लाल किल्ला हिंसाचारः मुख्य आरोपी दीप सिद्धू गजाआड, १४ दिवसांपासून देत होता गुंगारा

0
72
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर घडवून आणलेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी आणि पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या १४ दिवसांपासून तो फरार होता. त्याच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी बक्षीसही जाहीर केले होते.

२६ जानेवारी रोजी दिल्लीत काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान दिल्लीत हिंसाचार झाला होता. लाल किल्ल्यात घुसून किल्ल्याच्या तटबंदीवर निशाण साहिब आणि शेतकरी संघटनेचा झेंडा फडकवण्यात आला होता. या सर्व प्रकरणात दीप सिद्धूचा पुढाकार असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून दीप सिद्धू फरार होता.

दीप सिद्धू फरार असला तरी तो फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून आपले म्हणणे मांडत होता. दीप सिद्धूची अटक दिल्ली पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतची त्याची छायाचित्रेही पुढे आली होती. ही छायाचित्रे पुढे आल्यामुळे दीप सिद्धूला ‘राजाश्रय’ मिळाला, त्यामुळेच तो शेकडो लोकांना घेऊन दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत पोहोचू शकला, असे बोलले जात होते.

दीप सिद्धूच्या अटकेमुळे लाल किल्ल्यावर निशाण साहिब फडकवणे आणि ट्रॅक्टर रॅलीदरम्यान घडवलेल्या हिंसाचारामागे कोणाचा हात होता, हे उघड होण्याची आशा आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज दीप सिद्धूला अटक केली. आता दिल्ली पोलिस हिंसाचाराशी संबंधित अनेक प्रश्न विचारून सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करतील.

दीप सिद्धू हा पंजाबी अभिनेता आहे. मागील लोकसभा निवडणुकीत त्याने पंजाबमध्ये भाजपचा प्रचार केला होता. भाजप खासदार सनी देओल यांचा तो निवडणूक एजंटही होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धू आणि अन्य तीन आरोपींच्या अटकेसाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. लाल किल्ल्यावर निशाण साहिब फडकवणारा जुगराजसिंग, गुरजोतसिंग आणि गुरजंटसिंग हे ते अन्य तीन आरोपी आहेत.

या आरोपींच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांकडून दिल्ली आणि पंजाबमध्ये छापेमारी सुरू आहे. आंदोलकांना भडकवण्याचा आरोप असलेले बुटासिंग, सुखदेवसिंग, जजबीरसिंग आणि इक्बालसिंग यांचाही पोलिस शोध घेत असून त्यांच्या अटकेसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

दिल्ली आणि लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचारानंतर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात टिकेचा सूर उमटला होता. मात्र लाल किल्ल्यातील हिंसाचाराला दीप सिद्धूच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. २५ जानेवारीच्या रात्रीच काही लोकांनी सिंघू सीमेवरील आंदोलकांचा मंच कब्जात घेऊन शेतकऱ्यांना भडकवले होते. दीप सिद्धूनेच शेतकऱ्यांच्या एका गटाचे नेतृत्व केले आणि तोच शेतकऱ्यांना लाल किल्ल्यापर्यंत घेऊन गेला. लाल किल्ल्याकडे जाण्याची शेतकऱ्यांची अजिबात इच्छा नव्हती, असे संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा