टीईटी घोटाळाः ५०० नापास उमेदवारांना केले पास, सुखदेव डेरेंच्या अटकेनंतर पोलिसांचा खुलासा

0
568
संग्रहित छायाचित्र.

पुणेः शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. २०१८ मध्येही टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाला होता. २०१८ च्या टीईटी घोटाळ्याचा सूत्रधार सुखदेव डेरेला अटक करण्यात आली आहे. त्यांनी टीईटी परीक्षेत नापास झालेल्या जवळपास ५०० उमेदवारांना टीईटी पास झाल्याची प्रमाणपत्रे दिली आहेत. बऱ्याच प्रमाणात खोटी प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत, असा खुलासा पुणे पोलिसांनी केला आहे.

 म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना इतर परीक्षांमध्येही घोटाळे झाल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याही घोटाळ्याचा तपास सुरू केला. या तपासात २०१८ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्याचा सूत्रधार सुखदेव डेरे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. टीईटीची ही परीक्षा १५ जुलै २०१८ रोजी पार पडली होती. तिचा निकाल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी लागला होता. त्यावेळी सुखदेव डेरे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त होते. तर परीक्षा घेण्याचे कंत्राट जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीकडे होते. या प्रकरणी ८ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी सुखदेव डेरे आणि बंगळुरूच्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा प्रमुख अश्वीनकुमारला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

हेही वाचाः टीईटी परीक्षा घोटाळाः राज्य परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरेंना अटक, बडे मासे अडकणार?

टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पैसे दिलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील ओएमआर रिकामे सोडण्यास सांगितले जायचे. उत्तरपत्रिका स्कॅन करताना त्या  उमेदवारांच्या उत्तरपत्रिका भरल्या जायच्या अथवा गुणपत्रिकेद्वारे हा घोटाळा केला जायचा. सुखदेव डेरे सूत्रधार असलेल्या या घोटाळ्यात उमेदवारांना खोटी प्रमाणपत्रेही देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे, असे गुप्ता म्हणाले.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

२०१८ मध्ये एफआयआर, पण तपासच झाला नाहीः २०१८ च्या घोटाळ्यात टीईटी परीक्षा नापास झालेल्या जवळपास ५०० उमेदवारांना टीईटी परीक्षा पास झाल्याची प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. बऱ्याच प्रमाणात खोटी प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून या घोटाळ्यातील आणखी काही आरोपींना टप्प्याटप्प्याने अटक करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पुरावेही मिळाले आहेत. २०१८ मध्ये या प्रकरणी एक गुन्हाही नोंदवण्यात आला होता. पण त्याचा अधिक तपास न झाल्यामुळे या प्रकरणात पुढे कारवाई झाली नाही, असे गुप्ता म्हणाले.

घोटाळ्याचा आकडा ५ कोटींवरः टीईटी घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे आणि प्रीतिश देशमुख या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात २०१८ च्या टीईटी परीक्षेतील घोटाळाही समोर आला. सुखदेव डेरेंकडील कागदपत्रे, लॅपटॉपमधील माहितीवरून या घोटाळ्याची लिंक पुढे आली. प्राथमिक तपासात ५०० उमेदवारांना टीईटी प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. हा व्यवहार ५ कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे, असेही गुप्ता म्हणाले.

नापास असतानाही पास झालेले गुरूजीही रडारवरः सुखदेव डेरेच्या अटकेनंतर नापास असतानाही ५०० उमेदवारांना टीईटी परीक्षा पास झाल्याची प्रमाणपत्रे दिल्याची माहिती पुढे आल्यानंतर नापास असतानाही पैसे देऊन पास झालेले गुरूजीही आता पोलिसांच्या रडावर आहेत. पैसे देऊन गुरूजी होण्याची पात्रता विकत घेण्याचा घोटाळा करणारे हे उमेदवारही पुढच्या टप्प्यात पोलिस कारवाईचे लक्ष्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोटाळे करून गुरूजी होण्यास पात्र ठरलेल्या अशा उमेदवारांचेही धाबे दणाणले आहे. पोलिसांनी टप्प्याटप्प्याने अटकेचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या गुरूजींचा नंबर नेमका कोणत्या टप्प्यावर लागतो, या धास्तीने अनेकांची झोप उडाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा