीही मागणी केली नसताना तीन नवीन कृषी कायदे का केले?, असा सवालही शेट्टी यांनी केला. ऊसाला ज्यापद्धतीने हमीभावाचे संरक्षण आहे, तसेच संरक्षण सर्व पिकांना द्यायला हवे. केंद्र सरकार ढोंगीपणा करत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आला की तो राज्यावर ढकलून दिला जातो. मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी केंद्र सरकार राज्यांत ढवळाढवळ करत आहे, असा आरोपही शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा