अपडेटः अमरावती शहरात संचारबंदी लागू, इंटरनेट सेवा बंद

0
603

अमरावतीः त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला लागलेले हिंसक वळण आणि त्या मोर्चाच्या निषेधार्थ भाजपने पुकारलेल्या बंदलाही हिंसक वळण लागून निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावतीत कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरण्याची भीती असल्यामुळे मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

भाजपने पुकारलेल्या अमरावती बंद दरम्यान राजकमल चौकात मोठ्या प्रमाणात जमाव जमला. या जमावाने दगडफेक आणि तोडफोड करत हिंसाचार सुरू केला. या हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी राजकमल चौकात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचा माराही करण्यात आला. भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी राजकमल चौकात जमाव जमवून पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केली.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

भाजपने पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजपच्या बंदमुळे शहरात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद दरम्यान जमावाने अनेक दुकाने आणि गाड्यांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकही झाली.

हेही वाचाः अमरावती बंदला हिंसक वळणः जमावाकडून काही ठिकाणी दगडफेक-जाळपोळ, पोलिसांचा लाठीचार्ज

अमरावतीचे प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी अमरावती शहरात दुपारी दोन वाजेपासून संचारबंदी म्हणजेच कलम १४४ लागू केले आहे. राजकमल चौक ते जयस्तंभ चौक परिसराला सध्या पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून परिस्थिती आणखी चिघळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरावती शहरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मोबाईल इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणणे शक्य होईल, असा पोलिसांचा विश्वास आहे.

शांतता व संयम पाळा-ठाकूरः दरम्यान, परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोक्षक वक्तव्ये किंवा सोशल मीडियावर पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे. या जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक- सामजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊया, असे आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. माझी सर्व अमरावतीकरांना विनंती आहे, त्यांनी शांतता आणि संयम पाळावा. माध्यमांनीही दूरचित्रवाणीवर अप्रिय घटनांची दृश्ये दाखवताना त्यावर वेळ नमूद करावी. जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा