सिस्टीम फेल करणारे व्हायरस आहेत हे टीव्ही अँकर्स!

0
180
प्रातिनिधिक छायाचित्र.

२०१४ नंतर हॅकर्सनी H सिरीजच्या सर्वात शक्तीशाली HM व्हायरसचा हल्ला केला. हा व्हायरस एवढा घातक होता की तो मालक, संपादक, अँकर, रिपोर्टर्स आणि तमाम पत्रकारांच्या मेंदूत घुसून विनाश घडवू लागला आणि त्यांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही. या व्हायरसने त्यांचा मेंदूच हॅक करून टाकला आणि ते जे हॅकर्स सांगतील, तेच करत राहिले!

  • मुकेश कुमार

सिस्टीम फेल झाली आहे, अशी घोषणा टीव्ही चॅनल्स आणि त्यांच्या अँकर्सनी करून टाकली आहे. तसेही टीव्ही चॅनल्सचा अँकर्सना कुणीही फारसे गांभीर्याने घेत नाही आणि घेतलेही जाऊ नये, कारण ते बातमीच्या बाबतीत कधीही फारसे गंभीर नसतात! परंतु ते सिस्टीममध्ये घुसलेले आहेत आणि सिस्टीमचा एक भाग आहेत, त्यामुळे त्यांच्या घोषणेला महत्व तर आहेच. त्यामुळे त्यांच्या घोषणेला गांभीर्याने घ्यावे, ही विनंती.

बोलघेवड्या अँकर्सनी सिस्टीम फेल झाल्याचे जे सांगितले आहे, त्यात नवीन काय? असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. सिस्टीम फेल झाली आहे, हे देशाला खूप आधीच माहीत झालेले होते. मीडियाचे चालचारित्र्य, त्यांचा व्यवहार, प्राइम टाइममध्ये होणाऱ्या चर्चा आणि बातम्या पाहून मीडियाच्या प्रेक्षकांना सिस्टीम कामातून गेल्याची जाणीव कधीच झाली होती. अँकर्स आणि रिपोर्ट्सचे हावभाव, रंगढंग, दबाव-प्रभावामुळे ही सिस्टीम आता काम करेनाशी झाली आहे, ही सिस्टीम हॅक करून टाकण्यात आली आहे, हे प्रेक्षकांनी कधीचेच हेरले होते.

उगीच कुणी लाळघोटेपणा करत नाहीः प्रश्न विचारणे हे जिज्ञासूपणाचे लक्षण आहे. त्यामुळे टीव्ही चॅनल्सच्या अँकर्सनी हॅकिंगच्या बाबतीत काहीच का सांगितले नाही, हॅकर्सचा उल्लेख का केला नाही, असे प्रश्न तुम्ही जरूर विचाराल. उगीच कुणी लाळघोटेपणा करत नाही आणि नमकहरामही  बनत नाही, हे तुम्हाला माहीत आहेच. त्यांची काही मजबुरी असेलही. त्यांच्या मालक-संपादकांची शेपूट कुठे तरी दबलेली असेल किंवा कुणाच्या तरी दरबारात त्यांचा अर्ज अडकलेला असेल. विचारल्यानंतरही सिस्टीम हॅक झालेली आहे, हे ते मान्य करणार नाहीत. लोक सिस्टीममध्येच अडकून पडलेले राहतील आणि हॅकर्सचा त्यांना विसर पडावा म्हणून ते सिस्टीम सिस्टीम करत राहतील.

परंतु लोक एवढे नादान नाहीत. सिस्टीम कशी हॅक केली जात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॅकर्स कसे कसे व्हायरस पाठवू लागले आहेत आणि सिस्टीमवर त्याचा काय परिणाम होत आहे, हे ते वर्षानुवर्षे पहात आलेले आहेत. जे धर्म, क्रिकेट या अन्य कोणत्या तरी अफूच्या नशेत त्यांना सोडून द्या. परंतु जागरूक लोक हे पहातही होते आणि वाचवा, वाचवा अशी आर्त हाक देतही होते.

 हा C-1 कॅपिटलचा व्हायरस होता, ज्यात कॅपिटल म्हणजेच भांडवलवाद सिस्टीमला आपल्या हिशेबाने चालवत होता. त्याचबरोबर C-2 व्हायरसही आला. तो करप्शन म्हणजेच भ्रष्टाचाराचा होता. C-3  व्हायरस कास्ट म्हणजेच जातीयवादाचा होता, त्याने सिस्टीममध्ये उच्च जातीच्या लोकांना बसवले. त्यानंतर आला C-4  म्हणजेच क्राइमचा व्हायरस. सिस्टीममध्ये गुन्हेगारांना समावून घेणे हा त्याचा हेतू होता.

LPG सिरीजचे व्हायरसः सिस्टीम या व्हायरच्या हल्ल्यांशी लढत असतानाच LPG सिरीजच्या व्हायरसचे हल्ले सुरू झाले.  लिबरलायझेशन (उदारीकरण), प्रायव्हटायझेशन (खासगीकरण), ग्लोबलायझेशन (जागतिकीकरण) अंतर्गत मोठमोठे हल्ले करण्यात आले, या व्हायरसच्या हल्ल्यांनी सिस्टीममधील सगळ्या फाइल, फोल्डर करप्ट करून टाकले. अनेक महत्वाच्या फाइल्स नष्ट झाल्या आणि अत्यावश्यक माहिती चोरून नेली गेली. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची खातीही रिकामी करून टाकली.

याच दरम्यान C-4 व्हायरस आला, जो C-1 व्हायरसचे नवे व्हर्जन होता. त्यात भांडवल कॉर्पोरेट नियंत्रणात बदलले आणि त्याने M म्हणजेच मार्केट सिरीजच्या अनेक व्हायरसचे हल्ले घडवून आणले. या हल्ल्यात जुनी व्यवस्था अस्ताव्यस्त झाली. याच काळात सिस्टीमला या व्हायरसपासून वाचवण्यासाठी इथिकल हॅकर्स P म्हणजेच पब्लिक म्हणजेच जनता सिरीजचे व्हायरस सातत्याने सोडत होते, परंतु ते LPG व्हायरसला संपुष्टात आणू शकतील, एवढे भक्कम नव्हते.

LPG सिरीजच्या व्हायरस बरोबरच H म्हणजेच हिंदुत्व सिरीजच्या व्हायरचाही पहिला हल्ला झाला होता. हा हल्ला प्रचंड घातक होता, त्याने सिस्टीमला आतून पोखरायला सुरूवात केली होती. याच सिरीजमध्ये HMP म्हणजेच हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान आणि HMT म्हणजेच हिंदू-मुस्लिम टेररिझम(दहशवाद) व्हायरस आले आणि ते सातत्याने सिस्टीमला पोखरत राहिले.

HM व्हायरसः परंतु २०१४ नंतर हॅकर्सनी H सिरीजच्या सर्वात शक्तीशाली HM व्हायरसचा हल्ला केला. हा व्हायरस एवढा घातक होता की तो मालक, संपादक, अँकर, रिपोर्टर्स आणि तमाम पत्रकारांच्या मेंदूत घुसून विनाश घडवू लागला आणि त्यांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही. या व्हायरसने त्यांचा मेंदूच हॅक करून टाकला आणि ते जे हॅकर्स सांगतील, तेच करत राहिले.

वस्तुतः सिस्टीमला हॅकर्सपासून वाचवण्यासाठी जे उपाय करायला हवे होते, ते वेळेत केले नाहीत. एका भक्कम ऍन्टीव्हायरस सॉफ्टवेअरची आवश्यकता होती, परंतु पायरेटेड व्हर्जनवर काम भागवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे या व्हायरसचे हल्ले रोखले जाऊ शकले नाहीत. जेव्हा प्रचंड आरडाओरड झाली, तेव्हा कुठे ऍन्टीव्हायरस टाकण्यात आला, परंतु लाख इशारे देऊनही त्याला अपडेट केले गेले नाही. परिणामी नंतर हे एक्सपायर होऊन गेले.

न्यूज चॅनल्स आणि हॅकर्स यांची मिलीभगत असू शकते, ही तुमची शंका खरीही असू शकेल. त्यामुळेच ते हॅकर्सच्या बाबतीत काहीच बोलत नाहीत आणि ऍन्टीव्हायरसची सेफ्टी वॉल कशी उद्धवस्त झाली, हेही ते तुम्हाला सांगत नाहीत.

अनेक शंकेखोरांना तर असेही वाटते की हे टीव्ही अँकर्स खरेतर हॅकर्सच्या दरोडेखोरीचा एक भागच आहेत. हे टीव्ही अँकर्स म्हणजे त्यांनीच सोडलेले व्हायरस आहेत, जे जनतेचा मेंदू हॅक करण्यात गुंतले आहेत, त्यांच्या मार्गदर्शकांना सिस्टीम हॅक करण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ते जनतेच्या मेंदूत घुसून त्याला हॅक करण्याचा सर्वशक्तीनिशी प्रयत्न करू लागले आहेत!

साभारः सत्यहिंदी डॉट कॉम

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा