जनतेच्या जीवाशी खेळून राजकारण करणाऱ्यांना समज द्याः मुख्यमंत्री ठाकरेंची मोदींकडे तक्रार

0
83
संग्रहित छायाचित्र.

मुंबई:  कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत, त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, अशी तक्रारवजा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना केली. लसीकरण आणि  तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठित केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आज मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील ८ राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. याप्रसंगी नीती आयोगाने देखील येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मार्गदर्शन केले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल. आज दिल्लीत , केरळ मध्ये संसर्ग वाढला आहे तर उद्या आणखी कुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता ४७०० ते ५००० रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्ण संख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

 कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत असे सांगून  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लसीची उपलब्धता, लसीची संख्या, लसीचे दुष्परिणाम, लसीचा परिणाम, लसीवरील येणारा खर्च व त्याचे वितरण  याबाबतीत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

तुम्हीच बैठक घेऊन समज द्याः प्रधानमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. आज एकीकडे आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व कोरोना लाटेला आमंत्रण मिळू शकते याकडेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.

पोस्ट कोविडचे आरोग्य परिणामः कोविडमधून बऱ्या झालेल्या  काही रुग्णांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या देखील आढळत असून यावरही आपल्याला लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज राज्यात दररोज ७० ते ८० हजार चाचण्या होत असून आरटीपीसीआर चाचण्या अधिक वाढविण्याचे तसेच संसर्गग्रस्त व्यक्तीचे जास्तीतजास्त संपर्क शोधण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही अतिशय सावधपणे पाउले टाकत असून केंद्राने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन केले जाईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा