चक दे इंडियाः ग्रेट ब्रिटनचा धुव्वा उडवत भारतीय पुरूष हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत!

0
60
छायाचित्रः ट्विटर

टोकियोः भारताच्या पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज रविवारी  इतिहास रचला. तब्बल चार दशकांनंतर भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताने ग्रेट ब्रिटनवर ३-१ असा शानदार विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत भारताची लढत बेल्जियमविरुद्ध होणार आहे. ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत भारताने तब्बल ४१ वर्षांनंतर प्रवेश मिळवण्यात यश मिळवले आहे.

 उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळताना भारतीय पुरूष हॉकी संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत खेळावर संपूर्ण वर्चस्व ठेवले. भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ केला. पहिल्या हाफमध्ये २-० शी आघाडी होती. भारताकडून दिलप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर गुरजतसिंगने १६ व्या मिनिटाला गोल करून संघाला २-०१ अशी आघाडी मिळवून दिली.

 दुसऱ्या हाफमध्ये ग्रेट ब्रिटनने पहिला गोल करून २-१ अशी भारताची आघाडी कमी केली. परंतु ५७ व्या मिनिटाला हार्दिकने फिल्ड गोल करून संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली आणि भारतीय संघाचा विजय निश्चित केला.

आता उपांत्य फेरीत भारताची लढत बेल्जियमशी होणार आहे. उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, जर्मनी, भारत आणि बेल्जियम हे चारच संघ पात्र ठरले आहेत. भारताचा उपांत्य फेरीतील बेल्जियमविरुद्धचा सामना ३ ऑगस्ट रोजी होईल.

१९८४ नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरीतः १९८० मध्ये मॉस्को येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाने वासुदेवन भास्करनच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर भारतीय हॉकी संघाची कामगिरी उतरणीलाच लागली होती. १९८४ च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताला पाचवा क्रमांक मिळाला होता. १९८४ पासून भारत कधीच उपांत्य फेरीत पोहोचू शकला नव्हता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा