‘भाजपचा प्रचारक’ दीप सिद्धूनेच फडकवायला लावला लाल किल्ल्यावर झेंडा, हिंसेलाही चिथावणी

0
1422
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर निशाण साहिब फडकवल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांना ‘दहशतवादी’ आणि खलिस्तानी ठरवले जात आहे. मात्र लाल किल्ल्यावर हा झेंडा फडकवायला लावणारा पंजाबी अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्धू हा भाजपशी संबंधित असून लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये भाजप बळकट करण्यासाठी त्याने धडाकेबाज प्रचारही केला आहे. विशेष म्हणजे गुरदासपूरचे खासदार अभिनेता सन्नी देओल यांचा तो इलेक्शन एजंटही होता.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान मंगळवारी दुपारी प्रजासत्ताक दिनी ‘राज करेगा खालसा’च्या घोषणांच्या गजरात अभिनेता ते कार्यकर्ता असा प्रवास करणाऱ्या दीप सिद्धूने लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फडकवण्यासाठी एका व्यक्तीच्या हातात ‘केसरी’ झेंडा दिला आणि त्या व्यक्तीने तो झेंडा तटबंदीवर फडकवला. मंगळवारी अतिरेकी घटकांनी ट्रॅक्टर परेड कशी हायजॅक केली आणि या अराजकात दीप सिद्धूची कशी भूमिका होती, याचा गौप्यस्फोट ‘द ट्रिब्यून’ने केला आहे.

दीप सिद्धूला तीन कृषी कायद्या विरोधातील आंदोलनापासून दूर ठेवण्याचा शेतकरी संघटनांनी वारंवार प्रयत्न केला, तरीही दीप सिद्धूने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनातून बाजूला फेकला गेलेला दीप सिद्धू नियोजित ट्रॅक्टर परेडच्या एक दिवस आगोदर अचानक या आंदोलनात उगवला. दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवरच ट्रॅक्टर परेड काढण्याचा आग्रह धरत त्यासाठी त्याने जोरदार मोर्चेबांधणीही केली.

हेही वाचाः दिल्लीत ‘रण’तंत्र दिनः बॅरिकेड्स तोडून शेतकरी लाल किल्ल्यात घुसले, अनेक भागांत इंटरनेट बंद

आऊटर रिंग रोडवरच ट्रॅक्टर परेड काढण्याची शेतकरी आंदोलकांची मूळ योजना होती. परंतु संयुक्त किसान मोर्चा आणि पोलिसांशी झालेल्या चर्चेदरम्यान ही योजना बदलण्यात आली होती. मात्र दीप सिद्धूच्या मोर्चेबांधणीमुळे किसान मजदूर संघर्ष समितीने आऊटर रिंग रोडवरच ट्रॅक्टर परेड काढू, अशी भूमिका घेतली. ३२ शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाचा भाग असलेल्या भारतीय किसान युनियनने (क्रांतीकारी) ट्रॅक्टर परेडसाठी सहमतीने ठरवलेल्या नव्या मार्गाचे पालन न करण्याची संधी दीप सिद्धूला दिली.

सोमवारी सायंकाळी दीप सिद्धूने माजी गँगस्टर आणि विद्यमान सामाजिक कार्यकर्ता लाखा सिधाना याच्या सोबत सिंघू सीमेवरील आंदोलनाच्या मुख्य मंचाचा ताबा घेतला आणि आम्ही दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेड काढणार आहोत, अशी घोषणा त्याने केली.

 संयुक्त किसान मोर्चा आणि दिल्ली पोलिसांनी परस्पर ठरवलेल्या मार्गांऐवजी ट्रॅक्टर परेड कशी काढायची याची योजना मंगळवारी सकाळीच त्यांच्याकडे तयार होती. शेतकरी संघटनांच्या अधिकृत ट्रॅक्टर परेड आधीच त्यांनी ट्रॅक्टर परेडला सुरूवात केली. मध्य दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचे ‘गुंड’ मोठ्या संख्येने तैनात केलेले होते. तेथून त्यांनी अन्य ट्रॅक्टर्सनाही लाल किल्ल्याच्या दिशेने वळवले. एकवेळा शेतकरी संघटनांच्या स्वयंसेवकांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला, मात्र दीप सिद्धू आणि लाखा सिधाना गटाने त्यांची डाळ शिजू दिली नाही.

ही आकस्मिकता शेतकरी संघटनांच्या फारपूर्वीच लक्षात आलेली होती. सुमारे महिनाभरापूर्वी ३२ शेतकरी संघटनांच्या बैठकीत एका शेतकरी नेत्याने दीप सिद्धू आणि लाखा सिधाना यांना या शेतकरी  आंदोलनाचे शत्रू संबोधले होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला जातीय वळण देण्याचा हे दोघे जण आंदोलन सुरू झाल्यापासूनच प्रयत्न करत होते आणि याचीच चिंता ३२ शेतकरी संघटनांना सतावत होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत दीप सिद्धूचे छायाचित्र. ( छायाचित्र सौजन्यः twitter/@GauravPandhi)

दीप सिद्धूने या आंदोलनाला ‘शंभू मोर्चा’ संबोधले होते आणि काही खलिस्तान समर्थक चॅनेल्सवर लाइव्ह स्ट्रिमिंगचे पाठबळ मिळायला सुरूवात झाली होती. दीप सिद्धू शेतकरी संघटनांच्या डाव्या नेतृत्वावर वारंवार टीका करत होता. तो यहुदीचे उदाहरण द्यायचा आणि लोकांना ‘शीख जन्मभूमीसाठी’ लढण्यासाठी प्रेरित करायचा.

 ‘ उजव्या हिंदूं’चे समर्थन करणारा दीप सिद्धू अचानक ‘ उजव्या शीख गटा’चा पाठीराखा कसा बनला, असे सवाल आता उपस्थित केले जात आहे. त्याचे त्याने स्वतःच स्पष्टीकरणही दिले आहे. नक्षलवाद सोडून खलिस्तान समर्थक बनलेल्या अजमेरसिंगाने शीखांच्या इतिहासावर लिहिले पुस्तक वाचून आपला दृष्टिकोन बदलला, असे दीप सिद्धू सांगतो. दीप सिद्धू हा अजमेर सिंगचा ‘आघाडीचा चेहरा’  असल्याचा आरोप शेतकरी संघटना उघडपणे करतात.

शेतकरी संघटनांनी दीप सिद्धूला या आंदोलनात तिळमात्र स्थान दिले नाही, २६-२७ नोव्हेंबरनंतर शेतकरी जेव्हा दिल्लीच्या नजीक येऊन धडकले तेव्हा दीप सिद्धूने ‘कम्युनिस्ट’ तुमच्या मुलांचा तोफेच्या दारूगोळ्यासारखा वापर करून घेऊ इच्छित आहेत, त्यामुळे परत जा, असे दीप सिद्धूने एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत सांगितले होते. मात्र त्यानंतर लगेचच त्याने आपले हे विधान मागे घेतले.

हेही वाचाः पंजाबला पुन्हा अस्वस्थतेकडे नेण्याचे पातक करू नकाः शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दोन आठवड्यांपूर्वी दीप सिद्धूने शेतकरी संघटनांना संघटनांना एक पत्र लिहिले होते आणि तुमच्या आंदोलनाचा एक भाग होण्याची इच्छा असल्याचे त्यात नमूद केले होते. मात्र त्याची ही विनंती शेतकरी संघटनांनी धुडकावून लावली होती.

हेही वाचाः ट्रॅक्टर परेड हिंसाचारः ८३ पोलिस जखमी, दिल्लीत निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात

लाल किल्ल्यावर झेंडा फडकवल्यानंतर दीप सिद्धूने त्याच्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आम्हाला लोकशाहीने दिलेल्या आंदोलनाचा अधिकार वापरून आम्ही लाल किल्ल्यावर निशाण साहिब आणि किसान मजदूर एकता संघटनेचा झेंडा फडकावला आहे, तिरंगा झेंडा काढलेला नाही, असे सिद्धूने या व्हिडीओत म्हटले आहे. अशा प्रकारच्या आंदोलनात लोकांचा संताप आणि चीड अनावर होते, त्यामुळे आंदोलकांना चिथावणी दिली म्हणून तुम्ही कोण्या एका व्यक्तीला जबाबदार धरू शकत नाही, असेही त्याने या व्हिडीओत म्हटले आहे. दिल्लीत आंदोलक कोणालाही इजा करण्यासाठी किंवा सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी गेले नव्हते. त्यामुळे त्यांना कट्टरतावादी किंवा जातीयवादी ठरवले जाऊ नये, असेही सिद्धू म्हणतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत दीप सिद्धूचे छायाचित्र. ( छायाचित्र सौजन्यः twitter/@pbhushan1

प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री शाह यांच्यासोबत छायाचित्रेः दीप सिद्धूने काही पंजाबी चित्रपटात काम केलेले आहे. गेल्यावर्षी त्याने शेतकरी संघटनेच्या नेतृत्वार प्रश्न चिन्ह उपस्थित करत शंभूमध्ये तो स्वतःचा मोर्चा काढणार असल्याची घोषणा करून त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

-२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दीप सिद्धूने पंजाबमध्ये भाजप बळकट करण्यासाठी प्रचार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत त्याचे छायाचित्र आहे. दीप सिद्धू हा याच निवडणुकीत गुरदासपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार सन्नी देओल यांचा इलेक्शन एजंटही होता. दीप सिद्धू हा ‘आरएसएस’चा एजंट असल्याचा आरोप पंजाबमधील शेतकरी संघटना करतात.

दीप सिद्धूने केंद्राचा हेतू साध्य केला
केंद्र सरकार प्रारंभापासूनच शेतकरी आंदोलनाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. धार्मिक खेळात ते मास्टर आहेत. शेतकऱ्यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात मात्र त्यांना पहिल्यांदाच त्यात यश येत नव्हते. दीप सिद्धूने त्यांचा हेतू साध्य करून दिला.’
राजिंदर सिंग दीपसिंग वाला, उपाध्यक्ष, किर्ती शेतकरी संघटना

पोलिसांना आधीच कळवूनही कारवाई नाही
‘दीप सिद्धू भाजपशी संबंधित आहे. दीप सिद्धू आणि लाखा सिधाना या दोघांनीच शेतकऱ्यांना चिथावणी दिली. सोमवारी रात्रीही हे दोघेजण शेतकऱ्यांना चिथावणी देण्याचाच प्रयत्न करत होते. त्याबाबत आम्ही पोलिसांना कळवलेही होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या घटनाक्रमात तो सहभागी असल्याची स्पष्ट छायाचित्रे आहेत. तरीही त्याला अटक झालेली नाही. लाल किल्ल्यावर जी घटना घडली, ते षडयंत्र होते असेच वाटते.’
योगेंद्र यादव, स्वराज इंडियाचे अध्यक्ष

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा