टूलकिट प्रकरणः शंतनू मुळूकला ९ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण

0
47
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट शेअर केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या बीडच्या शंतनू मुळूकला दिल्लीतील एका न्यायालयाने आज ९ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.

शंतनू मुळूकच्या अटकपूर्व जामिनावर सविस्तर उत्तर दाखल करण्यासाठी त्याची चौकशी करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला. हा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी शंतनूला हा दिलासा दिला.

शंतनू मुळूकवर ९ मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश न्या. राणा यांनी दिल्ली पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ मार्च रोजी होणार आहे. शंतनू मुळूकविरुद्ध बेंगळुरूची पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवि आणि मुंबईच्या वकील व सामाजिक कार्यकर्त्या निकीता जेकब यांच्यासह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही टूलकिट वापरूनच नोबेल पुरस्कार विजेती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिशा रविला अटक केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा