थेट जनतेमधून सरपंचाची निवड करण्याची पद्धत रद्द, सदस्यांमधूनच निवडणार गावचा कारभारी!

0
267
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः गावच्या सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने रद्द केला. फडणवीस सरकारने केलेला थेट सरपंच निवडीचा कायदा उद्धव ठाकरे सरकारने रद्द केला असून या पुढे ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे.

2017 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांचीही निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय घेतला होता. सरपंचांवर वारंवार दाखल होणारे अविश्वास ठराव आणि त्यातून होणारा भ्रष्टाचार याला यामुळे आळा बसेल, अशी तेव्हाच्या सरकारची अटकळ होती. थेट जनतेमधून निवडलेल्या सरपंचाविरुद्ध किमान दोन वर्षे अविश्‍वास ठराव दाखल करता येणार नाही, अशी तरतूदही कायद्यात करण्यात आली होती. ग्रामसभेत अर्थसंकल्प सादर करण्याचे अधिकारही सरपंचांना देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली होती. फडणवीस सरकारच्या या निर्णयाला तेव्हाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. थेट जनतेतून सरपंचाची निवड केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्यातच संघर्ष होऊन गावाच्या विकासाला खीळ बसेल, अशी भीती या दोन्ही काँग्रेसने त्यावेळी व्यक्त केली होती.

 आता सरपंचांची निवड लोकांमधून थेट निवडणुकीने करण्याऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम7, कलम 13, कलम 15, कलम 35, कलम 43, कलम 62, कलम 62 अमध्ये दुरुस्ती व कलम 30 अ-1 व कलम 145-1 अचा नव्याने समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याशिवाय खर्चाच्या विवरणाच्या संदर्भातही सुधारित वेळापत्रकात बदल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित कायद्यामध्ये दुरूस्ती करण्यासाठी लवकरच अध्यादेश जारी करण्यात येणार आहे.

सरपंच परिषदेचा मात्र विरोधः महाराष्ट्र सरपंच परिषदेने मात्र महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सरकारला गाव पातळीवर नवे नेतृत्व निर्माण होऊ द्यायचे नाही, असा आरोप सरपंच परिषदेने केला असून आज शेगावमध्ये या निर्णयाच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा