अँटिलिया प्रकरणी ५ लाख रुपये देऊन परमबीर सिंहांनी अहवाल बदललाः सायबरतज्ज्ञाचा दावा

0
201
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे आणखी एका अडचणीत सापडले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पिओ आढळल्याच्या प्रकरणात कथित जैश-उल- हिंदच्या टेलिग्राम संदेशाबाबत नवीन खुलासा झाला आहे. या अहवालात बदल करण्यासाठी परमबीर सिंह यांनी पाच लाख रुपये दिले होते, असा दावा या प्रकरणाचा अहवाल तयार करणाऱ्या सायबरतज्ज्ञाने केला आहे. अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात एनआयएच्या आरोपपत्रात या साबरतज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

सायबरतज्ज्ञाने नोंदवलेल्या जवाबानुसार, त्याने जो मूळ अहवाल तयार केला होता, त्यात मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा उल्लेखही नव्हता. परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून त्याने जैश उल हिंदचे पोस्टर त्या अहवालात जोडले होते. या प्रकरणात जैश उल हिंदचे पोस्टर जोडणे आवश्यक असल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. हे काम करण्यासाठी त्याला परमबीर सिंह यांनी बळजबरी ५ लाख रुपयेही दिले होते.

 सायबरतज्ज्ञाने नोंदवलेल्या या जवाबामुळे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटके प्रकरणावर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. परमबीर सिंह यांनी सायबरतज्ज्ञाच्या अहवालात त्यांना हवे तसे बदल का करून घेतले? असे करण्यात त्यांचा काही फायदा होता की एनआयए प्रमुखांकडून त्यांना शाबासकी मिळणार होती? असे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत.

 मी लेखी स्वरुपात असा अहवाल देऊ शकतो का, असे परमबीर सिंह यांनी मला विचारले. हे काम गोपनीय आहे आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून केले जात आहे. त्यामुळे कोणताही अहवाल देणे योग्य नाही, असे मी सिंह यांना सांगितले. त्यावर ही एक अतिशय महत्वाची बाब असून मी तो अहवाल द्यावा. परमबीर सिंह या संदर्भात एनआयएच्या आयजींशी बोलणार होते, असे या सायबरतज्ज्ञाने जवाबात म्हटले आहे.

परमबीर सिंह यांच्या आग्रहानुसार मी त्यांच्यात कार्यालयात बसून माझ्या लॅपटॉपवर एका पॅरेग्राफचा अहवाल तयार केला आणि तो सिंह यांना दाखवला. अहवाल पाहिल्यावर परमबीर सिंह यांनी मला त्या अहवालात टेलिग्राम चॅनेलवर दिसणारे पोस्ट आणि जैश उल हिंदने अँटिलाया प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे टाकण्यास सांगितले. त्यानुसार मी माझ्या अहवालात बदल केला आणि जैश उल हिंद या टेलिग्राम वाहनीवर दिसणार पोस्टर घातले आणि हा अहवाल पोलिस आयुक्त, मुंबई यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर मेल केला. हा अहवाल ते लवकरच एनआयएच्या महासंचालकांना दाखवणार असल्याचे म्हणाले होते, असेही या सायबरतज्ज्ञाने आपल्या जवाबात म्हटले आहे.

सायबरतज्ज्ञाने जवाबात केलेल्या दाव्यानुसार, या कामासाठी परमबीर सिंह मला पैसे देऊ इच्छित होते. तुम्हाला किती पैसे देऊ, असे परमबीर सिंह यांनी मला विचारले. मला पैशाची अजिबात अपेक्षा नाही, असे मी त्यांना सांगितले. परंतु मी उत्कृष्ट काम केले आहे आणि या सेवेबद्दल मी इनामाचा हक्कदार आहे, असे परमबीर सिंह म्हणाले. मग त्यांनी त्यांच्या खासगी सहायकाला बोलावले आणि त्याला मला ३ लाख रुपये द्यायला सांगितले. परंतु शेवटी परमबीर सिंह यांनी मला रोख ५ लाख रुपये दिले.

मार्चमध्ये मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटके असलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती, तेव्हा आलेल्या बातम्यांनुसार या प्रकरणाचा संबंध तिहार तुरुंगाशी असल्याचे दिसत होते. तेव्हा जैश उल हिंदच्या नावाने स्फोटके आणि कारची जबाबदारी स्वीकारणारा संदेश पाठवण्यात आला होता आणि हा संदेश एका टेलिग्राम चॅनेलद्वारे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. हे टेलिग्राम चॅनेल कथितरित्या तिहार तुरूंगात तयार करण्यात आले होते. सरकारी तपास यंत्रणांनी या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी एका खासगी सायबर संस्थेशी संपर्क केल्यानंतर त्या संस्थेने असा दावा केल्याचे सांगण्यात आले होते.

 तेव्हा पेरण्यात आलेल्या बातम्यांनुसार, जैश उल हिंदच्या नावाने एक संदेश लिहिण्यात आला होता. रोखू शकत असाल तर रोखा. आम्ही जेव्हा दिल्लीत तुमच्या नाकावर टिच्चून तुम्हाला धक्का दिला होता, तेव्हा तुम्ही काहीच करू शकले नव्हते. मुंबईत एसयूव्ही पार्क करणारे सहिसलामत आपल्या घरी पोहोचले आहेत. हे एक ट्रेलर होते आता मोठा पिक्चर बाकी आहे, असे या संदेशात म्हटले होते. मात्र नंतर जैश उल हिंदनेच हा दावा फेटाळून लावला होता आणि आम्ही मुकेश अंबानींना कधीही धमकी दिली नव्हती, असे स्पष्ट केले होते. मुकेश अंबानी यांच्याशी आमचे कुठलेही भांडण नाही आणि मीडियात व्हायरल होत असलेले पत्र पूर्णतः बनावट आहे, असा खुलासाही या संघटनेने केला होता. परंतु या प्रकरणात सायबर सुरक्षातज्ज्ञाने एनआयएकडे नोंदवलेला जवाब त्यांनी आधी केलेला दावा खारीज करतो आणि परमबीर सिंह यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा