कोरोनाची लस घेतली का?, शरद पवारांनीच सांगितले उत्तर

0
767
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी सिरम तयार करत असलेली कोरोनाची लस घेतली असावी, अशी चर्चा अनेकांकडून ऐकायला मिळते. यावर आता शरद पवार यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. लोकांना वाटते की, सिरमचे प्रमुख माझे वर्गमित्र आहेत. त्यामुळे मी ही लस घेतली आहे, असे लोकांना वाटते. लोक खासगीत तशी चर्चा करतात. मात्र मी आणि माझ्या स्टाफने घेतलेली लस कोरोनावरची नसून रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे, असे पवार म्हणाले. कोरोनावरची लस येण्यासाठी जानेवारीपर्यंतचा काळ लागेल, असे सिरमकडून सांगण्यात आले आहे, असेही पवार म्हणाले.

 पवार यांनी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेवरही भाष्य केले. उत्तर प्रदेशातील घटनेत तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिचा मृतदेहही तिच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला नाही. त्याऐवजी मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आले. अशाप्रकारची घटना आजपर्यंत देशातील जनतेने पाहिलेली नाही. उत्तर प्रदेश सरकारने कायदा हातात घेऊन टोकाची भूमिका घेतली. त्यांच्या या कृतीतून कायद्याला कवडीचीही किंमत दिली जात नाही, हे स्पष्ट होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत जे घडले ते योग्य नाही, असेही पवार म्हणाले.

मराठा आरक्षणावर आणखी दहा जणांनी कोर्टात जावेः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय आता आपल्यापुढे पर्याय नाही, असे शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी म्हटले होते. त्याबाबत विचारले असता, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार कोर्टात गेले आहे. आणखी कुणी जात असेल तर दहा जणांनी जावे. काहीही झाले तरी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली पाहिजे हीच सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा