ट्रॅक्टर परेड हिंसाचारः लाल किल्ल्यावरील हल्ला प्रकरणी गुन्हेगारी कटासह दरोड्याचा गुन्हा दाखल

0
97
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान ऐतिहासिक लाल किल्ल्यात घुसून घडवून आणण्यात आलेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात विविध दहा कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत २२ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचाराबाबत आज सायंकाळपर्यंत केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर केला जाणार आहे.

तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ६३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड काढली. संयुक्त किसान मोर्चा आणि दिल्ली पोलिसांनी परस्पर सहमतीने ठरवलेला ट्रॅक्टर परेडचा मार्ग सोडून शेतकऱ्यांचे काही गट दिल्लीत घुसले. त्यापैकी एका गटाने लाल किल्ल्यात घुसून तोडफोड केली आणि तटबंदीवर झेंडाही फडकावला.

हेही वाचाः ‘भाजपचा प्रचारक’ दीप सिद्धूनेच फडकवायला लावला लाल किल्ल्यावर झेंडा, हिंसेलाही चिथावणी

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हेगारी कटासह दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. विविध १० कलमान्वये नोंदवण्यात आलेल्या या एफआयआरमध्ये भादंविचे कलम ३९५, ३९७, १२० ब अशा गंभीर स्वरुपाच्या कलमांचाही समावेश आहे. कट रचून लाल किल्ल्यावर दरोडा टाकण्यात आला आणि तेथील सामान नेण्यात आले, असे या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी आज सायंकाळपर्यंत केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला जाणार आहे.  लाल किल्ला सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अहवालाच्या आधारावर पोलिसांकडून आणखीही गुन्हे नोंदवले जाऊ शकतात. अधिकाऱ्यांची पाच पथके अहवाल तयार करत आहेत. सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी लाल किल्ल्याचा दौरा करून पाहणीही केली आहे.

आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरूः ट्रॅक्टर परेडदरम्यान पोलिसांवर हल्ले झाले, लाल किल्ल्याच्या तटबंदीवर झेंडा फडकवण्यात आला. सरकारी संपत्तीची तोडफोड करण्यात आली आणि हिंसाचार घडवण्यात आला. या सर्व घटनांतील आरोपींची ओखळ पटवण्याचे काम  दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. मोबाइल क्लिप, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे. ट्रॅक्टर परेडचा नियोजित मार्ग सोडून मध्य दिल्लीकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना चिथावणी देणाऱ्या शेतकरी नेत्यांचीही ओखळ पटवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा