नांदेडमध्ये गोदावरी नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंनी होणार तीन पदरी पूल!

0
105

मुंबई: गोदावरी नदीवरील अस्तित्वातील पुलाच्या दोन्ही बाजूने तीन पदरी पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या पुलाच्या एका बाजूने १.५० मी. पदपथ प्रस्तावित करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रस्तावित लांबीमध्ये सिमेंट काँक्रिटचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी प्रस्तावित काट-छेदप्रमाणे सिमेंट काँक्रिट पृष्ठभागाचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उ.प्र. देबडवार, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग (कोकण) मुख्य अभियंता त.की. इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव जंजाळ, रहाणे, अधीक्षक अभियंता औटी यावेळी उपस्थित होते.

महापालिकेकडील तांत्रिक मनुष्यबळ व निधीअभावी या प्रकल्पाचे बांधकाम करणे शक्य नसल्याने पालकमंत्री चव्हाण यांनी या प्रकल्पाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्याबाबत सूचना केली आहे. याबाबत पायाभूत समितीची मान्यता घेण्यात यावी तसेच याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

हिंगोली गेट ते धनेगाव रस्त्यापर्यंत उड्डाणपूलः हिंगोली गेट ते बाफना चौक या संपूर्ण रस्त्याची लांबी ४.५ किमी असून यावर अनेक जंक्शन आहेत. या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या असल्याने हिंगोली गेटपासून ते धनेगाव जंक्शनपर्यंत १४ मीटर रुंदीचा उड्डाणपुल प्रस्तावित करण्यात आला आहे.

उड्डाणपुलाचे काम एमएसआरडीसीच्या बजेटमधूनः नांदेड शहरातील एमएसआरडीसीमार्फत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाबाबत मंत्रालयात आढावा घेण्यात आला. नांदेड शहरातील उड्डाणपुलाचे काम एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आले. याबाबत पायाभूत समितीची मान्यता घेण्यात येणार असून या प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात येणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

भोकर ते रहाटी रत्याचे तातडीने काँक्रिटीकरणः भोकर ते रहाटी रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याची लांबी २३ कि.मी. असून राष्ट्रीय महामार्गमार्फत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करुन हे काम तातडीने पूर्ण करा, असे निर्देश चव्हाण यांनी दिले. भोकर ते रहाटी रस्त्याचे काम प्रलंबित असल्यामुळे याबाबत जनक्षोभ निर्माण होऊन अनेक तक्रारी, निवेदने माझ्याकडे आली होती. नांदेड ते भोकर रस्त्याची परिस्थिती बिकट असून या कामासाठी बराच कालावधी गेला आहे. या कामामध्ये लक्ष घालून काम केल्यास ते लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. या रस्त्याचे संपूर्ण सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. या कामाला पुन्हा मंजुरी देऊन निविदा काढण्यात यावी. कामास जानेवारीपर्यंत सुरुवात करावी, असे चव्हाण म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा