राज्यात १४ ऑगस्टपर्यंत १५ टक्के बदल्यांना परवानगी, १५ ऑगस्टनंतर बंदी!

0
205
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यात कोरोनाची दुसरी लाट कायम असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोकाही घोंगावत असल्यामुळे राज्य सरकारने गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के मर्यादेत राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना परवानगी दिली आहे.

१४ ऑगस्ट २०२१ पर्यंत एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के बदल्या करण्यात येतील. १५ टक्के मर्यादेत सर्वसाधारण बदल्या करताना पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी ज्यांचा संबंधित पदांवर जास्त कालावधी पूर्ण झाला आहे, अशा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना प्राधान्य देण्यात यावे. त्यानंतर कोणत्याही बदल्यांना परवानगी देण्यात येणार नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या निर्णयात म्हटले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

 कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे घालण्यात आलेले निर्बंध यामुळे राज्याच्या तिजोरीवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित स्वरूपात करण्याच्या दृष्टीने सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदाच्या १५ टक्के एवढ्याच मर्यादेत बदली अधिनियमाच्या कलम ६ मध्ये नमूद केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करण्यात याव्यात, असेही सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर जी पदे रिक्त राहतील, त्याच पदांवर विशेष कारणास्तव १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत विनंती बदल्या करण्यात याव्यात, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या या निर्णयामुळे आता बदल्यांसाठी वजन वापरणे पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा