विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा, म्हणजे बलात्कार रोखता येतीलः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

0
99

नागपूरः विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे महिलांवर होणारे बलात्कार रोखता येतील, असा अजब सल्ला पुरोगामी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

 राज्यपाल कोश्यारी यांनी चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक, सत्ता आणि पैसा याचा वापर आणि ज्ञानाचा वापर आणि गैरवापर अशा अनेक विषयावर आपली मते मांडताना महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा विषयही मांडला. एकेकाळी घरोघरी कन्यापूजा केली जायची. परंतु आज देशात दुष्टशक्ती महिलांवर बलात्कार करत आहेत, अत्याचार करत आहेत, असे कोश्यारी म्हणाले. सत्ता आणि शक्ती गैरवापर करण्यासाठी असते की संरक्षणासाठी? असा सवाल करत विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा. संस्कृत श्लोकांमुळे मन बलात्कारासारख्या विचारांपासून प्रवृत्त होते आणि त्यामुळे महिलांवरील बलात्कार रोखता येतील, असे कोश्यारी म्हणाले. या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी दहा कोटी रुपयांचे अर्थसहाय दिले. राज्यपाल कोश्यारी यांनी बजाज कुटुंबाची तुलनाही संतांशी केली. बजाज कुटुंबीयांसारखे उद्योजक संताप्रमाणे आहेत. जेव्हा उद्योजक संतप्रवृत्तीचे असतात, त्यावेळी गरजूंना मदत होते, असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले. राज्यपालासारख्या घटनात्मकपदावर बसलेल्या कोश्यारी यांनी बलात्कार रोखण्यासाठी संस्कृत श्लोक शिकवण्याचा अजब सल्ला दिल्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा