त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकरांच्या ‘दक्ष’तेमुळे ‘परिवार’ अस्वस्थ!

2
1477

औरंगाबादः त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर यांच्या लाचखोरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यांची वैचारिक जडणघडण झालेला संघ परिवार अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी सारवासारव करण्याचे जोरकस प्रयत्न होत असून डॉ. धारूरकरांना बदनाम करण्याचा त्रिपुरातील डाव्यांचा हा कट आहे, अशी प्रचारकी मोहीम राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे डॉ. धारूरकर हे संघाचे तृतीय वर्ष शिक्षित असून त्यांनी दोन वर्ष पूर्णवेळ प्रचारक म्हणून कामही केले आहे.

डॉ. धारूरकर यांच्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे भ्रष्टाचाराच्या असंख्य तक्रारी आल्यानंतर मंत्रालयाचे अवर सचिव उमेश कुमार यांनी 21 एप्रिल 2019 रोजीच त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र लिहून या तक्रारींबाबतचा चौकशी अहवाल मागवला होता. त्यातच एका प्रिंटिंग फर्मच्या प्रतिनिधीकडून लाचेची रक्कम स्वीकारताना डॉ. धारूरकर हे व्हॅनगार्ड वृत्तवाहिनीने केलेल्या ‘ऑपरेशन व्हाइट कॉलर’ या स्टिंग ऑपरेशनमध्ये रंगेहात अडकले. हा व्हिडीओ महाराष्ट्रात व्हायरल झाल्यानंतर त्याची प्रचंड चर्चा होऊ लागल्यानंतर हा कुलगुरू डॉ. धारूरकर यांना बदनाम करण्याचा त्रिपुरातील डाव्यांचा कट आहे, अशी प्रचारकी मोहीमही ‘परिवारा’कडून राबवण्यात आली. त्याचा काही उपयोग होत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्रिपुरा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवाच्या स्वाक्षरीनिशी एक खुलासा फिरवण्यात आला.

सारवासारव करण्यासाठी जारी करण्यात आलेला हा खुलासाच संशयास्पद आहे. देशातील कोणत्याही विद्यापीठाचे अधिकारी एखाद्या प्रकरणावर विद्यापीठाची अधिकृत भूमिका मांडताना विद्यापीठाच्या लेटरहेडचा वापर करतात, पण या खुलाश्यासाठी लेटरहेडचा वापर करण्यात आलेला नसून तो साध्या कागदावर तर आहेच, शिवाय त्याच्यावर विद्यापीठाचा स्टॅम्पही नाही. विद्यापीठ प्रशासनाने व्हायरल झालेले व्हिडीओ फुटेज पाहिले असून त्याची सत्यता नाकारते. हा व्हिडीओ फेरफार, छेडछाड केलेला आणि बनावट असल्याचे या खुलाशात म्हटले आहे. डॉ. धारूरकरांशी औरंगाबादेतील काही पत्रकारांनी संपर्क केला असता काही अनिष्ट प्रवृत्ती मला गोवण्याचा प्रयत्न करत आहेत, कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

परिवाराकडून फिरवण्यात येत असलेला हाच तो खुलासा.

धारूरकरांना 48 तासांत अटक न केल्यास राज्यव्यापी आंदोलन

देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता धारूरकांविरुद्ध रान पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. धारूरकरांच्या कृतीने त्रिपुरा विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली असून त्यांना 48 तासांच्या आत अटक न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा एनएसयूआयचे त्रिपुरा प्रदेशाध्यक्ष राकेश दास यांनी दिला आहे. यापूर्वी डॉ. धारूरकरांनी त्रिपुरा विद्यापीठ परिसरात अभाविप या उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेचा झेंडा फडकवल्याने वाद निर्माण झाला होता.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा