नाट्यगृहात कलाकारांची हेरगिरी: ज्येष्ठ नाटककार जयंत पवारांची खुल्या पत्रात उद्विग्नता

0
103

औरंगाबाद: देशात कलाकार आणि लेखक-साहित्यिकांवर कोणतीही बंदी अथवा दबाव आणण्यात येत नसल्याचा दावा केला जात असला तरी मुंबई आणि पुण्यात नाटकाचे प्रयोग सुरू असताना पोलिसांनी चौकशी केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या मुस्कटदाबीच्या प्रकारावर ज्येष्ठ नाटककार आणि लेखक जयंत पवार यांनी कलाक्षेत्रातील मान्यवरांना उद्देशून पत्र लिहून उद्विग्नता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मागच्या महिन्यात दिल्लीच्या जननाट्य मंचच्या ‘तथागत’ या नाटकाचा प्रयोग मुंबईत झाला. त्याच्या प्रयोगावेळी पोलिसांनी चौकशी केली होती. जननाट्य मंचच्या प्रमुख सुधन्वा देशपांडे यांचीही पोलिसांनी चौकशी केल्याचे उघडकीस आले आहे. किस्सा कोठी ग्रुपच्या ’रोमिओ रविदास और ज्युलिएट देवी’ या हिंदी नाटकातील कलाकारांचीही चिंचवड येथील हॉटेलमध्ये जाऊन  पोलिसांनी झाडाझडती घेतली होती. चौकशीच्या या दोन्ही घटनांवरून ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कुणाचीही मुस्कटदाबी सहन करू शकत नाही, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी कलाक्षेत्रातील मान्यवरांना लिहिलेले पत्र त्यांच्याच शब्दांत…

नमस्कार,

पत्र लिहिण्यास करण की, नुकताच मुंबई आणि पुणे येथे घडलेल्या दोन घटनांनी मी चिंतीत झालो आहे. पण मी चिंतीत झालो म्हणून नव्हे तर कुणालाही चिंता वाटावी अशा त्या घटना आहेत, असे मला वाटल्यामुळेच हे पत्र. शिवाय या घटना नाटकाशी-नाटकवाल्यांशी संबंधीत असल्यामुळे कलाव्यवहाराशी संबंधीत असल्यामुळे तुम्हाला ते पाठवावे असे मला वाटले. त्याबाबत आपले मत जाणून घ्यावे, हाही माझा उद्देश आहे.

ऑगस्ट महिन्यातच या घटना घडलेल्या आहेत आणि अजून त्याची कुठेही फारशी वाच्यता वा त्याबद्दल चर्चा झालेली नाही.

9 ते 11 ऑगस्ट या दिवसांत दिल्लीहून जन नाट्य मंच (जनम) हा ग्रूप ‘तथागत’ हे नाटक घेऊन मुंबईला आला होता. हे नाटक सधारण 45 मिनिटांचे, छोटेखानी आहे. ते पथनाट्याच्या स्वरूपाचे आहे. परंतु सादरकर्ते बंदिस्त सभागृहातही त्याचे प्रयोग करतात. मुंबईत त्याचे तीन दिवसांत आठ ठिकाणी प्रयोग झाले. नाटकाचा 10 ऑगस्ट रोजी आंबेडकर भवन, दादर येथे प्रयोग होता. तेव्हा पोलिस येऊन नाटकाविषयी चौकशी करून गेले. त्याबद्दल खटकण्यासारखे काही कुणाला वाटले नाही. परंतु दुसर्‍या दिवशी 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता अंधेरीच्या हरकत स्टुडिओ या छोट्या नाट्यगृहात असलेल्या प्रयोगाच्या आधी वर्सोवा पोलिस स्टेशनचे दोन सीआयडी नाट्यगृहात आले. त्यांनी नाटकाच्या सेटचे फोटो काढले. त्यानंतर जन नट्य मंच ग्रूपचे प्रमुख सुधन्वा देशपांडे यांची चौकशी केली. नाटकाच्या स्वरूपाबाबत चौकशी केली. त्यानंतर हरकत स्टुडिओच्या मॅनेजरकडे यांना प्रयोगाला परवानगी कशी दिली, अशी विचारणा करत चौकशी केली. त्यानंतर हे पोलिस इमारतीच्या बाहेर गेले आणि तिथे प्रयोग बघण्यासाठी आलेल्या लोकांचेही त्यांनी फोटो काढले. पुढे नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यावर 5 ते 7 मिनिटांनी हे दोन्ही पोलिस नाट्यगृहात घुसले आणि रंगमंचपासून चार ते पाच फुटांवर असलेल्या प्रवेशद्वारात उभे राहिले. तिथून त्यांनी प्रयोग पाहिला. नंतर काहीच झाले नाही. ते निघून गेले.


आज अनेकजण असे समजतात की, सध्या सगळीकडे सुरळीत चाललेले असताना अशा किरकोळ दहशतीच्या आणि हिंसेच्या गोष्टींचा बाऊ करू नये. त्यामुळे जे अशा गोष्टींच्याविरुद्ध आवाज उठवू पहातात त्यांचा आपल्याला राग येतो. कलाक्षेत्रात आलबेल आहे. कोणावरही बंदी आलेली नाही. कोणीही दहशत माजवत नाही, असा आपला दृढ समज आहे. अशा नकारात्मक गोष्टींविषयी बोलणे म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीला अडथळा आणणे आहे, अशी आपली धारणा आहे.

दुसरी घटना 15 ऑगस्टच्या पहाटे किंवा 14 ऑगस्टची मध्यरात्र उलटून गेल्यावर पुण्यातल्या एका हॉटेलवर घडली. किस्सा कोठी या नावाने तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेला ग्रूप ‘रोमिओ रविदास और ज्युलिएट देवी’ हे हिंदी नाटक घेऊन काही प्रयोग करण्यासाठी मुंबईतून पुण्याला गेला होता. 14 तारखेला रात्री ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ इथला प्रयोग संपवून हा पाच जणांचा ग्रूप चिंचवड इथल्या कामिनी नावाच्या हॉटेलवर मुक्कामाला गेला असता मध्यरात्री नंतर अडीच वाजता दोन पोलिसांनी त्यांच्या रूमवर धाड टाकली.’तुमच्यात यश खान कोण आहे? तो इथे कसा आला?’ असे विचारत यश खान या तरुणाची झडती घेतली. त्याचे आयडी प्रूफ तपासले. त्याच्या रूममध्ये असलेल्या दोघांशी त्याचा काय संबंध आहे अशी विचारणा करत तीन पुरुष व दोन स्त्रिया रहात असलेल्या ग्रूपच्या दोन्ही रूमची तपासणी केली. नाटकाचे सर्व सामान उचकटून पाहिले आणि निघून गेले. अशी झडतीकरण्याचे कुठलेही वॉरंट त्यांच्यापाशी नव्हते. 15 ऑगस्ट्च्या सुरक्षेसाठी ही तपासणी आहे, असे त्यानी नंतर सांगितल्याचे कळते. पण तसे असेल तर संपूर्ण हॉटेलची किंवा इतर खोल्यांची झडती वा अन्य माणसांची चौकशी झालेली नाही. म्हणजे यश खान नावाच्या एका तरुणाकडूनच धोका असल्याची खबर पोलिसांना मिळाली असावी. ती कोणी दिली व त्यातून काय निष्पन्न झाले, या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. मात्र नाटकाचे बॅकस्टेज सांभाळणार्‍या यश खान या एका साध्या तरुणाच्या मनात आणि त्याच्या कुटुंबात कायमची दहशत मात्र निर्माण झाली. या दोन्ही घटना नाट्यकर्मींमध्ये प्रत्यक्ष दहशत निर्माण करणार्‍या आहेत, असे मला वाटते आणि त्या एका सरकारी यंत्रणेकडून घडवल्या गेलेल्या आहेत.

आज अनेकजण असे समजतात की, सध्या सगळीकडे सुरळीत चाललेले असताना अशा किरकोळ दहशतीच्या आणि हिंसेच्या गोष्टींचा बाऊ करू नये. त्यामुळे जे अशा गोष्टींच्याविरुद्ध आवाज उठवू पहातात त्यांचा आपल्याला राग येतो. कलाक्षेत्रात आलबेल आहे. कोणावरही बंदी आलेली नाही. कोणीही दहशत माजवत नाही, असा आपला दृढ समज आहे. (महाराष्ट्रात दोन विचारवंत-कार्यकर्यांचे, जे लेखकही होते, खून झालेले आहेत हे आपण आता विसरूनही गेलेलो आहोत.) अशा नकारात्मक गोष्टींविषयी बोलणे म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीला अडथळा आणणे आहे, अशी आपली धारणा आहे.


 विचारांनी डावं असणे आणि मुसलमान असणे या दोन्ही गोष्टी आज अक्षेपार्ह आहेत असे तुम्हाला वाटते का? राज्यकर्त्यांच्या विरोधी विचारसरणी असेल तर तो गुन्हा ठरेल का? सरकारी आदेशावीना पोलिस अशा प्रकारे आदेशपत्राची अधिकृत प्रत नसताना कुठेही घुसखोरी करून चौकशी व झडती करू शकतील असे तुम्हाला वाटतं का? तुम्ही या घटनेचा जाहीर निषेध कराल का? सरकारला याबद्दल कोणी जाब विचारला तर तुम्ही त्याचे समर्थन कराल का?

या पार्श्वभूमीवर तुम्हाला वर नमूद केलेल्या गोष्टी गंभीर वाटतात का? त्या मराठी नाटकांशी संबंधित नाहीत, म्हणून आपण त्या दुर्लक्षित करणे रास्त ठरेल का? वरीलपैकी पहिले नाटक करणारी संस्था डाव्या विचारांची आहे. (काँग्रेसच्या काळात ज्यांची हत्या झाली ते प्रसिद्ध रंगकर्मी सफदर हाश्मी यांच्या पत्नी मालोश्री या या संस्थेच्या प्रमुख आहेत.) दुसर्‍या नाटकाच्या ग्रूपमध्ये एक रंगकर्मी धर्माने मुसलमान आहे. विचारांनी डावं असणे आणि मुसलमान असणे या दोन्ही गोष्टी आज अक्षेपार्ह आहेत असे तुम्हाला वाटते का? राज्यकर्त्यांच्या विरोधी विचारसरणी असेल तर तो गुन्हा ठरेल का? सरकारी आदेशावीना पोलिस अशा प्रकारे आदेशपत्राची अधिकृत प्रत नसताना कुठेही घुसखोरी करून चौकशी व झडती करू शकतील असे तुम्हाला वाटतं का? तुम्ही या घटनेचा जाहीर निषेध कराल का? सरकारला याबद्दल कोणी जाब विचारला तर तुम्ही त्याचे समर्थन कराल का? हे प्रश्न विचारून मी तुम्हाला जाब विचारतो आहे, असा कृपया गैरसमज करून घेऊ नये. तुम्ही यापैकी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तरी माझे काहीच म्हणणे नाही. शेवटी मौन हेही सूचक आणि बोलके असते. मात्र तुम्ही काही बोलाल ही अपेक्षा मात्र आहे. मी कोणाचीही मुस्कटदाबी (अगदी माझ्या विरोधकांचीही) मान्य करू शकत नाही. म्हणूनच न राहवून मी हे पत्र मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला लिहिलेले आहे.चूक भूल द्यावी घ्यावी.

आपला मित्र

जयंत पवार

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा