अमरावती बंदला हिंसक वळणः जमावाकडून काही ठिकाणी दगडफेक-जाळपोळ, पोलिसांचा लाठीचार्ज

0
388
संग्रहित छायाचित्र.

अमरावतीः गेल्या महिन्यात त्रिपुरामध्ये उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावतीत काढलेल्या मोर्चादरम्यान काही दुकानांची तोडफोड झाल्याच्या निषेधार्थ आज, शनिवारी भाजपने पुकारलेल्या अमरावती बंदला हिंसक वळण लागले. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यसाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. अमरावतीत सध्या पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अमरावतीत काल झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपने अमरावती बंद पुकारला. अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी सुरू केली.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

बंद दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या जमावाकडून काही ठिकाणी तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली. अनेक ठिकाणी गाड्या आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. राजकमल चौकात मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्यामुळे बंदला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. या हिंसक जमावाला पांगवण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

हेही वाचाः अमरावती शहरात संचारबंदी लागू, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल

सध्या शहरात भीती आणि तणावाचे वातावरण असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे जोरकस प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. नागपूरचे डीआयजी संदीप पाटील हे स्वतः रस्त्यावर उतरून जमावाला आवरण्याचे प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल-वळसे पाटीलः भाजपचा मोर्चा शांततेत होईल, अशी अपेक्षा होती, मात्र त्याला वेगळे वळण लागलेले आहे. पोलिस आवश्यक पावले टाकत आहेत. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी बोलत आहेत. राज्य महत्वाचे आहे. सर्वांनी सहकारी करावे, अशी विनंती केली आहे. समाज माध्यमातून कोणी चिथावणी देत असेल तर त्याच्या कारवाई केली जाईल. अमरावतीतील परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचे कारस्थान-मलिकः महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचे काहींचे कारस्थान आहे, त्याला बळी पडू नका. शांतता पाळा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. माथी भडकवणारांचे ऐकू नका. आपल्या राज्यात शांतता कायम कशी राहील यावर भर द्यावा, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. हिंसक आंदोलनाला जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मलिक म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा