काँग्रेसची आजची अवस्था रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखीः शरद पवारांनी सुनावले खडे बोल

0
421
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो. तशीच काहीशी अवस्था आजच्या काँग्रेसची झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

मुंबई तकच्या वर्षपूर्तीनिमित्त राजदीप सरदेसाई आणि साहील जोशी यांनी शरद पवार यांची दीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाराष्ट्राबरोबरच देशातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. काँग्रेसच्या नेते मंडळीमध्ये अजून अहंकाराची भावना आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात शरद पवार म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे. तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरूस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांकडे उरलेली नाही. हजार एकरची जमीन आता १५-२० एकरवर आली आहे. सकाळी जमीनदार उठतो आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवे पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरवेगार पीक माझे होते, असे सांगतो. माझे होते, आता नाही, असे पवार म्हणाले.

आवश्य वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 याच प्रश्नाला धरून काँग्रेसची अवस्था ओसाड गावच्या पाटलासारखी झाली आहे का? असे विचारण्यात आले. त्यावर तितके काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. होती हे मान्य केले पाहिजे. मगच विरोधी पक्ष जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे पवार म्हणाले. काँग्रेसची दुरवस्था झाली आहे, हे खरे असले तरी त्या पक्षाला आजही देशात स्थान आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ होते. त्यामुळेच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ ४० जागा आहेत, असेही पवार म्हणाले.

प्रशांत किशोरची मला गरज नाहीः राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर मला प्रशांत किशोर यांची मदत घेण्याची कोणतीच गरज नाही. सध्या मला सत्ते बसण्याचीही कुठली महत्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचे राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे शरद पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा