टिपू सुल्तान : सांप्रदायिक धुव्रीकरणाचा बळी ठरलेला वीरयोद्धा!

0
221
संग्रहित छायाचित्र.

 टिपू सुल्तान हा क्रुरकर्मा, प्रचंड धर्माभिमानी आणि हिंदुद्वेष्टा असल्याचे सांगून कर्नाटक सरकारने टिपू सुल्तानची जयंती साजरी करू नये असा फतवा बजावला. आज टिपू सुल्तानची जयंती आणि इद-ए- मिलादही आहे. त्यानिमित्त टिपू सुल्तानची व्यक्तिरेखा आणि कार्यकर्तृत्व डोळसपणे समजून घेण्याची गरज आहे. राजकीय लाभासाठी एखाद्या वीरयोद्धयाचे सांप्रदायिकरण करणे हे जेवढे क्लेशकारक, तेवढेच त्याकडे दुर्लक्ष करणेही घातक आहे. टिपू सुल्तान समजून घेण्यासाठी पुण्यात एक कार्यक्रम होत आहे, त्यानिमित्त…

आर. एस. खनके, पुणे

‘अल्पसंख्यक समाज हा बहुसंख्यक समाजाचा शत्रू आहे, त्यांच्यापासून बहुसंख्यकांना धोका आहे आणि त्यापासून आम्हीच (दक्षिण पंथी) आपले संरक्षण करु शकतो हे पटवून देण्यात यशस्वी झाले की बहुसंख्यकांचे (भारतीय संदर्भात; जातीय अस्तित्व लोप पावून धर्माच्या झेंड्याखाली एकत्र येत) धार्मिक ध्रुवीकरण पथ्यावर पडून त्यांच्या मतपेढीवर कब्जा मिळवत लोकशाहीत बरेच काही मिळवता येते.’ असे गॅरी कास्पारोव्ह या बुद्धीबळपटूचे लोकशाहीबाबतचे निरीक्षण सद्यस्थितीतील भारतातील सांप्रदायिक कलह लावण्याच्या मानसिकतेसाठी समर्पक आहे. सन 2011 च्या जनगणने नुसार भारतात विविध धर्माचे पालन करणारांची वर्गवारी पाहता 79.8% हिंदू ,14.2% इस्लाम,2.3% ख्रिस्ती, 1.7%शीख अशी संख्या आहे. बौद्ध आणि जैन धर्मीय लोकांची संख्या प्रत्येकी एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. असे असताना बहुसंख्यकांना अल्पसंख्यक समुदायापासून धोका असल्याचे सातत्याने एकवले जातेय.

          आज टिपू सुल्तान यांची जयंती आणि इद- ए- मिलाद आहे. काल अयोध्येतील वादग्रस्त जागेचा झालेला न्यायनिवाडा. या पार्श्वभूमीवर कलागत लावणाऱ्या तोंडाळ वाहिन्यांना इथल्या भारतीय सपुतांनी संयमाने प्रतिसाद देत आपसातील एकात्मता आणि सामाजिक सौहार्द टिकवून ठेवले. यासारखी गंगा-जमुनी तहजीब दुसरी असू शकत नाही. पुण्यात आज टिपू सुल्तान समजून घेण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. त्यानिमित्त टिपू सुल्तानवरील अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. हा जागरुक संपादक, वाचक आणि लेखक यांनी घडवून आणलेला चांगला योग आहे. कर्नाटकात कारभाऱ्यांनी टिपूची जयंती साजरी करायची नाही, असा फतवा काढलेला असताना सरत्या आठवड्यात कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकारला असल्या मनमानी निर्णयावर पुनर्विचार करायला सांगितलेले आहे. यावरून सदरचा निर्णय ‘आले राजाच्या मना…’ अशाच न्यायाने घेतला गेला हे स्पष्ट होते. महाराष्ट्रात शिवरायांचा धडा आयसीएसईच्या पाठ्यक्रमातून वगळणे आणि त्यापाठोपाठ कर्नाटकात टिपूचा धडा पाठ्यक्रमातून वगळला जाणे आणि सावरकर यांना भारतरत्न देण्याचा अजेंडा पुढे करणे हा काही निव्वळ योगायोग नाही. यामागे असलेला समान विखारी विचारांचा धागा आणि विद्वेषी प्रेरणा समजून घेणे आवश्यक आहे. इतिहास जसा असेल तसा नव्या पिढी पुढे ठेवून त्यावर नव्या पिढीला सारासार तौलनिक विवेक करण्याची संधी देणे आवश्यक आहे. पण तसे न होता पूर्वग्रह दूषित विशेषणे लावत कोवळ्या बालमनावर विद्वेषाचे संस्कार करणारे पाठ्यक्रम नक्कीच उपयोगाचे नाहीत.

माझ्या रोजच्या जगण्याला जेवढे समाजघटक येन केन प्रकारेन हातभार लावतात, ते सर्व समाजघटक माझ्या मार्गाने या देशाचे आवश्यक घटक आहेत. पण माझ्याच शरीराचे डोक्याकडून पायाकडे असणारे अवयव श्रेष्ठ आणि कनिष्ठ संवर्गात विभागणारी आणि माझ्याच शरीराच्या अवयवांना चातुर्वर्ण्य भेदात अडकवणारी, माझ्या पिंडातूनच भेदाची सुरूवात करत माझ्या समग्र पिंडाचा समान सन्मान करण्यापासून स्वत:लाच परावृत्त करणारी आणि माझ्या शरीराचा आत्मसन्मान गमवायला लावणारी पिंडापासून ब्रम्हांडाकडे अशी व्यापक होत जाणारी शिकवण याच उच्च-निच्चतेच्या न्यायाने  राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा घडवत असेल तर यासारखे एकात्मतेच्या विरोधी असणारे राष्ट्रद्रोही अवलक्षण दुसरे नाही. हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची गरज आहे. म्हणून या भेदापलीकडील देशी-विदेशी लोकांकडून राष्ट्रपुरुषांची ओळख करुन घेत इतिहास समजून घेण्याची वेळ नव्या जिज्ञासू पिढीवर येत आहे.  


आठराव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात इंग्रजांच्या समोर जे सामरिक आव्हान टिपू सुल्तानने उभे केलेले होते आणि दक्षिणेत इंग्रजांना आवर घालणारा टिपू सुल्तान हाच एकमेव योद्धा शिल्लक राहिलेला असताना इंग्रजी अधिकारी,लेखक, चित्रकार आणि व्यंगचित्रकार यांनी त्याच्याविषयी भीतीदायक वाटेल असे लेखन सातत्याने मोठ्याप्रमाणावर केले. या लेखनाद्वारे टिपूला मुस्लिम धर्माभिमानी आणि हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणारा, स्थानिक हिंदू आणि ख्रिस्ती लोकांचे सक्तीने धर्मांतर करणारा या भूमिकेत लोकांसमोर ठेवले.

देशात सद्यस्थितीत धार्मिक, सांप्रदायिक आणि वांशिक भेदनितीचा वापर करून सामाजिक ध्रुवीकरण करण्याची अहमहमिका जोरात सुरू आहे. मागील काही दशक आणि वर्षांपूर्वी ती उत्तरेत होती, आता दक्षिणेकडे वळली आहे. केरळातील शबरीमला मंदिराच्या निमित्ताने ती अधोरेखित करता येते. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात सत्ताबदलाचे नाट्य संपून दोन दिवस होत नाहीत तोच येडियुरप्पा सरकारने आगामी 10 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्यात टिपू सुल्तान यांची जयंती साजरी करु नये, असा फतवा तिथल्या साहित्य आणि सांस्कृतिक विभागाला बजावला आहे. टिपू सुल्तान क्रूर योद्धा होता आणि त्याने शेकडो हिंदूंची कत्तल केली होती असा सांप्रदायिक द्वेष पसरवणारा प्रचार टिपूबद्दल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर टिपू जयंतीचा वाद आणि नव्या फतव्याच्या अनुषंगाने त्याचे राजकीय वळण आणि महत्व समजून घेणे गरजेचे आहे. सांप्रदायिकतेच्या पलीकडे जावून या प्रकरणाकडे पाहिल्यास या वादाला असलेली सांप्रदायिक ध्रुवीकरणाची राजकीय किनार दिसल्या वाचून राहत नाही.

अझीम प्रेमजी विश्वविद्यालयात अध्यापन करत असलेल्या चंदन गौडा यांनी 2016 मध्ये ‘द हिंदू’ या दैंनिकात लिहिलेला लेख याबद्दल महत्वाचे संदर्भ आणि टिपूच्या गुणांना आपल्या समोर आणतो. त्यातील काही ठळक बाबी म्हणजे ‘2012 च्या अखेरीस आताचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वत:च्या कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी मुस्लिम मतपेढीचा लाभ घेण्यासाठी एका कार्यक्रमात टिपू सुल्तान यांच्या पराक्रमी योद्धा असण्याच्या वीरश्रीचा आणि तलवारबाजीचा गुणगौरव केला होता.’ त्यानंतर दोन वर्षांनी मातृपक्षात घरवापसी होताच आणि आता नव्याने पुन्हा सत्तेत येताच येड्डींनी टिपू सुल्तान जयंतीच्या विरोधात फतवा काढला. भारतीय समाजात सांप्रदायिकता हवी त्या वेळेस हव्या त्या पद्धतीने राजकीय शस्त्र म्हणून वापरली जाते हे यावरून लक्षात येते.  कर्नाटकातील म्हैसूर राज्याचा प्रमुख म्हणून सन 1750-1799  या कालावधीतील टिपू सुल्तानची कारकीर्द जागतिक किर्तीचा योद्धा म्हणून गणली जाते. युद्ध नीतीमध्ये टिपू सुल्तान सर्वांसाठी आयकॉन आहे. टिपू सुल्तानच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूच्या शोकगाथा स्थानिक लोककलांमधून 18 व्या शताकाच्या शेवटी आणि 19 व्या शतकातही अनेक वर्षे गायल्या जात होत्या. कर्नाटकात टिपू सुल्तानच्या मृत्यूवर ज्याप्रमाणे शोक गीते गायली गेली, तशी अन्य कुणाही राजाच्या मृत्यूनंतर गायल्या गेल्याचे दिसून येत नाहीत. ब्रिटिशांच्या हातून टिपू आणि त्याच्याबरोबर ज्या प्रमुख योद्ध्यांचा अंत झाला त्यांच्याच शोकगाथा गायल्या गेलेल्या आहेत. 19 आणि 20 व्या शतकातही टिपूच्या वीरगाथा सांगणारे हजारो कार्यक्रम राज्यभर झालेले आहेत. इतिहासाच्या अनेक क्रमिक पुस्तकांमधून आणि अमरचित्र कथांसारख्या लोकप्रिय साहित्यातूनही इंग्रजांसोबत लढणारा एक वीरयोद्धा आणि हुतात्मा म्हणून टिपू सुल्तानचा गौरव केलेला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 1970 च्या अखेरीस प्रकाशित ‘भारत भारती’ या मालेतील टिपू सुल्तानच्या जीवनावर लिहिलेल्या संक्षिप्त कन्नड आत्मचरित्रातही टिपूचा देशभक्त आणि वीरयोद्धा म्हणून  गौरवपूर्ण उल्लेख करताना कुठेही नकारात्मक टिपणी केलेली नाही.


टिपूच्या राज्यात त्याने अनेक हिंदू मंदिरांना देणग्या दिल्याच्या ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. त्याच्या कारकिर्दीत म्हैसूरच्या वडियार राजांच्या परंपरेतला दसरा उत्सव संपूर्ण दहा दिवस राज परिवार सदस्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत होता. जबरदस्तीचे धर्मांतर केल्याचा कुठलाही दस्तावेज म्हैसूर राज्याच्या दप्तरी कुठेही सापडत नाही. त्याच्या राज्यकारभार चालवण्याच्या शैलीत तो कुठेही धर्माभिमानी असल्याचे शोधूनही सापडत नाही.

अलिकडे मात्र राजकीय हेतू मनात ठेवून दक्षिणपंथी हिंदुत्ववाद्यांकडून टिपू सुल्तान कट्टर आणि धर्माभिमानी मुसलमान असल्याचे चित्र रंगवले व निर्माण केले जात आहे. त्यासाठी तत्कालीन म्हैसूर राज्याच्या दक्षिण सीमेलगत असलेल्या कुर्ग प्रांतातील कोडव समुदायाच्या लोकांची हत्या आणि मॅंगलोर परिसरातील कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मियांचे जबरदस्तीने मुस्लिम धर्मात केलेले धर्मांतर असे प्रमुख दोन आरोप केले जाताहेत. या प्रतिमा निर्मितीबाबत हॉवर्ड कम्युनिटी कॉलेजच्या मायकेल सोराकोय नावाच्या इतिहास संशोधकाने वेधलेले लक्ष महत्वपूर्ण आहे, त्याच्या मते, ‘आठराव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात इंग्रजांच्या समोर जे सामरिक आव्हान टिपू सुल्तानने उभे केलेले होते आणि दक्षिणेत इंग्रजांना आवर घालणारा टिपू सुल्तान हाच एकमेव योद्धा शिल्लक राहिलेला असताना इंग्रजी अधिकारी,लेखक, चित्रकार आणि व्यंगचित्रकार यांनी त्याच्याविषयी भीतीदायक वाटेल असे लेखन सातत्याने मोठ्याप्रमाणावर केले. या लेखनाद्वारे टिपूला मुस्लिम धर्माभिमानी आणि हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणारा, स्थानिक हिंदू आणि ख्रिस्ती लोकांचे सक्तीने धर्मांतर करणारा या भूमिकेत लोकांसमोर ठेवले. असे लेखन करण्यामागे म्हैसूर राज्याचा ताबा घेणे आणि आपले हीत साधने यात इंग्रजांचे स्वारस्य होते, ते साध्य झाले. त्यासाठी टिपूची प्रतिमा क्रुरकर्मा करण्यात आली’ असल्याचे सांगतानाच मायकेल आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधतात ते हे की, ‘भारतावर राज्य करण्याची ईस्ट इंडिया कंपनीची भ्रष्ट आणि अयोग्य प्रतिमा पुसून काढण्यात या नव्या लेखन प्रचारामुळे इंग्रजांना आपली प्रतिमा सुधारण्याला मदत मिळाली.’ 19 व्या शतकभर इंग्रजी साहित्यातून टिपूची क्रूर आणि कट्टर धर्माभिमानी अशी प्रतिमा सातत्याने तयार करण्यात आली. तीच प्रतिमा आजच्या दक्षिण पंथियांकडून उचलताना इंग्रजांच्या Devide and Rule ची री ओढली जात आहे.

चंदन गौडा आणखी एका अभ्यासकाचा संदर्भ देतात तो म्हणजे आशियाई इतिहासाच्या ऑस्ट्रेलियन अभ्यासक आणि इतिहासकार केट ब्रिटलबॅंक यांच्या इतिहास संशोधनाचा. ब्रिटलबॅंक यांनी दक्षिण भारताच्या 19 व्या व 20 व्या शतकातील इतिहासावर जगन्मान्य संशोधन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘टायगर-दि लाईफ ऑफ़ टिपू सुल्तान’ या पुस्तकाला वैश्विक मान्यता आहे. टिपूवर जे आक्षेप घेतले जात आहेत त्यावर त्या म्हणतात, ‘म्हैसूर राज्याच्या विस्तारात त्याच्या दक्षिणेला असलेल्या कुर्ग आणि मेंगलोर प्रांताला आपल्या राज्यात सामील करताना 1780 ते 1799 दरम्यान इंग्रजांविरुद्ध झालेल्या लहान मोठ्या सततच्या लढायांत स्थानिक लोकांकडून वारंवार इंग्रजांना मदत केली जात असताना राज्यविस्ताराच्या सामरिक नीतीचा भाग म्हणून या प्रांतात प्राबल्य असलेले कोडव आणि ख्रिस्ती लोक युद्धात मारले गेले.’  राज्य विस्तार आणि राज्य करणे हाच राजाचा धर्म असतो. त्याला धार्मिक बाबींशी देणेघेणे असत नाही हे सर्वसामान्यपणे सोयिस्कर विसरले जाते. हा आरोप लावताना हिंदूंच्या श्रेंगेरी मठावर मराठी हिंदूंनीच केलेले आक्रमण आणि मंदिराची लूट मात्र सोयिस्कररित्या विस्मरणात घालवली जाते. हे या सांप्रदायिक कलहाच्या परिप्रेक्षात ध्यानात घेणे आवश्यक आहे.


मराठा आणि निजाम यांना टिपूने लिहिलेली पत्रे असे दर्शवतात की, इंग्रज हे या भूभागातले नवे शत्रू आहेत आणि भविष्यकाळात इंग़्रजी राजवट या प्रदेशाला घातक ठरणार आहे. त्याचे हे राजकीय विचार आणि दूरगामी दृष्टी विचारात घेतल्यास टिपू सुल्तान पहिला स्वातंत्र्यसेनानी ठरतो.

टिपूच्या राजवटीतील प्रशासनाचे व्यवहार प्रामुख्याने तीन भाषांतून होत असत. त्यात पर्शियन, कन्नड आणि मराठी भाषेचा समावेश होता. त्याच्या दरबारातील सर्व महत्वाचे मंत्री ब्राह्मण या सवर्ण जातीचे होते. म्हैसूर राजदरबारात वडियार महाराणीला टिपूच्या विरोधात मदत करणारेही होते. टिपूच्या राज्यात त्याने अनेक हिंदू मंदिरांना देणग्या दिल्याच्या ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. त्याच्या कारकिर्दीत म्हैसूरच्या वडियार राजांच्या परंपरेतला दसरा उत्सव संपूर्ण दहा दिवस राज परिवार सदस्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत होता. जबरदस्तीचे धर्मांतर केल्याचा कुठलाही दस्तावेज म्हैसूर राज्याच्या दप्तरी कुठेही सापडत नाही. त्याच्या राज्यकारभार चालवण्याच्या शैलीत तो कुठेही धर्माभिमानी असल्याचे शोधूनही सापडत नाही. हे विचारात घेणे आवश्यक आहे.

मराठा आणि निजाम यांना टिपूने लिहिलेली पत्रे असे दर्शवतात की, इंग्रज हे या भूभागातले नवे शत्रू आहेत आणि भविष्यकाळात इंग़्रजी राजवट या प्रदेशाला घातक ठरणार आहे. त्याचे हे राजकीय विचार आणि दूरगामी दृष्टी विचारात घेतल्यास टिपू सुल्तान पहिला स्वातंत्र्यसेनानी ठरतो. युद्ध तंत्रज्ञानातील म्हैसूर राज्याची प्रगती, आधुनिकीकरण आणि तत्कालीन फ़्रेंचांनी त्याची घेतलेली दखल आजही कौतुकास्पद आहे. त्याच्या राज्यातील महसुली तंत्र, व्यवस्था आणि केंद्रिकृत नोकरशाही आजही अभ्यासकांत वाखाणली जाते. टिपूच्या वैयक्तिक ग्रंथालयात 2000 पेक्षा जास्त ग्रंथसंपदा होती. त्याच्या मृत्यूनंतर या ग्रंथांची रवानगी इंग्लंडच्या ऑक्स्फ़र्ड आणि केंब्रिज विद्यापीठात  व कोलकात्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजात तसेच रॉयल एशियाटिक सोसायटीत करण्यात आली. त्या ग्रंथांच्या विषयांवरुन त्यांच्या विविध विषयांतील अभ्यासू वृत्तीच्या समृद्ध जाणिवेचा परिचय होतो. राजकारणापायी सांप्रदायिक ध्रुवीकरण करण्यासाठी टिपू सुल्तानची धर्माभिमानी प्रतिमा तयार केली जात असताना या ऑस्ट्रेलियन इतिहासकार महिलेचा संशोधन मूल्य असलेला ‘टायगर-दि लाईफ ऑफ टिपू सुल्तान’ हा ग्रंथ आजच्या सांप्रदायिक कोलाहलाच्या वातावरणात टिपू सुल्तान भोवतीचा इतिहास समजून घेण्यासाठी जिज्ञासूंनी जरुर वाचावा असा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा