राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यानांही धमकीचे फोन

0
65
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाऊदच्या हस्तकाने फोन करून धमकी दिल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही रविवारी धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. धमकीच्या फोनमुळे राजकारणात खळबळ उडाली असून गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करीत आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी रविवारी दुबईहून दाऊदचा हस्तक बोलत असल्याचे सांगत फोनवरून मातोश्री उडवून देण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे खळबळ उडताच उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली. सोमवारपासून अधिवेशन सुरु होत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले होते. या बैठकीतच शरद पवार व अनिल देशमुख यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी भारताबाहेरून फोन आला होता. ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणी भाष्य केल्याने गृहमंत्र्यांना धमकीचे फोन आल्याची चर्चा आहे. मात्र हा फोन भारतातून आल्याचे समजते. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आणि मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तिच्या वादग्रस्त गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांची तुलना माफियाबरोबर करणाऱ्या कंगनाला चांगलेच सुनावले होते. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही,’ असे गृहमंत्री देशमुख म्हणाले होते. या वक्तव्यावरूनच त्यांना फोन आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ज्यांना धमकीचे फोन आले आहेत त्याची गुन्हे विभागाकडून चौकशी सुरु असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

धमकी मागील करविता लवकरच उघड होईलः समाजविघातक प्रवृत्तीने पुन्हा डोकेवर काढायचा प्रयत्न केला आहे. धमक्याबाबत मंत्रिमंडळात चर्चाही झाली. त्याचा सर्वांनी निषेध केला. या प्रकरणाची चौकशी गृहविभाग करणार आहे. यामागे कोण करविता आहे हे ओळखण्याचे काम होईल. मला नक्की खात्री आहे की, महाराष्ट्राचे गृहखाते लवकरात लवकर या निष्कर्षाला पोहोचेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा