राजभवनाची दिशा’भूल’ की मेहरबानी?: ‘बाटु’च्या कुलगुरूपदी डॉ. काळे यांची नियुक्ती वादग्रस्त

0
855
संग्रहित छायाचित्र.

मुंबई/औरंगाबादः लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (बाटु) कुलगुरूपदी डॉ. के. व्ही. काळे यांची झालेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत. प्राध्यापकपदावरील नियुक्तीतील घोळामुळे कुलगुरूपदासाठी दोनवेळा अपात्र ठरवलेल्या डॉ. काळे यांचीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुलगुरूपदी वर्णी लावल्यामुळे ही राजभवनाची दिशाभूल आहे की हेतुतः केलेली मेहेरबानी असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. कारभारी विश्वानाथ काळे यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगडच्या लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नुकतीच नियुक्ती केली. या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेचे संचालक प्रा. प्रमोद पडोळे आणि महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. कारभारी काळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

हेही वाचाः ना नियम ना परिनियम, तरीही अंतर्गत समितीचा सल्ला धुडकावून २८ तदर्थ प्राध्यापक केले कायम!

मात्र आता डॉ. काळे यांच्या निवडीवरून नवा वाद सुरू झाला आहे. मूळात डॉ. काळे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १९९७ मध्ये प्रपाठकपदी झालेली नियुक्तीच बोगस असल्याचे समोर आले आहे. या विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी याबाबत डॉ. माळी आणि डॉ. मालदार या दोन माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने डॉ. काळे यांची विद्यापीठात प्रपाठकपदी (रिडर) झालेली नियुक्तीच बोगस असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे प्रपाठकपदाच्या त्यांच्या आठ वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवावर त्यांना प्रोफेसरपदी देण्यात आलेली पदोन्नतीही बोगस ठरते. डॉ. माळी आणि डॉ. मालदार समितीचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाच्या दफ्तरी आहे.

हेही वाचाः ‘बामु’तील १२७ कोटींच्या घोटाळ्यात ‘बाटु’चे नवे कुलगुरू काळेंच्या ३७ लाखांच्या खरेदीवर ठपका

डॉ. के. व्ही. काळे हे देवगिरी महाविद्यालयात १९८७ पासून कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक होते. त्यांना शिक्षक/ कनिष्ठ महाविद्यालयीन अधिव्याख्याता म्हणून मान्यता मिळाल्याच्या नोंदीही त्यांच्या सेवापुस्तिकेत आहेत. यूजीसीच्या नियम  व निकषांप्रमाणे त्यावेळी प्रपाठकपदी नियुक्तीसाठी वरिष्ठ महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून अध्यापनाचा अनुभव असणे अनिवार्य असतानाही डॉ. काळे यांची प्रपाठकपदी नियुक्ती करताना त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील सहशिक्षक म्हणून केलेल्या अध्यापनाचा अनुभव ग्राह्य धरण्यात आला होता.

डॉ. माळी आणि डॉ. मालदार समितीने नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवत डॉ. काळे यांची प्रपाठकपदी नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. या बेकायदेशीर नियुक्तीतील अध्यापन अनुभवाच्या आधारे पुढे डॉ. काळे यांना डिसेंबर २००५ मध्ये प्रोफेसरपदी पदोन्नती देण्यात आली होती. मूळ नियुक्तीच बेकायदेशीर असल्याने ही पदोन्नतीही त्यामुळेच बेकायदेशीर ठरते, असे सांगत डॉ. काळे यांच्या विरोधात राजभवनाकडे २०१६ आणि २०१९ मध्ये तक्रारी करण्यात आल्या होत्या.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

अमरावतीच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी निवड समितीने २०१६ मध्ये डॉ. काळे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यावेळी राजभवनाकडे केलेल्या तक्रारींमध्ये डॉ. काळे यांच्या नियुक्तीतील घोळ निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीच्या नोडल ऑफिसरने डॉ. काळे यांच्या नावाची शिफारस रद्द करण्यात आली होती, असे सांगण्यात येते.

२०१९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या वेळीही निवड समितीने डॉ. काळे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्याही वेळी डॉ. काळे हे कुलगुरूपदासाठी अपात्र असल्याच्या तक्रारी राजभवनाकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे औरंगाबाद विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी जवळपास निश्चित झालेले डॉ. काळे यांचे नाव ऐनवेळी रद्द करून डॉ. प्रमोद येवले यांची कुलगुरूपदी निवड करण्यात आली होती. याच घोळामुळे या विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीची घोषणाही पंधरवडाभर लांबली होती.

डॉ. कारभारी काळे यांची बाटुच्या कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना अभाविपप्रणित विद्यापीठ विकास मंचचे पदाधिकारी.

कुलगुरू निवड समितीने दोनवेळा कुलगुरूपदासाठी डॉ. काळे यांच्या नावाची शिफारस केलेली असतानाही त्यांच्या नियुक्तीतील अनियमियतता आणि घोळामुळे राजभवनाने दोन वेळा त्यांना कुलगुरूपदासाठी अपात्र ठरवले होते. हा सगळा पत्रव्यवहार, कागदपत्रे आणि तक्रारी राजभवनाकडे असताना आता तेच डॉ. काळे कुलगुरूपदासाठी पात्र कसे ठरले? आणि त्यांची लोणेरेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड कशी झाली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

डॉ. काळे यांची संघ परिवाराशी जवळीकच त्यांना कुलगुरूपदापर्यंत पोहोचण्यासाठी ‘पात्र’ ठरवण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळाने राज्य सरकारकडून शिफारस करण्यात आलेल्या नावांपैकी एकाची नियुक्ती राज्यपालांनी कुलगुरूपदी करावी, अशी कायदेशीर दुरूस्ती करणारा ठराव मंजूर करून तो स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवलेला असतानाच डॉ. काळे यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. काळे हे प्रतिष्ठित तंत्रज्ञ कसे?:

लोणेरेच्या डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवडीसाठी ‘एक प्रतिष्ठित तंत्रज्ञ असावा’ अशी पहिलीच अट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नॉनटेक्निकल विद्यापीठ आहे आणि डॉ. काळे यांचा अध्यापनाचा अनुभवही नॉनटेक्निकलच आहे. त्यांनी देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ सहशिक्षकपदी नोकरी करत असतानाच इंजिनिअरिंग ऍंण्ड टेक्नॉलॉजी फॅकल्टीमध्ये एमसीए हा पूर्णवेळ अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. त्यांनी एकाचवेळी दोन पूर्णवेळ बाबी कश्या पूर्ण केल्या? हा स्वतंत्र विषय असला तरी केवळ एमसीए ही पदवी असणेच डॉ. काळे यांना ‘प्रतिष्ठित तंत्रज्ञ’ ठरवण्यास पुरेसे ठरते का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.

डॉ. काळे यांच्या सेवापुस्तिकेतील नोंदी. ते कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करत होते याचा पुरावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा