नांदेड जिल्ह्यातील गऊळमध्ये महापुरूषाचा पुतळा हटवल्यामुळे तणाव, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

0
456

कंधारः नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील गऊळ येथे बसवण्यात आलेला महापुरूषाचा पुतळा हटवल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावावर पोलिसांनी लाठीमार केला. गुरूवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर आज शुक्रवारीही गावात तणावाचे वातावरण असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

 प्राप्त माहितीनुसार, गऊळ येथे बुधवारी मध्यरात्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला होता. कोणतीही परवानगी न घेता हा पुतळा बसवण्यात आल्याचे सांगत पोलिसांनी हा पुतळा हटवण्याचा आदेश दिला. परंतु ग्रामस्थांनी पुतळा हटवण्यास विरोध केल्यामुळे गुरूवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला.

 हा पुतळा बसवण्यात आल्यामुळे गावात वाद सुरू झाला. हा पुतळा हटवू नये, आम्ही पुतळ्याचे संरक्षण करू अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रितसर परवानगीसाठी पुढील प्रक्रिया करण्यात येईल. मात्र तोपर्यंत हा पुतळा हटवू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. तरीही पोलिस पुतळा हटवण्यावर ठाम होते. त्यामुळे गुन्हा दाखल झाला तरी चालेल परंतु पुतळा हटवू देणार नाही, अशी भूमिका गऊळ येथील काही ग्रामस्थांनी घेतली.

 त्यामुळे पोलिसांनी काल गुरूवारी मोठा फौजफाटा तैनात करत पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यालाही ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठीमार केला. ग्रामस्थांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आल्यामुळे गऊळ गावात मोठा तणाव निर्माण झाला असून तेथे अद्यापही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

गऊळच्या ग्रामसेवकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी ४० जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आला होता, त्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला आणि नमुना नंबर ८ लाही समाजाच्याच नावाने आहे, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा