हिमायतनगरमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची खुली लूट, कच्चा पावतीवर व्यवहार; कृउबाची डोळेझाक

0
372

हिमायतनगर: शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडून शोषण होणार नाही आणि ते खपवूनही घेतले जाणार नाही, अशा गप्पा सरकारी पातळीवर मारण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच पहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची मनमानेल त्या भावात खरेदी केली जात आहे. खरेदीचे हे सगळे व्यवहार कच्चा पावतीवरच केले जात आहेत आणि या सर्व व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेली हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समिती या सगळ्याकडे डोळेझाक करत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यंदा हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक घेतले आहे. पिकाच्या वाढीसाठी पोषक पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक जोमात आले आहे. परंतु सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीनचे पीक काढणीला आले असताना चार-पाच धो-धो पावसाने झोडपल्यामुळे सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

पावसाच्या या तडाख्यातून ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन थोडेबहुत बचावले, त्यांनी पावसाची उघडीप मिळताच सोयाबीन पिकाची काढणी करून ते बाजारात विक्रीसाठी आणण्यास सुरूवात केली आहे. बाजारात व्यापाऱ्यांकडे गेल्यावर मात्र शेतकऱ्यांना अक्षरश: लुटले जात आहे.

मॉईश्चर व्यापारीच ठरवणार,कटही मारणार: शेतातून काढलेल्या सोयाबीनमध्ये मॉईश्चरचे प्रमाण किती? हे तपासून पाहण्याची कुठलीही यंत्रणा शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे शेतकरी बाजारपेठेत जेव्हा सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येतो, तेव्हा त्यातील मॉईश्चरचे प्रमाण व्यापारीच ठरवतो. व्यापाऱ्यांकडे असलेले मॉईश्चर तपासणी यंत्र प्रमाणित आहे की नाही, हे तपासून पाहण्याची तसदीही हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेली नाही. त्यामुळे काही व्यापारी तर सोयाबीनमध्ये मॉईश्चरचे प्रमाण जास्त असल्याच्या नावाखाली एक क्विंटल सोयाबीन खरेदी केली तर शेतकऱ्यांच्या हातावर ६० किलो सोयाबीनचेच पैसे टिकवत आहेत.

मनमानी भाव: सोयाबीनच्या भावाच्या बाबतीतही व्यापारी मनमानी करत आहे.  काही व्यापारी भाव पाडून  ३८०० रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी करत आहेत. तर काही व्यापारी ६५०० रुपये क्विंटलचा भाव सांगून मॉईश्चरचे प्रमाण जास्त असल्याचे सांगून कटी मारून शेतकऱ्यांना लुटत आहेत. म्हणजे भाव ६५०० रुपये प्रतिक्विंटल सांगितला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती ३८०० ते ३९०० रुपयेच भाव पडत आहे. विशेष म्हणजे दहा-बारा दिवसांपूर्वी सोयाबीनला ९५०० रुपये क्विंटल भाव होता.

कच्चा पावतीवर सगळे व्यवहार: शेतकऱ्यांकडून शेतमालाच्या खरेदीचे सगळेच व्यवहार कच्चा पावतीवर केले जात आहेत. एकही व्यापारी शेतकऱ्यांना पक्की पावती देत नाही. त्यामुळे शेतमालाच्या खरेदीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडून लक्षावधी रुपयांचा महसूल बुडवण्यात येत असून कृषी उत्पन्न बाजार समिती त्याकडेही दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी अस्तित्वात आलेली कृषी उत्पन्न बाजार समिती नेमके कुणाचे हित जोपासत आहे? असा सवाल विचारला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा