शिवसेना-एमआयएमचा हाच का खरा चेहरा?

0
312

उद्धव भा. काकडे / औरंगाबाद

एमआयएम व शिवसेना हे दोन्ही पक्ष औरंगाबादेत मतलबी राजकारण करत आहेत. जिल्ह्यातील मतदारांच्या डोळ्यांत हिंदू-मुस्लिमविरोधी जातीचे विष पेरून धूळफेक करत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत असल्याचे विधान परिषद निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत स्वतःकडे बहुमत असतानाही शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांनी एमआयएमला सोबत घेत विक्रमी मतांनी विजय मिळवला. याच एमआयएमने लोकसभा निवडणुकीत आपल्याला धूळ चारत शिवसेनेचा बालेकिल्ला हस्तगत केला, याचा पद्धतशीर विसरही शिवसेना नेत्यांना पडला.

 राजकारणात सख्या बापावरही विश्‍वास ठेवू नये असे म्हणतात,तेच खरे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी राजकारणी कोणत्याही थराला जाऊ शकतात, याची प्रचीती मागील चार वर्षांत केंद्र व राज्यातील राजकीय घडामोंडीवरून मतदारांना येत आहे. सध्या भाजप भस्मासुरासारखा बाहेरच्या पक्षातील विशेषतः काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना आपल्याकडे ओढत आहे. सत्ता लालसेच्या या धबडग्यात निष्ठावंत बाजूला पडले आणि भाजपमध्ये उपर्‍यांचीच दादागिरी आगामी काळात पहायला मिळेल, असे सांगितले जाऊ लागले आहे. यातच नुकत्याच झालेल्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतून औरंगाबादेतील शिवसेना-एमआयएमचा खरा चेहरा समोर आला आहे. शिवसेना-भाजप युतीकडे या निवडणुकीत निवडून येण्यासाठी स्पष्ट बहुमत होते. मात्र, मित्रपक्ष भाजप लोकसभा निवडणुकीप्रमाणे दगाफटका करेल, या भीतीने परमशत्रू मानणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकांनाही शिवसेनेने जवळ केले. लोकसभा निवडणुकीत याच एमआयएमने शिवसेनेकडून औरंगाबादचा बालेकिल्ला हस्तगत करत चारवेळ खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरेंना चारीमुंड्या चित केले. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला या पराभवाचा विसर पडला. याचाच अर्थ शिवसेना-एमआयएमचे हे राजकारण केवळ मतलबापुरतेच असल्याचे यावरून स्पष्ट झाले. आता मतदारही तसे उघडपणे बोलू लागले आहेत.

  मग जातीचे विष पेरता तरी कशाला?

लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात नव्हे तर हिंदू-मुस्लिमविरोधी भाषणे करत आपल्या गटाचे मतदार स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादेत हे राजकारण पूर्वीपासूनचेच आहे. फरक एवढाच की पूर्वी काँग्रेस होते, आता एमआयएमला पुढे करून शिवसेना कांगावा करते आहे. मात्र, हा कांगावा केवळ स्वार्थासाठी आहे. मतदारांचा शिवसेना, एमआयएमवरील विश्‍वाास आता उडताना दिसत असल्याचे जाणकार सांगतात. स्वार्थासाठीच तुमचे राजकारण असेल तर मग जातीचे विष पेरता तरी कशाला? असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

 वो डिल सिर्फ खडे रहने की थी! तो

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना मतदारांच्या नाराजीमुळे फटका बसू शकतो, असा पक्षीय अहवाल लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत मातोश्रीवर गेला होता. त्यामुळे खैर यांनी एमआयएमला पुढे करून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याकरवी इम्तियाज जलील यांना निवडणुकीत उभे केले. यासंबंधीच्या वाटाघाटी उमेदवार उभा करण्यापुरत्याच होत्या. या वाटाघाटीची त्यावेळी सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली होती. प्रत्यक्षात एमआयएमने बदलाचे वारे पाहून निवडून येण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. परिणामी शिवसेनेचा गड एमआयएमच्या ताब्यात गेला. तेव्हा शिवसेना नेत्यांनी बरीच आगपाखड केली. मात्र आवेसींनी स्पष्ट सुनावले की ‘वो डिल तो सिर्फ खडे रहने की थी! कौन चुनके आयेगा इसकी नही’, अशी माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा