टीईटी परीक्षा घोटाळाः राज्य परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरेंना अटक, बडे मासे अडकणार?

0
963
संग्रहित छायाचित्र.

पुणे/औरंगाबादः शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आणखी एका मोठ्या माशाला अटक केली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त आणि औरंगाबाद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली आहे. डेरेंना अटक करण्यात आल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.

 सुखदेव डेरे यांच्या अटकेमुळे टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे आता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळापर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे २०१८ मध्येही टीईटी परीक्षेचा पेपर फुटला होता. तेव्हा सुखदेव डेरे हे महाराष्ट्र राज्या परीक्षा परीक्षेचे आयुक्त होते.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

 सुखदेव डेरे यांची कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक असताना सरकारची मंजुरी न घेता डेरेंनी अनेकांना नोकऱ्या दिल्या होत्या. त्या प्रकरणात डेरे निलंबित झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच डेरेचे निलंबन रद्द करून त्यांना अत्यंत महत्वाचे मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली होती. विशेष म्हणजे हा सर्व घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारच्या कार्यकाळातीलच आहे.

 टीईटी परीक्षा घोटाळा हे काही आताचे प्रकरण नसून त्याची पाळेमुळे खूप आधीपासूनच रूजलेली आहेत, हे सुखदेव डेरे यांच्या अटकेमुळे स्पष्ट झाले आहे. डेरे यांच्या अटकेमुळे या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अनेक बड्या माश्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना मदत होण्याची शक्यता आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने सोमवारी सुखदेव डेरे यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर टीईटी परीक्षा घोटाळ्यात त्यांचाही हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. टीईटी परीक्षेचे कंत्राट जीए टेक्नॉलॉजी कंपनीला २०१७ मध्ये देण्यात आले, तेव्हा सुखदेव डेरे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त होते. तेव्हापासूनच टीईटी परीक्षेत गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा तत्कालीन संचालक अश्विनकुमारलाही बंगळुरूमधून अटक केली आहे. २०१८ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतही या सर्वांनी मिळून असाच गैरप्रकार करून अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचेही निष्पन्न झाले आहे.

संच मान्यतेतही केला होता घोटाळाः डेरे हे ४ डिसेंबर २०१२ ते १६ जानेवारी २०१४ या काळात औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक होते. सुखदेव डेरे यांनी शिक्षण उपसंचालक असताना कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संच मान्यतेत घोटाळा केला होता. वेगवेगळ्या संस्थांच्या संच मान्यतेच्या वेळी सरकारची मंजुरी न घेताच काही पदे भरली होती. त्यांच्या या घोटाळ्याची चौकशी नाशिकच्या विभागीय मंडळाचे अध्यक्ष डी.जी. जगताप यांनी केली होती. या चौकशीत ६ संस्थांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील संच मान्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. सुमारे २५ पदांना मान्यता देताना डेरे यांनी पूर्वलक्षी प्रभावाने पदे मंजूर केली होती. डेरे हे औरंगाबाद विभागीय मंडळाचे अध्यक्ष असताना ही चौकशी झाली होती. या चौकशीनंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा