विधान परिषदेवरील १२ जणांच्या यादीत ही नावे, राष्ट्रवादीने ऐनवेळी वगळले आदिती नलावडेंचे नाव?

0
8482
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ जणांची नावे जवळपास निश्चित झाली असून या १२ जणांच्या यादीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या यादीत गायक, अभिनेते, कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातील नामांकितांचा समावेश आहे. या यादीत राष्ट्रवादीकडून शेतकरी नेते राजू शेट्टी, धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे, भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे, काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटील, मुझफ्फर हुसेन यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या यादीत राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्या आदिती नलावडे यांचेही नाव आघाडीवर होते, पण ऐनवेळी ते वगळण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तर काँग्रेसकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येकी चार जणांची यादी सुपूर्द केली. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे नाव देण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. आनंद शिंदे हे गायक कुटुंबातील असून त्यांचे सुपुत्र आदर्श शिंदेही गायक आहेत. काँग्रेसकडून गायक व संगीतकार अनिरुद्ध वानकर, शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील आणि मराठी अभिनेते आदेश बांदेकर यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

शिवसेनेकडून माजी आमदार सचिन अहिर आणि सुनिल शिंदे यांचीही नावे चर्चेत आहेत, मात्र त्यांची नावे गाळली जाऊ शकतात. मुख्यमंत्री ठाकरे हे पक्षाचा विस्तार करण्यासाठी मुंबईऐवजी ग्रामीण भागातील चेहऱ्याला संधी देऊ इच्छितात. त्यामुळे शिवसेनेकडून ग्रामीण भागातील कोणता चेहरा निश्चित केला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा