‘शहा’हीन दिल्लीः भाजपच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवाची १० मोठी कारणे

0
276
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आम आदमी पार्टीचा (आप) विजय अनपेक्षित नाही. राजकीय निरीक्षकांना आधीपासूनच त्याचा अंदाज होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भलेही धक्कादायक निकालाच्या गप्पा मारत होते आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी आपलाच पक्ष जिंकणार, असे आपले सहावे इंद्रिय सांगत असल्याचा दावा करत होते, पण दिल्लीच्या जनतेने आपला फैसला दिला. आम आदमी पार्टीला जेवढा मोठा विजय मिळण्याची शक्यता होती, तेवढा मोठा विजय मिळाला, या दृष्टिने दिल्लीच्या जनतेचा हा फैसला धक्कादायक जरूर आहे. आम आदमी पार्टीच्या विजयाची आणि भाजपच्या पराभवाची ही आहेत १० मोठी कारणेः

  • आपने ही संपूर्ण निवडणूक अरविंद केजरीवाल विरुद्ध भाजप अशीच केली. अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या धर्तीवर त्यांनी असे केले आणि पक्षाचा प्रचारही केजरीवालांभोवतीच फिरत राहिला. भाजप या जाळ्यात अडकली आणि केजरीवालांवर त्यांनी बेफाम वैयक्तिक हल्ले चढवले. त्याच रणनिती अंतर्गत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अतिरेकी म्हणण्यापर्यंत भाजपची मजल गेली. भाजपकडून केजरीवालांवर जसजसे वैयक्तिक हल्ले होत गेले, तसतशी आपच्या उमेदवारांना सहानुभूती मिळत गेली.
  • भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. आपने याच मुद्यावरून भाजपला घेरले आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आव्हान भाजपला दिले. अरविंद केजरीवालांशी खुली चर्चा करण्याचे आव्हानही आपने भाजपला दिले. या मुद्यावर भाजप बॅकफूटवर राहिली. कारण भाजपकडे कोणतेही उत्तर नव्हतेच.
  • आपने २०१७ मध्ये महानगर पालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतरच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. भाजपला त्यासाठी खूपच उशीर लागला. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपने प्रचाराला सुरूवात केली. याबाबतीत आप खूपच पुढे होती आणि त्यांची भक्कम तयारीही होती.
  • मोफत पाणी आणि मोफत वीज देण्याचा आपचा निर्णय खूपच निर्णायक ठरला. यापूर्वी २०१५ मध्येही आपला याचा फायदा झाला होता, तो यावेळीही झाला. निम्न वर्ग आणि निम्न मध्यम वर्गाला या निर्णयामुळे दिलासा मिळाला होता. त्यामुळे केजरीवाल आणि त्यांचा पक्ष गरिबांच्या कल्याणासाठी काम करतो, असा संदेश जनतेमध्ये गेला.
  •  आपने मोफत पाणी आणि विजेशिवाय लोकानुनयाची अन्यही आश्वासने दिली. डीटीसीच्या बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवासाचा निर्णयही निर्णायक ठरला. त्यामुळे महिलांमध्ये म्हणजेच अर्ध्या लोकसंख्येत आप आपल्यासोबत असल्याचा संदेश गेला. दुसरीकडे गरिबांना आधीपासूनच मिळणाऱ्या सवलतींमध्ये आणखी वाढ झाली. त्यामुळे आपची गरिबांचा कल्याणकारी पक्ष ही प्रतिमा आणखी मजबूत झाली.
  • महिलांमध्ये आप अधिक लोकप्रिय झाली आणि पुरूषांच्या तुलनेत महिलांनी आपला मोठ्या प्रमाणात मतदान केले. या निवडणुकीत आपला ५३ टक्के पुरूष आणि ५९ टक्के महिला मतदार मतदान करतील, असा अंदाज इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्येही वर्तवण्यात आला होता. हे ६ टक्के जास्तीचे मतदान खूपच निर्णायक ठरले. दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्यामुळे आप आपल्या सुरक्षेच्या मुद्यावर गंभीर आहे, असा संदेश महिलांमध्ये गेला. एकूणच महिलांची काळजी घेणारा पक्ष अशी आपची प्रतिमा निर्माण झाली.
  • अल्पसंख्यांक आणि मुस्लिम मतदारांमध्ये एकगठ्ठा मतदान करण्याची प्रवृत्ती राहिली आहे. यावेळी भाजपने मुस्लिमांच्या विरोधात जे वातावरण निर्माण केले, त्यामुळे ते प्रचंड नाराज होते. नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि शाहीनबागसारखे मुद्दे तर होतेच. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे, असे वातावरण निर्माण झाले. मुस्लिम मतदार काँग्रेसला मते देत होते, परंतु यावेळी काँग्रेसला मिळणारी मते आपकडे शिफ्ट झाली. भाजपला रोखण्यासाठी आपला मतदान करणेच आवश्यक आहे. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसच्या तुलनेत आपच चांगला पर्याय आहे, असे मुस्लिम मतदारांना वाटले. दिल्लीत केवळ १४ टक्के मुस्लिम मतदार आहेत. मात्र त्यांचे एकगठ्ठा मतदानही भाजपच्या पराभवाचे एक प्रमुख कारण ठरले.
  •  भाजपने राबवलेली टोकाची नकारात्मक प्रचार मोहीम त्यांच्या विरोधात गेली. त्यांनी ज्या पद्धतीचे वातावरण निर्माण केले आणि ज्या पद्धतीने जातीयवादी आणि प्रक्षोभक वक्तव्ये केली, त्यामुळे मध्यमवर्गीय मतदार नाराज झाले. ‘गोली मारो सालों को…’, ‘बिर्याणी…’, ‘पाकिस्तान…’, आणि कहर म्हणजे ‘अतिरेकी केजरीवाल..’ यासारखे मुद्दे लोकांच्या पचनी पडले नाहीत. हे मुद्दे भाजपवर बुमरँग झाले, म्हणजे भाजपवरच उलटले. त्यामुळेच भाजपला नुकसान सोसावे लागले.
  • अरविंद केजरीवालांचे सॉफ्ट हिंदुत्व भाजपच्या ‘जुमलेबाजी’वर वरचढ ठरले. केजरीवालांनी ज्या पद्धतीने हनुमान चालिसा वाचून दाखवली आणि हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले, त्यामुळे त्यांचे परिचितही अवाक झाले. केजरीवाल आणि आपच्या एकूणच राजकारणाशी हे काही सुसंगत नव्हते, त्यामुळेच केजरीवालांच्या परिचितांसाठीही हे नाविन्य होते. मात्र त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाची हवाच गुल झाली. ज्या आधारावर भाजप हिंदू मतदारांना आकर्षित करू पहात होती, केजरीवालांनी त्यालाही पद्धतशीरपणे छेद दिला. त्यामुळे हिंदू ही काही भाजपची मालमत्ता नाही आणि हिंदुत्वाचे कॉपीराइट भाजपकडे नाही, हेही स्पष्ट झाले.
  • भाजप अतिआत्मविश्वासाच्या स्वतःच्याच जाळ्यात अडकून बळी ठरली. लोकसभा निवडणुकीमुळे त्यांच्यात असा अतिआत्मविश्वास निर्माण झाला होता. भाजपने जम्मू-काश्मिरातील कलम ३७० रद्द केले, तीन तलाक अधिनियम मंजूर केला, नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी आणले. नागरिकत्व दुरूस्ती कायदा सोडला तर अन्य कुठल्याही मुद्यावर म्हणावा तसा जोरदार विरोध झाला नाही. त्यामुळे आपण अपराजित आहोत, आपल्याला तीव्र विरोधही होत नाही, असे भाजपच्या आघाडीच्या नेतृत्वाला वाटले. आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, असे केंद्रातील सत्ताधारी पक्षाला वाटले. त्यामुळेच भाजप नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरच अडून बसली आणि शाहीनबागेवर एकानंतर एक हल्ले सातत्याने चढवत राहिली. हेच भाजपला चांगलेच महागात पडले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा