बलात्काऱ्यांचा दया याचिकेचा अधिकार संपुष्टात आणून थेट शिक्षेची तरतूद कराः महिला काँग्रेस

0
68
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः बलात्कार करून खून करणे किंवा बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांचा दया याचिका दाखल करण्याचा अधिकार संपुष्टात आणून शिक्षेची थेट अंमलबजावणी करण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करा, अशी मागणी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अड. चारूलता टोकस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरूणीला जिवंत जाळल्याचा प्रकारामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. त्यानंतर औरंगाबाद व मुंबईतही अशाच घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांवर वचक बसणे आवश्यक आहे. अशा घटना घडूच नये म्हणून ठोस उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे सांगत टोकस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात काही उपाययोजनाही सूचवल्या आहेत. महिलांवर ऍसिड हल्ला करणे, पेटवून देणे, बलात्कार करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांकरिता सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांत बदल करून सदर गुन्ह्यांकरिता आणखी कठोर शिक्षेची तरतूद करावी, महिलांवर होणारे बलात्कार व खुनाच्या प्रकरणांमध्ये तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करणे व त्याची जलदगतीने सुनावणी घेऊन दोषींना शिक्षा होण्याकरिता एक महिन्याच्या कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, त्यासाठी कायदा करावा, पीडितेला तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल महिला अधिकाऱ्याला उघडपणे माहिती देता यावी यासाठी प्रत्येक पोलिस ठाणे व पोलिस चौक्यांत किमान एका महिला पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, कायद्यात दुरूस्ती करून बलात्कार करून खून करणे किंवा बलात्कार करणे अशा प्रकरणांत दोषी आरोपींचा दया याचिका किंवा मागणीचा अधिकार संपुष्टात आणून थेट शिक्षेची अंमलबजावणी करावी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशा अन्य विभागप्रमुखांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय महिला सुरक्षा समिती स्थापन करून बलात्कार, खून,  विनयभंग अशा प्रकरणांत तातडीने कारवाई करून प्रकरण जलदगतीने न्यायप्रविष्ठ करावे आणि पीडितेला तातडीने सर्व प्रकारची मदत मिळवून द्यावी, सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग व अन्य शैक्षणिक प्रतिष्ठाने, प्रशिक्षण वर्ग, सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे, पथदिवे लावणे बंधनकारक करावे, अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, अशा उपाययोजनाही टोकस यांनी सूचवल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा